Home » Anibani Marathi Movie Review: आणीबाणी चित्रपट आहे

Anibani Marathi Movie Review: आणीबाणी चित्रपट आहे

Anibani Marathi Movie Review In Marathi

आणीबाणी हा शब्द ऐकताच १९७६ चा कालखंड डोळ्यासमोर उभा राहतो, मात्र भारतीय इतिहासाच्या पानावर रेखाटलेली ही ‘आणीबाणी’ काहींसाठी सुखाची तर काहींसाठी दुःखाची ठरली. याच आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लेखक अरविंद जगताप यांनी ‘आणीबाणी’ हा मार्मिकपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. नवोदित दिग्दर्शक दिनेश जगताप याने खुसखुशीत कथा हाती असून देखील ‘आणीबाणी’चा डोलारा उभारताना; त्याकडे बारकाईनं आणि कल्पकतेने दृष्टिक्षेप टाकलेला नाही. बारीक चिमटे काढण्याचे काम कायमच अरविंद जगताप यांच्या लिखाणाने केलं आहे. तसे चिमटे या सिनेमात देखील आहेत. पण, हे चिमटे प्रभावी पद्धतीने त्याला पडद्यावर मांडता आलेले नाहीत. (Anibani Movie)

एक छोट्याश्या गावातील विवाहित जोडप्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये अचानक आलेल्या ‘आणीबाणी’चा काय परिणाम होतो, या भोवती हा संपूर्ण सिनेमा फिरतो. अभिनेता उपेंद्र लिमयेने साकारलेली अभिमन्युची व्यक्तिरेखा चांगलीच रंगली असून, त्याला तोडीस तोड वीणा जामकरची विमल ही व्यक्तिरेखा सुबक आहे. संजय खापरे, प्रवीण तरडे यांनी त्यांच्या-त्यांच्या भूमिका प्रभावीपणे निभावल्या आहेत. सयाजी शिंदे यांना तितकासा स्क्रिन टाईम सिनेमात मिळालेला नाही. परंतु, जेव्हा-केव्हा ते स्क्रिनवर येतात तेव्हा ते स्वतःकडे लक्ष वेधून घेतात. (Anibani Marathi Movie Review)

कथेच्या केंद्रस्थानी असलेला अभिमन्यू (उपेंद्र लिमये)चं कुटुंब सुखवस्तू आहे. त्याचं त्याच्या बायकोवर अर्थात विमलवर नितांत प्रेम असतं. पण, अडचणी अशी आहे की, त्यांना मुलं होतं नाहीय. परिणामी विमलला (वीणा जामकर) सासूचे (उषा नाईक)चे आणि गावकऱ्यांचे बोलणे खावे लागत आहे. विमलाला देखील आई व्हायचं आहे. तिलाही लहान मुलांचा लळा आहे. म्हणूनच ती तिच्या नवऱ्याला, अभिमन्यू दुसरं लग्न करण्याचा आग्रह करते. त्यासाठी विमल स्वतःच पुढाकार घेऊन सवत म्हणून तिची लांबची बहिणी ज्योती (सीमा कुलकर्णी) निवड करते. सुरुवातीला अभिमन्यूचा दुसऱ्या लग्नाला विरोध असतो. पण, कर्मधर्म संयोगाने तो दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढतोच. खरंतर अभिमन्यू हा भावी सरपंच पदाचा दावेदार असतो. तसंच दुसरीकडे गावात; त्यांच पोलीस अधिकारी पिंटू शेट (संजय खापरे) सोबत वैर असतं. पिंटू हा ज्योतीचा भाऊ असतो. त्याचा अभिमन्यू आणि ज्योतीच्या लग्नाला विरोध असतो. पण, पिंटूच्या नाकावर टिचून अभिमन्यू-ज्योतीचं लग्न होतं. अशावेळी मूल होण्याचे स्वप्न बाळगणारे आणि त्यासाठी प्रयत्न करणारे हे जोडपं कशापद्धतीने या पेचप्रसंगातून स्वतःला बाहेर काढते, हे या चित्रपटात अतिशय मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आले आहे. दरम्यान गावात पोलीस पार्टी धरपकड करत फिरत असते. पुरुष नसबंदी करण्याचं रोजचं आपल्या ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी गावातून पुरुष दवाखान्यात पकडून आणले जात. जरब आणि दबावाने पोलीस मंडळी हा सर्व कारभार करत असतात. सरकारी योजनेच्या नावाखाली वैयक्तिक सूड काढण्याचा प्रकारही सुरु असतो. म्हणूनच पिंटू देखील अभिमन्यूच्या मागावर असतो; जेणेकरून तो अभिमन्यूची नसबंदी करु शकेल? ते का कशासाठी? आदीसर्व उत्तर सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला मिळतील.

=====

हे देखील वाचा: बाईपण भारी देवा – संवाद साधणारी ‘ती’ची कहाणी!

=====

आशययुक्त मांडणी, आणि सर्जनशील लेखनावर दिग्दर्शना संस्कार काहीसे कमी पडले असले तरी; सिनेमा आपला अंतिम परिणाम साधण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरतो. संपूर्ण धुराही कलाकारांच्या खांद्यांवर असल्याचे जाणवते. पटकथेत लेखकांने अनेक ठिकाणी मार्मिक भाष्य केलं आहे. जे तत्कालीन परिस्थितीतील असामाजिक घटकाला त्यांचा आरसा दाखवतात. सिनेमातील प्रत्येक कलाकाराने छान काम केलं आहे. आपापल्या भूमिका तन्मयतेने पडद्यावर साकारल्या आहेत. सिनेमा तुम्हाला विनोदी ढंगाने सत्तरच्या दशकातील गावच्या पाराची सैर घडवो. परंतु, ही सफर काहीशी रटाळ आणि कंटाळवाणी देखील आहे. त्यामुळे सय्यम राखून तुम्हाला प्रेक्षागृहात सिनेमा पाहतं बसून राहवं लागतं.

सिनेमा : आणीबाणी (Anibani Movie)
निर्मिती : दिनिशा फिल्म्स
दिग्दर्शक : दिनेश जगताप
कथा,पटकथा,संवाद : अरविंद जगताप
कलाकार : सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, वीणा जामकर, संजय खापरे, उषा नाईक, सीमा कुलकर्णी
छायांकन : मंगेश गाडेकर
संकलन : प्रमोद कहार
दर्जा : अडीच स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy