Home » Butterfly Marathi Movie Review: गृहीत गृहिणीची वास्तवदर्शी गोष्ट!

Butterfly Marathi Movie Review: गृहीत गृहिणीची वास्तवदर्शी गोष्ट!

सिनेमात बॅटमिंटन कोच साहिल (महेश मांजरेकर) यांच्या तोंडी एक वाक्य आहे… ‘फ्लोट लाइक अ बटरफ्लाय, स्टिंक लाइक अ बी’ अर्थात.. ‘स्वत:ला इतकं हलकं बनवा की, बॅटमिंटन कोर्टवरच्या तुमच्या हालचाली एखाद्या फुलपाखरा सारख्या वाटल्या पाहिजेत. स्वत:ला इतकं स्ट्राँग बनवा की, समोरच्याला कळता कामा नये शॉट कुठून आलाय आणि किती पटकन आलाय.’ (उपरोक्त मूळ उद्गार हे बॉक्सिंग चॅम्पीयन मुहम्मद अली याचे आहेत.) आता तुम्ही म्हणाला हा उपदेश केवळ खेळाच्या मैदानापुरताच मर्यादित आहे का? तर तसं मुळीच नाही. मेंदूला थोडा जोर देऊन विचार करा.. तुमची आई, तुमची पत्नी.. (किंवा तुम्ही स्वतः कोणाची आई, पत्नी असाल तर..) ही (ती) सुद्धा अशीच असते की! सूर्योदयाअगोदर ती उठते आणि रात्री उशिरा ती हातातलं सर्व काम आटपून घरातल्यांच्या नकळत झोपते. अधिक अधोरेखित करायचं झालं तर प्रत्येक घरातील ‘गृहिणी’ ही अशीच असते. तिच्या शिवाय घरात कोणाचं पान हलत नाही. पण, मोबदल्यात तिच्या पदरी काय येत? काही मोबदला मिळावा; अशी तिची मुळीच अपेक्षा नसते. परंतु, आपण सर्व ‘ती’ला गृहीत धरत असतो.

घरातील गृहिणी सर्वकाही करत असते! कधी आपल्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासू-सासऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी… प्रत्येकासाठी. पण, ती स्वतःसाठी काय करते? याचं उत्तर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. कारण, ती स्वतःसाठी काहीच करत नाही. ‘होम मेकर’ही अविरत भूमिका ती कायम निभावत असते; अशीच एक ‘होम मेकर’ असलेल्या मेघा देशपांडेची (मधुरा वेलणकर) वास्तवदर्शी गोष्ट दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिने ‘बटरफ्लाय’ या आपल्या पहिल्यावहिल्या दिग्दर्शकीय सिनेमातून आपल्या समोर मांडली आहे. (Butterfly Movie Review)

 

 

सिनेमाच्या श्रेयनामावली आणि कलाकारांच्या यादीकडे नजर टाकल्यावर तुम्हाला दिसून येईल की, ‘एखाद प्रायोगिक.. एक्सप्रिमेंटल नाटक बसवण्यासाठी धडपड करतं, समविचारी हरहुन्नरी कलाकार एकत्र येऊन प्रयोगशील कलाकृती बनवतात’ तसंच काहीस ‘बटरफ्लाय’ सिनेमाच्या बाबतीत झालं आहे. कल्याणी पाठारे आणि आदित्य इंगळे यांनी या सिनेमाचे संवाद सर्वसमावेश लिहिले आहेत. योग्य ठिकाणी विनोदबुद्धी, गांभीर्य आणि सुसंवाद घडवणारी तुमची आमची बोलीभाषा सिनेमाच्या संवादात आपल्या कानी पडते. उगाच शब्दाला शब्द जोडून.. सूर आणि यमक जुळवण्याचा अट्टाहास इकडे दिसत नाही.

आजवर आपल्या संवेदनशील अभिनयामुळे सर्वांच्या परिचयाची असलेली अभिनेत्री विभावरी देशपांडे हिने सिनेमाची कथा-पटकथा लिहिताना बारकाईने संभाव्य परिस्थितीचा आणि प्रसंगांचा विचारपूर्वक अभ्यास केलेला जाणवतो. हलकी-फुलकी पण प्रभावी अशा पटकथेच श्रेय हे दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिचे देखील आहे. मुळात दिग्दर्शिका मीरा वेलणकर हिने स्वतःच्या कक्षा रुंदावून या सिनेमाचे दिग्दर्शन केले. सिनेमातील काही गिमिक्स सीन्स देखील तिनं पटकथेत अचूक पेरले आहेत. ज्यांना मानवी स्वभावाच्या सवयीचा आधार आहेत. (हे गिमिक्स सीन्स मी इकडे लिहिणे योग्य ठरणार नाही. पण, ते पाहताना आपल्या, तुम्हा प्रेक्षकांना नक्कीच रिलेट होतील.)

बटरफ्लाय हा एक असा चित्रपट आहे जो प्रत्येक गृहिणी कळकळ आणि परिचितता व्यक्त करतो. सुंदर संवाद लेखनासह पात्रांच्या अचूक कास्टिंगमुळे कथेत प्राण फुंकले गेले आहेत. चित्रपटात एक ताजेपणा आहे, जो प्रयत्नशील जो तांत्रिक बाजूनी अधिक उठावदार बनवला आहे. कलाकारांचं अभिनय कौशल्य आणि  छायांकनातील प्रयोगशीलतेमुळे सिनेमा अधिक अधोरेखित होतो. चित्रपट दिसायला ‘सोप्या’ परंतु तितक्याच ‘क्लिस्ट’ विषयांचा शोध घेतो आणि तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. ही सर्जनशील निर्मिती इतर समविषयीन सिनेमांप्रमाणे बटबटीत नाही. ती अत्यंत वास्तवदर्शी आणि ‘साधी-सरळ-सोप्पी’ आहे.

 

Butterfly Movie Review

 

सिनेमाचे कथानक इकडे फार लिहिण्यापेक्षा ते सिनेमा गृहात पाहणं अधिक रंगतदार आहे. मेघा (मधुरा वेलणकर) ही एका गृहिणी आहे. नवरा, मुलं, सासरे आणि ती असं त्यांचे चौकोनी कुटुंब आहे. या गृहिणीच्या एका स्वप्नाचा प्रवास सिनेमात रंजकतेने दाखवण्यात आला आहे. ती सुरुवातीला काहीसा विरंगुळा म्हणून एका बॅटमिंटनच्या क्लासेसला जाते. पण, याबात ती घरच्यांना सांगत नाही. ते का? यामागचं कारणही मजेशीर आहे (सिनेमात समजेल).ती तिच्या रोजच्या दिनक्रमात स्वतःसाठी दोन-तीन तास काढून नियमित बॅटमिंटनच्या क्लासला क्लबमध्ये जात असते. ती इतकी चांगली खेळू लागते की, आता ती स्पर्धेत टूर्नामेंटला उतरली आहे. पण, ज्या दिवशी तिची मॅच असते.. त्याच दिवशी तिला एका महत्वपूर्ण घरच्या कामही करायचं आहे. ते कोणतं? का? कशासाठी? अशा बऱ्याच उपप्रश्नांची उत्तर कथानकात तुम्हाला मिळतील. पण, ती ही मॅच खेळते का? की.. ते घरच काम करण्यासाठी मॅच खेळत नाही? याचं उत्तर बरंच काही शिवणारं आहे.

सिनेमातील सर्वच कलाकारांनी रेखीव आणि अधोरेखित करण्याजोगं सहज-सुंदर काम केलं आहे. ‘स्लाईस ऑफ लाईफ’ प्रमाणे प्रत्येकाची आपापली भूमिका निभावली आहे. मधुरा वेलणकर हिने तिची मेघा ही भूमिका पडद्यावर जगली आहे. काही प्रसंगांमधील तिचा भाव अत्यंत हृदयद्रावक आहे. अभिजीत साटम, प्रदीप वेलणकर, महेश मांजरेकर, सोनिया परचुरे आणि बालकलाकार राधा धारणे… सर्वांनी चोख काम केलं आहे.

जरूर पाहावा, समजून घ्यावा आणि असा हा सिनेमा तुम्ही नक्की तुमच्या आई सोबत, पत्नीसोबत पाहा!

 

सिनेमा : बटरफ्लाय
निर्माते : अजित भुरे, अभिजित साटम, मधुरा वेलणकर साटम
दिग्दर्शन : मीरा वेलणकर
कथा : विभावरी देशपांडे
पटकथा : विभावरी देशपांडे, मीरा वेलणकर
संवाद : कल्याणी पाठारे, आदित्य इंगळे
कलाकार : मधुरा वेलणकर साटम, अभिजित साटम, महेश मांजरेकर, प्रदीप वेलणकर, सोनिया परचुरे, राधा धारणे
छायांकन : वासुदेव राणे
संकलन : जयंत जठार
दर्जा : साडे तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy