Home » Juna Furniture Movie Review: ‘भक्कम’ जुनं फर्निचर!

Juna Furniture Movie Review: ‘भक्कम’ जुनं फर्निचर!

Juna Furniture Review

‘काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? हाताचं बोट धरून आम्ही मुलांना वाढवतो. त्यांना जीवनाचा मार्ग दाखवतो, त्यांना सक्षम बनवतो. त्यांच्या सुखात आपलं सुख बघतो. स्वतःचे दुःख लपवतो. अभयचा जन्म झाल्यापासून सुहासनं कधी नवीन साडी घेतल्याचं आठवत नाही. मी तिला विचारलं तर; ती म्हणते, ‘आहेत त्या काय करु?’ दागिन्यांची प्रचंड आवड तिला. पण, याला वाढवण्यात सर्व विकले. अभयला काहीही कमी पडू द्यायचं नव्हतं. शेजारी-पाजाऱ्यानी विचारलं तर म्हणायची, ‘सोन्याची एलर्जी आहे हो.. रॅश येतो. एकदाका अभय कमावता झाला ना.. मग, सगळे शौक पूर्ण करु’. हे असे विचार माझेच नाही तर सगळ्या आई-वडिलांचे असतील. त्याच्यासाठी मुलं ही ‘प्रायोरीटी’ असतात आणि तीच मुलं मोठी झाल्यावर आई-वडील त्यांच्यासाठी ‘लायबलिटी’ होतात.’ वय वर्ष ७० असलेल्या गोविंद पाठकची (महेश मांजरेकर) ही कथा त्या प्रत्येक पाल्याला आरसा दाखवणारी आहे. जो जाणीवपूर्वक वा अनावधानाने आपल्या जन्मदात्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. सिनेमाचे नाव जरी ‘जुनं फर्निचर’ आहे; तरी तो प्रेक्षकांना खूप काही ‘नवं’ देऊन जाणारा ‘भक्कम’ भावपट आहे.

गोविंद पाठक आणि सुहास पाठक हे वृद्ध दाम्पत्य आपल्या बोरिवली येथील घरात एकटे राहत असतात. त्यांचा मुलगा हा आयएएस अधिकारी आहे. अभय (भूषण प्रधान) असं त्याचं नाव. त्याचे लग्न अवनी नावाच्या (अनुषा दांडेकर) श्रीमंत घराण्यातील तरुणीशी झालेले असते. ऐपतीच्या बाहेर जाऊन खर्च करुन गोविंद यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं थाटामाटात लग्न लावून दिलेलं असतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रधान सचिव म्हणून आता अभयची नियुक्ती होणार असते. दरम्यान दस्तुरखुद्द गोविंद पाठक आपल्या मुलावर हत्येचा आरोप घेतात. पत्नी सुहासचे (मेधा मांजरेकर) अर्थात अभयच्या आईची हत्या ही अभयच्याच निष्काळजीपणामुळे, दुर्लक्ष केल्याने झाली.. असल्याचा आरोप ते करतात आणि थेट न्यायालयात जाऊन पोलिसांना ‘एफआयआर’ नोंदवून घेण्यास भाग पाडतात. थोडं अलीकडचं कथानक सांगायचं झालं तर; अभयने त्याच्या वडीलांच्या निवृत्तीचे पैसे त्यांच्या भविष्याच्या तरतूदीसाठी गुंतवलेले असतात आणि त्यांच्या बँक खात्याचे व्यवहारही तोच बघत असतो. त्यामुळे गोविंद यांना वारंवार अभयकडे पैसे मागावे लागतात. एक दिवस अभयच्या आईला हृदयविकाराचा झटका येतो. गोविंद अभयला फोन करतात, सूनेलाही संपर्क करण्याचा पर्यंत करतात. पण, अभयच्या व्यग्रतेमुळे संपर्क होत नाही. सुहासवर उपचार होण्यास विलंब होतो आणि तिची प्राणज्योत मावळते. आणि म्हणूनच आता संतप्त ‘बाप’ काही ठोस पावलं उचलून स्वतःच्याच मुलाला न्यायालयात खेचतो. (Juna Furniture Movie Review)

स्वतःच्या ऐपतीच्या बाहेर जाऊन मुलाचं संगोपन करुन उतारवयात आपलाच मुलगा आपल्याला परके करतो; ही बाब कोणत्याही बापाला अस्वस्थ करणारी आहे. तशी ती गोविंद पाठकला देखील करते. दुखावलेला गोविंद पाठक न्यायालयासमोर मुलाकडून ४ कोटी ७२ लाख ८६ हजार शंभर रुपये इतक्या भरपाईची मागणी करतो. आता हीच निश्चित रक्कम का? आणि त्यामागचा ‘हिशोब’ तुमच्या भुवया उंचावणारा आणि समर्पक आहे. आता तुम्ही म्हणाल मुलाचं संयोपन आणि त्यांच्या पालन-पोषणाचा खर्च करणे; हे प्रत्येक आई-वडिलांचे नैतिक कर्तव्य आहे. कथेच्या या वळणावर लेखक म्हणून पटकथेत टाकलेली ही गुगली तुमच्या भुवया उंचावेल. पटकथेत लेखक मानवी भावभावनांना स्पर्श देखील करतो. त्यामुळे लेखक-दिग्दर्शक म्हणून परिपक्व पट डोळ्यासमोर उभा राहतो. सोबतच कथानकात पुढे काय होऊ शकत? याचे अंदाज बांधण्यासाठी लेखक सफाईदारपणे काही ‘संकेत’ही देतो. ज्यामुळे प्रेक्षक सिनेमात अधिक गुंतला जातो. (Juna Furniture Review)

कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि शीर्षक भूमिकेत महेश मांजरेकर विशेष भाव खाऊन जातात. संपूर्ण जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर त्यांनी नेला आहे. कोर्ट रूम ड्रामा चपखल बसला आहे. या दृश्यांचे चित्रीकरण सिनेमॅटोग्राफरनं रेखीव केलं आहे. आजवर आपल्या कित्तेक सिनेमांमधून ‘वास्तव’ पडद्यावर मांडणाऱ्या महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा आपल्या कलाकृतीतून समाजाच्या मर्मावर बोट ठेवलं आहे. ‘वास्तव’, ‘अस्तित्व’, ‘निदान’, ‘विरुद्ध’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ’ नंतर आता ‘जुनं फर्निचर’च्या निमित्ताने समाजाचा ‘विस्तव’ मांजरेकरांनी पडद्यावर सफाईदारपणे पेटवला आहे. अभिनयाच्या जोरावर महेश मांजरेकरांनी स्वतःला पुन्हा एकदा अव्वल ठरवलं आहे. आजवरच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात उजवं काम त्यांनी यावेळी केलं आहे. पत्नीच्या भूमिकेत मेधा मांजरेकर, मुलगा आणि सुनेच्या भूमिकेत भूषण प्रधान – अनुषा दांडेकर, वकील डॉ. गिरीश ओक, सासरे समीर धर्माधिकारी, न्यायमूर्ती म्हणून सचिन खेडेकर, भाई.. उपेंद्र लिमये यांनी आपापल्या भूमिका सुरेख साकारल्या आहेत. इतर कलाकारांनीही उत्तम साथ दिल्याने चांगलीच भट्टी जमली आहे.      

अंतिमतः आपल्या पोटच्या मुलाला कोर्टात खेचणाऱ्या बापाची ही गोष्ट आहे, ज्या मुलावर आईच्या मृत्यूनंतर हत्येचा आरोप त्याचे वडील करतात, आता यापुढे काय होणार आहे, हे सिनेमा पाहिल्यानंतरच उलघडेल. जे तुम्ही सिनेमागृहात जाऊन जरुर पहावं; आणि त्यातून विचार करावा.  

सिनेमा : जुनं फर्निचर
निर्मिती : यतिन जाधव, सत्य-सई मांजरेकर
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन : महेश मांजरेकर
कलाकार : महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये, गिरीश ओक
छायांकन : अजित रेड्डी
संगीत : हितेश मोडक
दर्जा : साडेतीन स्टार 

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy