Home » Hee Anokhi Gaath Movie Review: प्रेमाची ‘गाठ’ सांधणारी मनभावना!

Hee Anokhi Gaath Movie Review: प्रेमाची ‘गाठ’ सांधणारी मनभावना!

Hee Anokhi Gaath Review

अलीकडे एका अपरिचित कवीच्या ओळी वाचल्या.. सुमित कुमार असं त्याचं नाव. त्या ओळी अशा होत्या की, ‘मानव है मृगतृष्णा से व्यथित, करता प्रयास सर्वथा अधिक। नहीं जब वो वांछित पाता, अंततः बहुत पछताता।।’ बरं हे शब्द आठवण्याचे कारण म्हणजे ‘ही अनोखी गाठ‘ हा सिनेमा. आता ‘मृगतृष्णा’ म्हणजे काय? ‘मृग जळ’ हा शब्द पाण्याचा आपल्या समोर भास होणे व त्याला जस जसे पिण्याच्या उद्देशाने पुढे पुढे जावे तस तसे ते पुढे पुढे असल्याचे प्रतीत होते. यासगळ्यात  तहान भागत नाही मात्र उन्हाळ्यात अधिकच तहान लागून जीव कासावीस होतो व ते पाणी कोठेही दिसत नाही व शरीरातील हरणाचे पाणी कमी झाल्याने ती जी बैचेन अवस्था आहे तिला ‘मृगतृष्णा’ म्हणतात, की जी मृगजळाने तिची केली. सारांश अर्थी म्हणायचे झाले तर.. जी गोष्ट अस्तित्वात नाही मात्र भासमान होते त्या गोष्टीसाठी केलेला प्रयत्न म्हणजे ‘मृगतृष्णा’. जी कधीच सिद्धीस जात नाही अशी गोष्ट. आता हा ऊहापोह करण्याचा हेतू म्हणजे; असंच काहीस ‘ही अनोखी गाठ’ सिनेमात दडलेलं आहे. (Hee Anokhi Gaath Movie Review)

‘अमला’ या तरुणीची कहाणी आहे. एका मृगसमी ती आकर्षणाच्या मागे धावत असते. आकर्षणाच्या आसक्ती कडून निस्वार्थी प्रेमाच्या सावलीत विसावा घेण्याचा प्रवास घडवणारी ही ‘गाठ’; लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बांधली आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या त्यांच्याच ‘पांघरुण’ सिनेमातील गीतकार वैभव जोशी याने लिहिलेल्या ‘ही अनोखी गाठ’ गाण्याचे शब्द यावेळी त्यांनी सिनेमाच्या शीर्षकासाठी निवडले आहेत. सरळ, साध्य प्रेमाची ही अनोखी गाठ अगदी रंजक आणि व्यवहारी परिस्थितीतील आहे. आकर्षणात अडकलेल्या ‘आमला’च्या नजरेवरील ‘हव्यासाची’ झापडे फाडणारा हा मर्मपट आहे. हांव ही निरंतरची तृष्णा असते जिचे उपशमनच होणे अशक्य असते. सतत ‘हवे हवे’ म्हणायला भाग पाडते ती हाव असते. तिचे समाधान कशानेच व केव्हाही होत नाही. अशी ‘हांवरट’ माणसे नेहमीच बुभुक्षित-भुकेजलेली असतात वाटतात व वागतात. याच गुणदोषाभोवती फिरणारी अमला (गौरी इंगवले) ची गोष्ट आहे. (Hee Anokhi Gaath)

महाबळेश्वर येथे सिनेमाच्या लोकेशन्सची पाहणी करण्यासाठी आलेल्या सिनेमॅटोग्राफर रोहितची (ऋषी सक्सेना) नजर बेभान, बेधुंद होऊन नाचणाऱ्या अमलावर पडते आणि तो तिच्याकडे आकर्षित होतो. पहिल्या काही भेटींमध्येच तो तिच्या आणि तीही त्याच्या प्रेमात पडते. आता हे खरंच ‘प्रेम’ की निव्वळ ‘आकर्षण’ हे तुम्हाला सिनेमात वेळ आल्यावर समजेल. परंतु, एकीकडे आमला प्रेमात पडलेली असताना दुसरीकडे तिचा बाबा (शरद पोंक्षे) ज्यांना ती ‘हिटलर’ असं म्हणत असते; ते कर्मधर्म संयोगाने तिचं लग्न वयाने मोठ्या मुलाशी अर्थात श्रीनिवास (श्रेयस तळपदे) शी ठरवतात. श्रीनिवास हा आमला पेक्षा वयाचे दहावर्षे मोठा असतो. तो देखील आपल्या आजारी आईच्या आग्रहाखातर लग्नाला उभा राहतो. परंतु, श्रीनिवास हा अत्यंत विवेकी आणि समजूतदार आहे. त्याउलट अमलाचा स्वभाव अत्यंत उथळ आहे. मनाविरुद्ध लग्न झाल्याने आमलाचं संसारात लक्ष नसते. ही बाब श्रीनिवासला जाणवते आणि तो ही निसटलेली घडी सरळ करण्याचा प्रयत्न करतो. आता या प्रयत्नात नेमकं ‘आकर्षण’ जिंकते वा ‘प्रेम’ हे सिनेमाअंती तुम्हाला समजेलच. उपरोक्त म्हंटल्याप्रमाणे ‘ही अनोखी गाठ’ अगदी सरळ, साधी, निरागस आहे. गौरी इंगवले, श्रेयस तळपदे आणि ऋषी सक्सेना यांनी सुंदर कामं केली आहेत. गौरीने स्वतःच्या भूमिकेचा ‘टेम्पो’ उत्कृष्टपणे ‘हाय’… वरचा ठेवला आहे. तर श्रेयसच्या पात्रासाठी ठेहराव तुम्हाला विवेकपूर्ण व्यक्तीचे दर्शन घडवतो. सोबतच शरद पोंक्षे यांनीही पडद्यावर कमाल घडवली आहे. त्यांच्या अभिनयातील प्रभावीपणा वेळोवेळी पडद्यावर दिसतो.  

सिनेमातील सर्वच गाणी.. विशेषकरून ‘मुशाफिरा’ हे गाणे गीतकार वैभव जोशी याने उत्कृष्ट लिहिले आहे. संपूर्ण सिनेमाचा सार त्याने या ‘मुशाफिरा’ गाण्यात शब्दबद्ध केला आहे.वैभव लिहितो की, ‘नकोस थांबू इथे तिथे..जरी सावली खुणावते, पुकारते चांदणे कधी.. कधी भुलवते निळी नदी, नकोस थांबू चुकूनही.. भुलूनही वा थकूनही.’ या ओळी आमलाच्या व्यक्तिरेखेच्या प्रवासाची सफर घडवतात. दिग्दर्शनासोबतच कथा-पटकथा लेखन करणाऱ्या मांजरेकरांनी पती-पत्नीच्या नात्यासोबतच वडील-मुलगी, प्रियकर-प्रेयसी, आई-मुलगा, सून-सासू, मैत्रीणी यांच्यातील नातीही बारकाईने सादर केली आहेत. सिनेमाची गोष्ट; अमला तिच्या वडिलांचा फोननंबर तिच्या मोबाईल फोनमध्ये ‘हिटलर’ असा सेव्ह असण्यापासून तो बदलून नंतर ‘बाबा’ होण्याचा प्रवास घडवते. सोबतच एका श्रीमुखात भंडावण्यापासून ते दुसऱ्या श्रीमुखातय पडद्यापर्यंत सिनेमा अनेक रंजक वळणं घेत तुमचं मनोरंजन करतो आणि काहीअंशी संस्कारांचे चिमटे ही काढतो.. जे ज्याचे त्याने स्वतः समजून घ्यायचे आहे. ते सिनेमातून सामावून सांगण्याचा हट्ट दिग्दर्शकाने मुळीच केलेला नाही. साधी, सरळ, सोपी गोष्ट त्याने पडद्यावर सादर करत प्रेक्षकांकडे सुपूर्त केलीय.    

निर्मिती : झी स्टुडिओज, महेश मांजरेकर मुव्हीज
लेखक, दिग्दर्शक : महेश मांजरेकर
संवाद : सिद्धार्थ साळवी
गीतकार – वैभव जोशी, मंदार चोळकर
संगीत : हितेश मोडक
कलाकार : श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, सुहास जोशी, शरद पोंक्षे, दीप्ती लेले, सुरभी भावे
दर्जा : तीन स्टार

 

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy