Home » Baipan Bhaari Deva Marathi Movie Review: संवाद साधणारी ‘ती’ची कहाणी!

Baipan Bhaari Deva Marathi Movie Review: संवाद साधणारी ‘ती’ची कहाणी!

Baipan Bhaari Deva Marathi Movie Review

स्त्री म्हणजे त्यागाची मूर्ती, परमेश्वराचे रूपच जणू. स्त्री म्हणजे सहनशीलतेचा कळस. संसारात तिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. ती नसेल तर कुटुंब कोमेजते. रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचा डोलारा सांभाळते; पण आपल्या मुलांबाळांना, नवऱ्याला, आप्तेष्ट मंडळींना झळ पोहोचू देत नाही. बहिणाबाई म्हणतात,

अरे संसार संसार । नाही रडणं कुडनं ।

येड्या गळ्यातला हार । म्हणू नको रे लोढणं ।

संसार कसाही असला, तरी गळ्यातला हार मानून त्याचा स्वीकार करते. आज ती चुल व मूल सांभाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या हातातून हळूहळू सत्ता जात आहे, या कल्पनेनेच अनेक पुरुष पछाडलेले आहेत. स्त्री बिचारी सर्व आघाड्यांवर लढत आहे. असे असले, तरी पुरुषसत्ताक समाजाची मानसिकता अद्याप बदललेली नाही. आजही मुलींच्या जन्माचे मनापासून स्वागत होतेच असे नाही. वाढत्या चंगळवादामुळे स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहणारेही आहेत. ‘कोणतीही व्यक्ती स्त्री म्हणून जन्माला येत नाही, तर तिला बाई बनवले जाते,’ एवढ्या खणखणीत शब्दांत स्त्री म्हणजे काय आणि बाईपणामुळे तिला काय भोगावे लागते, हे फ्रेंच विचारवंत सिमॉन द बोव्होआर यांनी आपल्या ‘सेकंड सेक्स’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे. फ्रेंच स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाल्यानंतरही त्यांनी घरी बसावे आणि मुले जन्माला घालावीत, असे धोरण सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या बोव्होआर यांनी ‘सेकंड सेक्स’ लिहिले. त्यात प्रथमच पुरुषांनी लिंगभेद कसा रुजवला, ही मानसिकता नेमकी काय, याचे विश्लेषण केले. पराक्रम, सामर्थ्य, धैर्य, बुद्धिमत्ता ही पुरुषत्वाची वैशिष्ट्ये ठरवली गेली, तर भावनिकता, परावलंबित्व, भित्रेपणा, चंचलता, अधीरता, लाजाळूपणा या भावनांना दुर्बल संबोधण्यात आले. हा भेद कसा लादला गेला, हे मांडणारे ‘सेकंड सेक्स’ हे पुस्तक १९४९ मध्ये प्रसिद्ध झाले होते. आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा त्याच ‘बायपणाची’ चर्चा घडवली जात आहे. पण, ही चर्चा सकारात्म दृष्ट्या घडवण्याचे काम वैशाली नाईक लिखित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा करतो. (Baipan Bhaari Deva Movie Review)

 

 

हा सिनेमा जितका एका ‘स्त्री’चा आहे. तितकाच तो एका ‘पुरुषा’चा देखील आहे. कारण, टाळी कधी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे या सिनेमाचा विषय प्रथमदर्शी स्त्रीवादी असला तरी तो प्रत्येक पुरुषाने समजून घेण्याजोगा आहे. यापूर्वी दिग्दर्शक केदार शिंदे याने त्याच्या ‘अगंबाई अरेच्चा’ सिनेमातून प्रेक्षकांना स्त्रीत्वाची.. बाईपणाची एक गोष्ट सांगितली आहे. तोच धागा पकडून आता ‘बाईपण भारी देवा’मध्ये बाईपणाची विस्तृत गोष्ट पडद्यावर चितारली आहे. स्त्रियांच्या मनाचे विविध कंगोरे या सिनेमात प्रेक्षकांच्या नजरेत पडतील. एकदम एकमेकांपासून भिन्न व्यक्तिमत्व असलेल्या सहा बहिणी एका मंगळागौरीच्या स्पर्धे निमित्त एकत्र येतात. या सख्या सहा बहिणी जरी असल्या तरी त्यांचा स्वभाव एकमेकांच्या विरुद्ध आहे. विविध वयोगटात असलेल्या या सहा जणीकशा आणि का एकत्र येतात? याचं प्रासंगिक चित्रण सिनेमात केलं गेलं आहे. तसेच या सहाही जणींचे व्यक्तिचित्रण लेखक आणि दिग्दर्शकाने अत्यंत बारकाईने केलेलं आहे. काळानुरूप सहा बहिणींमध्ये आलेला दुरावा कसा दूर होतो? त्यांच्यामधील बॉडिंग कसं घट्ट होतं? या सर्व प्रश्नाची उत्तर मनोरंजक आहेत.

सिनेमा वरकरणी दिसायला हलका-फुलका असला तरी सिनेकथानका मागील मर्म अत्यंत भावनिक आणि आजच्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. उपरोक्त म्हंटल्या प्रमाणे सिनेकथानकात जया (रोहिणी हट्टंगडी), शशि (वंदना गुप्ते), साधना (सुकन्या कुलकर्णी), पल्लवी (सुचित्रा बांदेकर), केतकी (शिल्पा नवलकर), चारु (दीपा परब) या सहा बहिणींच्या सहा वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. त्यांना एकत्र बांधून एक समर्पक भाष्य करण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे. रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली जया ही व्यक्तिरेखा अशी आहे की, संपूर्ण सिनेमात त्यांना मोजकेच संवाद आहेत. परंतु, त्या व्यक्तिरेखेला जे काही बोलायचे ते त्यांनी त्यांच्या डोळ्यातून आणि अभिनिवेशातून सादर केलं आहे. दुसरीकडे वंदना गुप्ते यांनी साकारलेली शशी ही व्यक्तिरेखा अत्यंत उत्साहपूर्ण आणि खेळकर स्वभावाची आहे. कथानकातील प्रत्येक पात्र हे स्त्रियांच्या वेगवेगळ्या वयोगातील महिलांचे प्रतिनिधित्व करतात. जेणेकरून प्रेक्षकांना एक विहंग दृश्य सिनेमात दिसते. सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब या सर्व अभिनेत्री तगडं काम केलं आहे. अनेक भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.

 

 

लेखिका वैशाली नाईक हिने सिनेमा लिहिताना ‘बाईपणा’चा दहाही दिशांनी विचार केला आहे. कारण, पात्रांचे व्यक्तिचित्रण अत्यंत विविधढंगी केले आहे. प्रत्येक पात्र एकमेकांपासून वेगळं उभं करण्यासाठी बारकाईने लिखाण झालं आहे. अगदी त्यांच्या संवादांमध्ये देखील फरक जाणवतो. जो वास्तवाच्या जवळ जाणारा आहे. हे संवाद प्रत्येकीला रिलेट होणारे आहेत. सोबतच आपल्या आजूबाजूला ही सिनेमाची पात्र वैयक्तिक आयुष्यात देखील आहेत; अशी प्रचिती होऊ शकते. दिग्दर्शक म्हणून केदार शिंदेचे विशेष कौतुक करायला हवं कारण, त्यांनी हा स्त्रीत्वाचा विषय आज पडद्यावर मांडला. मराठी सिनेमा नेहमीच त्याच्या विषयांमुळे इतर प्रादेशिक सिनेमांपासून भिन्न ठरला आहे. हाच वेगळेपणा ‘बाईपण भारी देवा’मध्ये आपल्या नजरेत पडतो. सिनेमाची गोष्ट ही केवळ मराठी भाषिक किंवा मराठी समजणाऱ्या प्रेक्षकांपुर्ती मर्यादित नाही. ती भाषांच्या पलीकडे आहे. त्यामुळे आगामी काळात हाच सिनेमा इतर भाषांमध्ये डब झाला किंवा रिमेक झाला तर वावगं वाटायला नको.

घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर

नवऱ्याची मर्जी राख

मुलबाळ सासू भार

जीवघेण्या गर्दीला या

भीडतांना आर पार

जीव तुझा भात्यापरी

रोज होई खालीवर

ठिणगीला भीडणारी आकल

बाईपण भारी देवा

बाईपण भारी रं

सिनेमातील हे गाणं कथानकाचे सार सांगून जाते. सिनेमा जितका दिसायला आल्हाददायी आहे तितकाच तो कानांना देखील सुखावणारा आहे. सिनेमातील सर्व गीतं आणि पार्शवसंगीत कथनकाला अधिक उंची मिळवून देतात. तांत्रिक बाबीत देखील सिनेमा अव्वल आहे. खरंतर सिनेमा तीन वर्षांपूर्वी निर्मिला गेला होता. पण, विविधांगी कारणांनी त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले. परंतु, आज जेव्हा आपण सिनेमा पाहतो; तेव्हा कुठेही जुनेपणाचा लवलेश दिसत नाही. कारण, ही गोष्ट आणि हा पट कालातीत आहे. हे सिनेमात प्रतिबिंबित केलेलं चित्र जेव्हा खऱ्या आयुष्यातून, समाजातून, जीवनातून नाहीसे होईल तेव्हा ती बाब सिनेमाच्या लेखिकेला आणि दिग्दर्शकाला अधिक सुखावणारी असेल. पण, हा सामाजिक बदल घडायला नक्कीच वेळ लागेल. आज या सिनेमामुळे या बदलाची सुरुवात तरी झाली आहे. या बदलाचे साक्षीदार आणि कर्ता तुम्ही स्वतः होण्यासाठी.. सिनेमा जरुर पहावा… समजून घ्यावा. (Baipan Bhaari Deva Movie Review In Marathi)

सिनेमा : बाईपण भारी देवा
निर्मिती : जिओ स्टुडिओज
दिग्दर्शक : केदार शिंदे
लेखन : वैशाली नाईक
कलाकार : रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब
छायांकन : वासुदेव राणे
संकलन : मयुर हरदास
दर्जा : साडेतीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy