Home » Shyamchi Aai Movie Review: वळणदार सुकथन!

Shyamchi Aai Movie Review: वळणदार सुकथन!

Shyamchi Aai Movie Review

पांडुरंग सदाशिव साने यांनी १९३३ मध्ये नाशिकच्या तुरुंगात असताना फक्त पाच दिवसांत ‘श्यामची आई’ हे स्वानुभव असलेले हस्तलिखित पुस्तक लिहिले. हे लिखाण महाराष्ट्रासाठी आजवर मार्गदर्शक ठरत आहे. आचार्य अत्रे यांनी १९५३ मध्ये या साहित्यावर पहिल्यांदा १९५३ मध्ये सिनेमा काढला. शीर्षक ‘श्यामची आई’ हेच होते.  पुन्हा ७० वर्षांनी दिग्दर्शक सुजय डहाके याने तोच घाट घातला आणि पुन्हा ‘श्यामची आई’ तयार केला आहे. पण, यंदाचा सिनेमा हा नव्या पिढीतील नजरेतील समकालीन सामाजिक भावभावनांना प्रभावित करेल; असा बनवण्याचा प्रयत्न झाला आहे. वळणदार, मार्गदर्शक बोधसाहित्य पुन्हा पडद्यावर आणताना लेखक सुनील सुकथनकर यांनी सिनेमाच्या पटकथेची ‘वळणदार सुकथन’ केले आहे.

महाराष्ट्राच्या जनमनात उच्चस्थान असलेल्या या साहित्यकृतीवर सिनेनिर्मिती करताना दिग्दर्शकाने जाणीवपूर्वक सिनेमा कृष्ण-धवल बनवला आहे. का? तर प्रेक्षकांना पुन्हा त्या जुन्या, शांत, प्रभावी अवकाशात घेऊन जाण्यासाठी! साने गुरुजी आणि श्यामची आई यांच्या प्रतिमा नव्याने उजळूण्याचे काम हा नवा ‘श्यामची आई’ सिनेमा करु पाहतो. सोबतच या प्रतिक्रमांना नवे आयाम देण्यात देखील तो यशस्वी झाला आहे; असं आवराजूं म्हणावे लागेल. पुस्तकातील मूळ आशयाला कुठेही धक्का न लावताना. हे पुस्तक.. नेमकं कसं? का? आणि कोणासाठी? कोणत्या परिस्थितीत लिहिले गेले? या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचं कामही हा सिनेमा करतो. परिणामी, हा सिनेमा पूर्वीच्या अत्रेंच्या सिनेमाहून भिन्न ठरतो. सुजय आणि त्याची टीम अजरामर साहित्याला आजच्या प्रेक्षकांसमोर आणताना ती अधिक सुबोध, आकर्षक करण्याचा प्रयत्न करते. त्यातूनच सिनेमा तुम्हाला अशा भावविश्वात घेऊन जातो.. जितके तुम्ही श्यामच्या आयुष्यात, त्याच्या जीवनप्रवासात दंग होऊन जाता. (Shyamchi Aai Movie Review)

सिनेमात तुमच्या कानी पडणारे संवाद, ती भाषा.. शब्द.. लहेजा आणि विशेष करुन तो ठेहराव तुम्हाला नवा सिनेमॅटिक अनुभव करुन देणारा ठरतो. सिनेमा सुवाच्च, सुलेखन, सुकथन आणि वळणदार मर्मपट यावेळी सुजयने पडद्यावर रेखाटला आहे. आजच्या डिजिटल युगात तो कृष्ण-धवल अधिकच आकर्षित करतो. सिनेमा पाहताना तुमचे डोळे शतवार ओले होतात. प्रेम, भक्ती, कृतज्ञता, त्याग आणि सहिष्णूताचा मर्म आपल्याला सिनेमात पदोपती दिसतो आणि जाणवतो देखील.      

Shyamchi Aai Movie Review In Marathi

 

साने गुरुजी यांनी त्यांच्या प्रस्तावनेत लिहिले होते की, ‘पुष्कळांना असे वाटत असेल की, या श्यामच्याच गोष्टी आहेत. परंतु, त्या गोष्टीतून शेवटी मातेचे प्रेमाचं बाहेर पडलेले दिसेल. झाडाचा सारा फांद्यापानांचा विस्तार वर येणाऱ्या दहा-वीस फुलाफळांसाठी असतो, त्याप्रमाणे श्यामच्या हालचालींची सारी हकीकत त्यातून शेवटी बाहेर पडणाऱ्या अमृतमय अशा मातेच्या प्रमाचा आहे. आईचा एखादा उदगार, एखादा शब्द सांगण्यासाठी श्यामला स्वतःच्या कृत्याची व सभोवतालच्या परिस्थितीची कल्पना देणे भाग पडे. या पार्श्वभूमीवर तो आईचा एखादा उद्गार चितारी. अनंत निळ्या आकाशाच्या पार्श्ववभूमीवर लहानसा चंद्र मिरवतो, त्याप्रमाणे श्यामच्या स्वतःच्या कथांच्या पार्श्वभूमीवर हा मातृप्रेमाचा चंद्र मिरवत आहे.’ या ओळींच्या मार्गदर्शनात सुजयने त्याचा नजरेतील ‘श्यामची आई’ घडवला आहे. असं म्हणावे लागेल!

सोबतच हे कथानक अधिक प्रभावी आणि वास्तवी करण्यासाठी श्यामच्या वडिलांची सक्षम बाजू त्याने सिनेपटकथेत आणि पडद्यावर उभी केली आहे. सुजय आणि सुकथनकर यांचा हा पट केवळ पुस्तकाचे चित्ररुप पडद्यावर मांडत नाही तर; तत्कालीन इतर साहित्याच्या आधारे ‘साने गुरुजी’ होण्यापर्यंतचे श्यामचे आयुष्य वास्तविकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. श्यामच्या शालेय ते करावास आयुष्याचे शब्दचित्रण उत्कृष्टपणे सिनेमात करण्यात आले आहे. सिनेमाचे शीर्षक ‘श्यामची आई’ असले तरी; हा पट केवळ या दोघांचा नाही स्वतः श्याम (पाडुंरंग – शर्व गाडगीळ), आई (यशोदा – गौरी देशपांडे) आणि वडील (सदाशिव – संदीप पाठक) या तिघांच्या भोवती पटकथा फिरते. एकीकडे लहानग्या श्यामच्या नजरेतून आपल्याला सुक्ष्म ‘वर्म आय व्ह्यु’प्रमाणे दिसतो आणि मोठ्या श्यामच्या अर्थात साने गुरुजींच्या (ओम भुतकर) सुकथनातून ‘बर्ड आय व्ह्यु’प्रमाणे पाहता येतो.

सिने कथानकाची सुरुवात १९३१ खानदेशात साने गुरुजी जुलमी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देत असताना होते. तिथेच तुरुंगात त्यांची भेट विनोबा भावेंशी होते. दोघेही समविचारी व्यक्ती एकत्र येतात. पुढे साने गुरुजींची नाशिकच्या कोठडीत रवानगी केली जाते. आणि तिथे जन्माला येतं ‘श्यामची आई’. सिनेमाची सुरुवात प्रेक्षकांना बांधून ठेवते. परंतु हळूहळू सिनेमा खूप संथ होतो. तशी पटकथेची गरज म्हणावी लागेल. पण, अगदी शेवटपर्यंत सिनेमाची ही संथ गती प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होते.

Shyamchi Aai Movie Review

पुस्तकातील विविध रात्र (गोष्टी) ह्या आकर्षक ‘मोत्या’प्रमाणे आहेत. या मोत्यांना एकत्र संवादरुपी धाग्यात गुंफून सुरेख अशी मोत्यांची माळ सुनील सुकथनकर यांनी बनवली आहे. त्यात विविध आकर्षक खडे पात्रांच्या रुपाने अधिमध्ये गुंफलेलीही आहेत. हे सर्व खडे स्वयंप्रकाशी होऊन कलाकाररुपी लखलखतात. उपरोक्त म्हंटल्याप्रमाणे हा सिनेमा मुख्यतः तीन पात्रांभोवती गुंफण घालतो. आईच्या भूमिकेत गौरी देशपांडे हिने  श्यामच्या आई लीलया आणि कौतुकास्पद साकारली आहे. पहिल्या फ्रेमपासून ते शेवटपर्यंत तिच्या वाट्याला पटकथेत अनेक चढउतार आले आहेत. भावभावनांचा कल्लोळ आहे! परंतु, तिने सशक्तपणे अगदी कसलेल्या नटी प्रमाणे व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. यापूर्वीच्या अत्रेंच्या सिनेमात अभिनेत्री वनमाला यांनी प्रतिमा आणि त्यांचा तत्कालीन आवेशाहुन भिन्न आई गौरीने यावेळी साकारली आहे. ही आई त्या आईहुन भिन्न असली तरी कुठेही खटकट नाही वा अतिशोयोक्ती वाटत नाही. या अजरामर व्यक्तिरेखेला नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न देखील गौरी परिणामी दिग्दर्शक सुजयनं यावेळी केला आहे. प्रारंभीपासून शेवटपर्यंत पैलू, बाज, पोशाख, स्वर आणि देशबोली यांचे विविधांगी रुप गौरीने पडद्यावर लीलया उभी केली आहेत.

लहानग्या श्यामच्या भूमिकेत शर्व गाडगीळ या बालकलाकाराने सिनेमाचा पडदा व्यापून टाकला आहे. लहानवयातील त्याची पात्रांची समज आणि अभिनिवेश कौतुकास्पद आहे. या दोन्ही भूमिकांप्रमाणे वडिलांच्या भूमिकेत असलेला संदीप पाठक आपल्यावर प्रभाव टाकतो. पटकथेतला विशेष सहाय्य करण्याचे काम हे पात्र करते. जेणेकरुन सिनेमा अधिक प्रभावी बनव्यात मदत झाली आहे. संदीपच्या चेहऱ्यावरील विविधांगी प्रसंगातील आवेश अधोरेखित करण्याजोगा आहे. संकलक बी. महंतेश्वर याने उत्कृष्टपणे केले आहे. सोबतच सिनेमॅट्रोग्राफर विजय मिश्रा याने रेखीवपणे सिनेमातील प्रत्येक शब्दचित्र टिपले आहे. सिनेमा तांत्रिक बाबीतही उजवा आहे. सारंग साठ्ये, तरुण वयातील श्याम.. मयूर मोरे, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर, उर्मिला जगताप, दिशा केतकर यांनी त्यांच्या-त्यांच्या व्यक्तिरेखा उत्तम आणि स्मरणात राहतील अशा उभ्या केल्या आहेत. अशोक पत्की आणि महेश काळे यांचे पार्श्वसंगीत कानांना आनंद देते. एकंदरच हा नवा घाट जरुर पाहण्याजोगा आणि समजून घेण्याजोगा आहे.

सिनेमा: श्यामची आई
निर्मिती: अमृता अरुण राव
दिग्दर्शक: सुजय डहाके
पटकथा, संवाद सुनील सुकथनकर
संगीत : अशोक पत्की, महेश काळे
संकलन: बी. महंतेश्वर
छायांकन : विजय मिश्रा
कलाकार : संदीप पाठक, गौरी देशपांडे
ओम भूतकर, शर्व गाडगीळ, सारंग साठ्ये,
मयुर मोरे, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर
दर्जा : साडे तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy