Home » Alibaba Ani Chalishitale Chor: चाळीशीवाल्यांच्या ‘किस’चा किस्सा!

Alibaba Ani Chalishitale Chor: चाळीशीवाल्यांच्या ‘किस’चा किस्सा!

Alibaba Ani Chalishitale Chor Review

एकदा आबा, राजे, बाबा आणि ललिता रेल्वेच्या एकाच बोगीतून प्रवास करत असतात. सर्वजण प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि त्यातले तिघेजण राजकारणी. त्यामुळे ते अतिशय प्रगल्भपणे व राजकीयदृष्ट्या योग्य भूमिका घेऊन गप्पा मारत असतात. अचानक एक मोठा बोगदा येतो. रेल्वे बोगद्यात शिरल्यावर डब्यात अंधार होतो आणि अचानक डब्यातले दिवे जातात. आता पूर्ण अंधार झालेला असतो. अचानक कोणीतरी कोणाचे तरी चुंबन घेतल्याचा आवाज येतो व त्यापाठोपाठ कोणीतरी कोणाच्या तरी जोरात थोबाडीत मारल्याचा आवाज येतो. नंतर एकदम शांतता पसरते. बोगदा संपतो आणि डब्यात उजेड येतो. सर्वांना बाबा चा गाल लाल झालेला दिसतो. सर्वजण एकमेकांकडे आश्चर्याने बघताना दिसतात. पण राजकीय चातुर्य व हुशारी दाखवून सर्वजण गप्प राहून नक्की काय झाले असावे याचा मनातल्या मनात विचार करू लागतात. गडद काळोख्या परिस्थितीचा फायदा घेत कोणीतरी हे असं कृत्य केलेलं असतं. हा ‘व्यभिचारी’ आहे सर्वांना वाटतं. एकमेकांकडे संशयास्पद नजरेने पाहतात. कोणी हे कृत्य केलं आहे; याचा सुगावा कोणालाच नसतो. कोणी स्वतःहून ‘तो’ किंवा ‘ती’ पुढाकार येऊन बोलतही नाही. अशात सर्वांच्यात केवळ धुसपूस होत असते. त्यामुळे नेमके ‘किस’ कोणी कोणाचं घेतला? असा प्रश्न सर्वांना पडतो. आता याचं ‘उत्तर’ शोधण्यासाठी हे चाळीस चोर आणि अलीबाबा पाठपुरावा करु लागतात. असंच काहीस आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटात घडलेलं आहे. (Alibaba Ani Chalishitale Chor Movie Review)

साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी विवेक बेळे यांनी ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ हे नाटक लिहिलं आणि रंगभूमीवर आणलं. या नाटकात होती तीन जोडपी व त्यांचा एक अविवाहित पुरुष मित्र. तसंच सिनेमातही आहे. पराग (सुबोध भावे) आणि अदिती (श्रुती मराठे), डॉक्टर (अतुल परचुरे) आणि सुमित्रा (मुक्ता बर्वे), वरुण (आनंद इंगळे) आणि शलाका (मधुरा वेलणकर साटम) अशी तीन जोडपी आणि अविवाहित असलेला अभिषेक (उमेश कामत). हे सर्वजण चाळीशीतले असून एकमेकांचे मित्र आहेत. नियमितपणे दर एकत्र भेटून हे पार्टी करत असतात. पार्टीत पेय-पान, नृत्य वगैरे करतात. अशाच एका पार्टीत सर्वजण एका धमाल गाण्यावर एकत्र नाचत असताना दिवे जातात. काही क्षणातच कोणीतरी कोणाचे तरी चुंबन घेतल्याचा आवाज येतो व त्यापाठोपाठ कोणीतरी कोणाच्या तरी जोरात थोबाडीत मारल्याचा आवाज येतो. नंतर एकदम शांतता पसरते. प्रसंग तिथेच संपतो.

घडलेल्या या प्रसंगाने व्यथित झालेला प्रत्येकजण दुसर्‍या दिवशी या घटनेबद्दल चर्चा करून नक्की कोणी कोणाचे चुंबन घेतले असावे व कोणी कोणाच्या थोबाडीत मारली असावी याचा अंदाज घेत असतात. भर म्हणून; या घटनेसंदर्भात कोणीतरी एक निनावी नावाने ब्लॉग तयार केला असून घटनेचा तपास लावण्याच्या दृष्टीने पार्टीतील सर्वांनी आपली मते त्यावर लिहावीत असे सर्वांना ईमेल आलेले असतात. आता सर्वांची उत्सुकता चाळवते व थोडीशी भीति देखील वाटू लागते. प्रत्येक जण आपापल्यापरीने घडलेल्या घटनेचा अर्थ लावू पाहतो व या घटनेत मी किंवा माझी बायको तर नक्कीच नाही कारण आम्ही ‘तसे’ नाही. असलेच तर इतर जण असतील असा बचाव सुरू होतो. (Alibaba Ani Chalishitale Chor Movie Review In Marathi)

ब्लॉगवर त्यांची नावे घेऊन निनावी प्रतिसाद येऊ लागतात आणि एकमेकांची बिंगे फुटायला लागतात. सर्वजण चाळीशीतले. त्यामुळे आपले काहीतरी ‘अफेअर’ असावे अशी सर्वांचीच मनोमन इच्छा असते. आपल्याला आपल्या बायकोचा कंटाळा आला आहे व थोडा चेंज म्हणून एखादे अफेअर व्हावे या भावनेतून पुरूषांचे प्रयत्न सुरू असतात. या वयात आपल्याला एखादा वेगळा पुरूष मित्र म्हणून मिळावा अशी बायकांची देखील इच्छा असते. मग त्यातून एकेक गोष्टी उघड व्हायला सुरूवात होते. सर्वजण मनातून कितीही उत्सुक असले तरी मध्यमवर्गीय संस्कार व भित्रेपणा यामुळे किरकोळ फ्लर्टिंग च्या पलीकडे कोणाचीच मजल जात नाही. पण, इतरांची मजल खूप पुढे गेली आहे असे प्रत्येकालाच वाटत राहते. गॉसिप म्हणजे अभिषेक व अदिती एकमेकांशी सारखे फोनवर बोलतात, बाहेर भेटून कॉफी पितात हे अदितीच्या नवऱ्याला समजते. परागचा संताप होतो. त्यात पराग आणि शलाका यांची मैत्री असते. शलाकाचा नवरा वरूण व सुमित्रा हे एकमेकांचे चांगले मित्र असतात. अशी काहीही मैत्रीची गुतांगुती त्यांच्यात असते. यातून वेगवेगळ्या शक्यता चर्चिल्या जातात. अभिषेक अविवाहीत असल्याने त्यानेच चुंबन घेतले असे अंदाज बांधले जातात. पण हा आणि असे अनेक अंदाज तुम्हाला सिनेमा टप्याटप्याने दिसतील. पण, त्यातील नेमकं खरं काय? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.  

विवेक बेळे यांनी संहिता अत्यंत उत्कंठावर्धक लिहिली आहे. आणि आदित्य इंगळे याने त्यावर दिग्दर्शकीय संस्कार केले आहेत. नक्कीच सिनेमा शब्दबंबाळ झाला आहे. पण, तो गॉसिप मय असल्यानं पाहताना रंगत येते. चाळीशीतल्या जोडप्यांची मनातून अफेअर विषयी असलेली व दबलेली उत्सुकता, त्यासाठी त्यांचा चाललेला आटापिटा व मध्यमवर्गीय भित्रेपणा मुळे किरकोळ फ्लर्टिंग पुढे जाउ न शकलेले त्यांचे प्रयत्न त्यांनी यशस्वीरित्या व खेळकरपणे लिखाणात मांडले गेले आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत ताणण्याची कसब वाखाणण्याजोगी आहे.

सर्वच कलाकारांची कामे चांगली झाली आहेत. पराग (सुबोध भावे) आणि अदिती (श्रुती मराठे), डॉक्टर (अतुल परचुरे) आणि सुमित्रा (मुक्ता बर्वे), वरुण (आनंद इंगळे) आणि शलाका (मधुरा वेलणकर साटम) आणि अभिषेक (उमेश कामत); सर्वांनी आपापल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. हलकं-फुलकं संगीताने सिनेमाची रंगत अधिक वाढवली आहे. तर तुम्ही तुमच्या बायको सोबत वा नवऱ्यासोबत किंवा एकटे असाल तर एकट्याने हा सिनेमा नक्कीच पाहायला हवा आणि तितकाच तो समजूनही घ्यायला हवा. आणि हा सिनेमा पाहताना तुम्हीही अंदाज बांधा.. की, नेमकं कोणी कोणाला ‘किस’ केलं असेल!

सिनेमा : अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर
निर्मिती : नितीन वैद्य प्रोडक्शन
दिग्दर्शक : आदित्य इंगळे
लेखन : विवेक बेळे
कलाकार : आनंद इंगळे, सुबोध भावे, उमेश कामत, मधुरा वेलणकर साटम, मुक्ता बर्वे, श्रुती मराठे, अतुल परचुरे       
दर्जा : तीन स्टार    

=====

हे देखील वाचा: Swatantra Veer Savarkar Review: इतिहासाचा एकपात्रीपट!

=====

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy