Home » Baaplyok Movie Review: बापजन्माची कहाणी

Baaplyok Movie Review: बापजन्माची कहाणी

Baaplyok Movie Review In Marathi

‘बाप हा बाप असतो आणि आई ही आई असते’, हे शब्द अनेकदा कानावर पडत असतात. मात्र आई-बापाची जागा कोणीच भरुन काढू शकत नाही हे देखील तितकंच जगमान्य सत्य आहे. नात्यांमध्ये कधी-कधी खटका उडतो, कधी दु:ख वाटेला येतं मात्र नात्यांमधील आनंद कायम टिकवून ठेवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन, हेवेदावे बाजूला ठेवून नाती जपावी लागतात आणि मुख्य म्हणजे नात्यात संवाद असावा लागतो. लहानपणापासून आपण आपल्या आईच्या अधिक जवळचे असतो. आई म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगण्यासाठी असलेली आपल्या हक्काची व्यक्ती. आपल्यावर खूप जीव लावणारी, आपल्याला जे हवं ते देणारी, प्रत्येक संकटातून मार्ग काढणारी, आपल्यावर खूप प्रेम करणारी, मायेने न्हाऊ- माखू घालणारी घरातील एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई.

त्याउलट आपल्यावर सतत रागवणारे, मारणारे, कडक शिष्टीचे, आपल्याला प्रत्येक गोष्टीत अडवणारे, आपल्या स्वप्नांचं चुराडा करणारे म्हणजे ‘बाबा’. या दोघांच्याही अशाच काहीशा प्रतिमा आपल्या मनात लहानपणापासून कोरल्या गेल्यात. बाप म्हणून जगणाऱ्या त्या एक व्यक्तीच्या आयुष्यात किती अडचणी असतात याची जाणीव आपल्याला त्याच्या जागी गेल्यावर होते. त्यांच्या मनावर घरच्या जबाबदाऱ्यांचं किती ओझं आहे, हे मुलांना मोठं झाल्यावर कळतं. असाच एका बाबांच्या आयुष्याची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘बापल्योक’. (Baaplyok Movie Review)

आपल्या सशक्त कलाकृतींतून आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि मकरंद माने ही दोन नावं ठळकपणे समोर येतात. रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब, समाजातील वास्तव, सोबत मानवी भावभावना आपल्या चित्रपटांमधून दाखवताना आपल्या मातीशी असलेली नाळ या दोघांनी कायम जपली. चित्रपटसृष्टीतील हे दोन समांतर पण वेगवेगळ्या वाटेवर चालणारे दिग्दर्शक. परंतु, करोना काळातून मराठी मनोरंजनसृष्टी आपलं डोकं वर काढत असताना दिग्दर्शक मकरंद माने, लेखक अभिनेता विठ्ठल काळे आणि शशांक शेंडे यांनी ‘बापल्योक’चा घाट घातला. सिनेमा पाहून नागराज मंजुळे याने सिनेमाला पाठिंबा देण्याचं ठरवलं आणि तो सिनेमाचा प्रस्तुतकर्ता बनला.

वडील -मुलाचे नाते हे नेहमीच तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. मुलाची आईसोबत जितकी जवळीक, मैत्रीपूर्ण नाते असते, तितकीच भीती, दरारा वडिलांबाबत असतो. एकमेकांमध्ये सुसंवाद नसतो, अनेकदा एकमेकांविषयी प्रेम असूनही ते व्यक्त करण्यासाठी दोघेही संकोच करतात. अशाने त्यांच्या नात्यातील दरी अधिकच खोल होत जाते. अशा या गुंतागुंतीच्या नात्यावर भाष्य ‘बापल्योक’ भाष्य करतो. सिनेमाचा नायक विठ्ठल काळे याने या सिनेमाची कथा लिहिली आहे. त्यावर दिग्दर्शक मकरंद माने याने संवाद आणि पटकथेचा साज चढवला आहे. हा साज चढवताना संवाद लेखकाने वास्तविक बोलीभाषेचा प्रयोग केलाय; जो सिनेमाला परिणामकारक बनवतो. (Baaplyok Movie Review In Marathi)

निम्म्याहून जास्त सिनेमात तात्या आणि सागरचा स्कुटरवरचा विविध ठिकाणी होत असलेला प्रवास दिसतो. पण हा प्रवास कुठेही कंटाळवाणा वाटतं नाही. सिनेमाचं आटोपशीर कथानक ही जमेची बाजू म्हणावी लागेल. गाणी आणि संगीत श्रवणीय झालंय. याशिवाय सिनेमातले संवाद खूप साधे तरीही विचार करायला भाग पाडतात असे अर्थपूर्ण आहेत. अनेक छोट्या-छोट्या संवादांमधून सिनेमाची रंगत आणि गंमत आणखी वाढते. शहरातील नोकरी सोडून सागर पुन्हा आपल्या गावी आलाय. लग्नाचं वय उलटून जाण्याच्या उंबरठ्यावर आता त्याच लग्न ठरलं आहे. लग्नासाठी तो गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे. दरम्यान, त्याचं त्याच्या वडिलांशी संभाषणाच्या बाबतीत थोडंसं फाटलेलं आहे. अशात भावकीत आणि नातेवाईकांना लग्नाच्या पत्रिका घरोघरी, गावोगावी जाऊन द्यायच्या आहेत. पण, तात्या आणि सागरला एकत्र एकमेकांसोबत जायचं नाहीय. कारण, त्यांचं एकमेकांशी पटत नसते. शब्दाला-शब्द वाढतो आणि त्यांच्यात नेहमीच वाद निर्माण होत असतो. बापाचं दुःख सागरला समजत नसतं आणि तात्यांना त्यांच्या मुलाचं दुखणं उमजत नसतं. त्यामुळे त्यांचं तोंड नेहमीच विरुद्ध दिशेला असतं. आता लग्नाच्या पत्रिका गावोगावी कोण वाटायला जाणार? इकडून या रंगतदार सिनेमाची कथा सुरु होते. कर्मधर्म संयोगाने पटकथेत तात्या आणि सागरला एकमेकांचे चेहरे पाहत पत्रिका वाटण्यासाठी गावोगावी फिरावं लागतं. याच प्रवासात पितापुत्राच्या नात्याची उलगडत जाणारी घडी दिग्दर्शकाने सुचतेने पडद्यावर मांडली आहे.

Baaplyok Movie Review In Marathi

सरणारी वर्षं आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जातात. अर्थात या नात्यात सूर गवसला तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतो. असंच काहीस करण्याचा प्रयत्न सिनेमाच्या कथानकात दिसतो. मकरंद याने हा प्रवास मांडताना अनेक ठिकाणी ‘सिम्बॉलिज्म’चा खुबीने वापर केला आहे. ‘तिरक्या रेघेवरच असतं बापल्योकाचं नातं. ताणलं तर आयुष्यभराचं ताणतं,अन् घावलं तर?…तेच हुडकण्याचा’ प्रयत्न सिनेमात होतो.

‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल काळे यांनी लिहिली आहे. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे याने संगीत आणि पार्श्वसंगीताचा साज उल्लेखनीय चढवला आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना रंगत वाढवतो. उपरोक्त म्हंटल्याप्रमाणे निम्म्याहून अधिक सिनेमा विठ्ठल काळे आणि शशांक शंडे यांच्यावर चित्रित झाला आहे. दोघांची केमिस्ट्री, संवादांची जुगलबंदी खूप छान रंगली आहे. मयुरी झालेल्या पायल जाधवचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही नैसर्गिक आहे. आईच्या भूमिकेत नीता शेंडे सुद्धा लक्षात राहतात.

सिनेमा : बापल्योक
निर्मिती : नाईंटीनाईन प्रोडक्शन्स, बहुरूपी प्रोडक्शन्स
दिग्दर्शक : मकरंद माने
कथा : विठ्ठल काळे
पटकथा, संवाद : मकरंद माने, विठ्ठल काळे
कलाकार : शशांक शेंडे, विठ्ठल काळे, नीता शेंडे, पायल जाधव
छायांकन : योगेश कोळी
संकलन : आशय गाताडे
दर्जा : तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy