Home » Jhimma 2 Movie Review: प्रवाही वाहणारा झरा!

Jhimma 2 Movie Review: प्रवाही वाहणारा झरा!

Jhimma 2 Movie Review In Marathi

दोन वर्षांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमे याने कलाकारांची एक विलक्षण टीम एकत्र आणली आणि ‘झिम्मा’ हा चित्रपट तयार केला! जो प्रेक्षक आणि समीक्षकांना आवडला होता. चित्रपटाने त्याच्या शेवटच्या श्रेयनामावली दरम्यान दुसऱ्या भागासाठी चाहूल सोडली होती. आता त्या चाहूल प्रत्यक्षात रूपात आलीय… हेमंत ढोम, लेखिका इरावती कर्णिक आणि संपूर्ण स्टार कास्टने ‘झिम्मा २‘ ची कथा पुढे नेली आहे. (Jhimma 2 Review)

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती…

हे मंगेश पाडगांवकर यांचे शब्द बऱ्याच भावना सांगून जातात. मनात दडलेलं वास्तव चटकन शब्दरुप धारण करुन जिभेवर आणतात. पण, तसे होण्यासाठी तसा मनमोकळा सहवास देखील आपल्याला मिळावा लागतो. हा सहवास जेव्हा अनोळख्या वाटेवर प्रवासादरम्यान मिळाला तर? नवी माणसं, नवे चेहरे आणि त्याचे नवं-नवे आचार विचार. हे सहप्रवासी जेव्हा आपसूकच एका वाटेवर चालू लागतात तेव्हा सुरु होतो.. ‘झिम्मा’! दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊन आणि करोनाच्या बैठकीतून उठताना ‘झिम्मा’ प्रेक्षकांच्या समोर आला. मन आल्हाददायी करणारा हा सिनेमा होता. अनपेक्षितपणे या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ज्यांनी हा सिनेमा पाहिला आहे; त्यांच्यासाठी आता सिनेमाचा दुसरा भाग पाहणं देखील तितकंच आल्हाददायी आणि आनंदी असणार आहे. ‘प्रवास ही अशी गोष्ट आहे जिथे माणूस जुन्याचा नवा होतो!’ ही झिम्मा च्या पहिल्या भागातील ओळ अजूनही मनात कुठेतरी आहे. याच माणसांची पुढची गोष्ट.. त्यांच्या मनातील प्रवास आता ‘झिम्मा २’मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

सिनेकथानकात आपल्या नजरेत पडणाऱ्या प्रत्येक बाईची तऱ्हा वेगळी आहे. पण जेव्हा त्या सगळ्या एकत्र येतात, तेव्हा त्या वेगळेपणातही नाविन्य दिसते. इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा सिनेमा त्याच्या पहिल्या भागाप्रमाणेच एक नवीन उमेद मनात निर्माण करतो. पहिल्या भागातीत नायिकांची एकमेकांशी फारशी ओळख नव्हती. पण आता त्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत. ही मैत्री निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नात्यात आणि कथेत काय नाविन्य पहायला मिळेल? याचं उत्तर ‘झिम्मा २’ मध्ये आहे. तुमची-आमची-आपली- आपल्या सर्वांचीच ही गोष्ट आहे. कमी अधिक प्रमाणात ती आपल्या सोबत किंवा आपल्या नजरेत घडलेली असू शकते. कारण, लेखिका इरावतीने मानवी जीवनाचे प्रतिबिंब सिनेमात मांडले आहे. दिग्दर्शक म्हणून हेमंतने या मानवी भावभावना तितक्याच ताकदीने पडद्यावर उभ्या केल्या आहेत. कलाकारांची निवड पहिल्या ‘झिम्मा’ मधील आणि आता ‘झिम्मा २’मधीलही; ही कलाकारांची फळी एकदम चपखल बसली आहे.  (Jhimma 2 Marathi Review)

झिम्माच्या पहिल्या भागात कबीरने (सिद्धार्थ चांदेकर) स्वतःची टुरिस्ट कंपनी सुरू केली होती. यावेळी पहिल्याच ट्रीपला त्याची विविध तऱ्हेच्या, स्वभावाच्या महिलांशी गाठ पडते. याच महिलांसोबत पुन्हा एकदा ट्रीप काढायचं कबीर ठरवतो. कारण असतं इंदूचा ७५ वा वाढदिवस. ठरलं तर! पुन्हा एकदा सर्व एकत्र जमतात. या धम्माल गँगमध्ये दोघीजणी सहभागी होतात. एक म्हणजे निर्मलाची सून तान्या (रिंकू राजगुरू) आणि दुसरी वैशालीची भाची मनाली (शिवानी सुर्वे). या सर्वजणी एकत्र आल्यावर भांडण, मतभेद, पार्टी, धम्माल तर होणारच! एकमेकांसोबत वेळ घालवता घालवता पुन्हा एकदा या सर्वांचा स्वतःला शोधायचा प्रवास सुरू करतो. दुरावलेली नाती पुन्हा एक होतात आणि प्रेक्षकांसाठी हा झिम्मा २ संस्मरणीय बनतो.

सिनेमाची कथा एक रोलरकोस्टर राईड आहे, तो तुम्हाला आत्मपरीक्षण देखील करवतो. भिन्न लोक, भिन्न व्यक्तिमत्व, भिन्न दृष्टीकोन – झिम्मा २ मध्ये हे सर्व काही आहे. तरीही, हे सर्व एकत्र बांधलेले जातात. का? याचं उत्तर ‘झिम्मा २’ आहे. ही ‘रियुनियन टूर’ तुम्हाला हसवते आणि कधी डोळे टचकन ओले देखील करते. इंदू (सुहास जोशी), निर्मला (निर्मिती सावंत), वैशाली (सुचित्रा बांदेकर), मीता (क्षिती जोग), कृतिका (सायली संजीव) आहेत. तसंच यंदाच्या भागात नव्याने सहभागी झालेल्या तान्या (रिंकू राजगुरु) आणि मनाली (शिवानी सुर्वे) आहे. या प्रत्येकीच्या तऱ्हा वेगवगेळ्या आहेत. सिनेमातील मराठी पोरी गाण्यात म्हंटल्याप्रमाणे ‘कोणी नाचून साचून, कोणी भावूक तर कोणाच्या जिभेवर जाळ आहे.’

Jhimma 2 Marathi Review

पहिल्या भागातील सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांची जागा आता दुसऱ्या भागात रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोन नवीन पात्रांनी घेतली आहे. निर्मलाच्या सुनेच्या भूमिकेत रिंकू अगदी चपखल बसली आहे. सासू-सुनेच्या या नव्या जोडीने ‘झिम्मा २’मध्ये आपली वेगळीच छाप पाडली आहे. तर वैशालीच्या भाचीच्या भूमिकेलाही शिवानीने पूर्ण न्याय दिला आहे. सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव यांनी पहिल्या भागाप्रमाणेच वेगवेगळ्या वयांतील आणि परिस्थितीतील स्त्रिया उत्तमरित्या साकारल्या आहेत. सोबत त्यांनी त्यांच्या भूमिका पडद्यावर उभारताना त्या प्रेक्षकांना बटबटीतील दिसतील असं काहीही केलेलं नाही.

त्यांत नैसर्गिक वाटणारी ही पात्र तुम्हाला (प्रेक्षकांना) तुमच्या आजुबाजुचीच आहेत! असे भासते. त्या ताकदीने कलाकारांनी त्यांची पात्र रेखाटली आहेत. याचं श्रेय संवाद लेखिका इरावती कर्णिक हिचे देखील आहे. एकाचवेळी आठ उपकथानक पडद्यावर सुरु आहेत. त्यामुळे प्रेक्षक कोणत्या तरी किमान एका प्रवाहाकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. सिनेमा लेक डिस्ट्रिक्ट मधील नयनरम्य दृश्ये आपल्याला डोळ्यांना आनंद देतात. याचे संपूर्ण श्रेय सिनेमॅटोग्राफरला जातं. अमितराजच संगीत आणि क्षितिज पटवर्धन याचे शब्द सिनेमाला प्रवाही बनवतात. पहिल्या भागाप्रमाणेच हा दुसरा भागसुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं भरभरून मनोरंजन करणारा आहे.

सिनेमा : झिम्मा २
निर्मिती : ज्योती देशपांडे, आनंद एल राय, क्षिती जोग
कथा, दिग्दर्शक : हेमंत ढोमे
पटकथा, संवाद : इरावती कर्णिक
कलाकार : सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर
संगीत : अमितराज
गीत : क्षितिज पटवर्धन
दर्जा : ३ स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy