Home » Panchak Movie Review: कोकणी माणसांची हलकीफुलकी गोष्ट ‘पंचक’

Panchak Movie Review: कोकणी माणसांची हलकीफुलकी गोष्ट ‘पंचक’

Panchak Movie Review In Marathi

मराठीतला आगळ्या वेगळ्या विषयावरील असा हा ‘पंचक’ सिनेमा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची जोरदार चर्चा होती. त्याच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. खोतांच्या घरात अचानक वेगवेगळ्या घडामोडी घडताना ट्रेलरमध्ये आपण पाहिलं आहे. घरातील एक एक माणूस मृत्यूमुखी पडत आहे. मात्र हे सगळं का आणि कसे होत आहे याविषयी कुणालाच माहिती नाही. त्याचं उत्तर म्हणजे ‘पंचक’. घरातील एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर ती वेळ ‘पंचक’ची असेल तर त्या व्यक्तीच्या पाठोपाठ कुटुंबातील किंवा जवळच्या ५ व्यक्तींचं निधन होते; असा समज म्हणजे ‘पंचक’. या पंचकच्या भीतीपोटी कोकणातील खोत कुटुंबाची उडालेली घाबरगुंडी लेखक दिग्दर्शक राहुल आवटे, जयंत जठार यांनी पडद्यावर मांडली आहे.

पंचक‘च्या निमित्तानं घरात घडणाऱ्या घटना आणि गोंधळ केंद्रस्थानी ठेवत विनोदी, खुसखुशीत गोष्ट सांगणारा असा हा ‘पंचक’पट आहे. आता पुढचा नंबर कोणाचा? या भीतीखाली वावरणाऱ्या कुटुंबाची गोष्ट आणि त्याचा कथाबीज रंजक आहे. परंतु, या बिजा पासून सिनेमा वटवृक्ष मात्र तितका डोलदार बहरलेला दिसत नाही. पटकथेची बांधणी पडद्यावर कमकुवत दिसते. गोष्ट फुलवताना त्यातील प्रसंगांची खेळी ना लेखनात ना दिग्दर्शनात उतरली आहे. परिणामी प्रेक्षकांवरील प्रसंगांचा प्रभाव मर्यादित राहतो. (Panchak Movie Review)

चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि डॉ. श्रीराम नेने या पती-पत्नीने केली आहे. नव्या-जुन्या ताकदीच्या कलाकारांची फौज या चित्रपटात आपल्या भेटीला येते. ‘पंचक’ या गमतीशीर भीतीदायक चित्रपटाच्या गमतीजमती दिग्दर्शक जयंत जठार आणि राहुल आवटे यांनी विषय अगदी रंजक निवडला आहे. आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, सागर तळाशीकर, तेजश्री प्रधान, दीप्ती देवी, आरती वडगबाळकर आदी सर्वच कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका लिलया निभावल्या आहेत. एकत्र कुटुंबपद्धतीची गंमत ‘पंचक’ सिनेमात दिसते. कथानकात तीन पिढयांचे सदस्य एकत्र वावरत आहेत. कोकणात अगदी मुंबईतही दिवाळी, गणेशोत्सवासारख्या सणाला कुटुंबं एकत्र येतात, एकमेकांशी जोडलं जाण्याची, सुखदु:खात एकत्र साथ देण्याची भावना प्रत्येकात असते, तसंच दुःखाच्या वेळीही ते एकमेकांसाठी धावून येतात.. या ती कथेतूनही ती एकोप्याची भावना अधोरेखित करण्यात आलेली आहे. (Panchak Review)

पुराणातील काही उल्लेखांनुसार, रामायण काळात प्रभु श्रीरामांनी रावणाचा वध केला, तेव्हा पंचक लागले होते. ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ते अशुभ मानले जाते. पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, अशी मान्यता शास्त्रात आहे. हीच मान्यना ‘खोत’ कुटुंबियांच्या मनात आहे. परिणामी, त्यांची घाबरगुंडी उडालेली आहे. घरातील ज्येष्ठ अनंता भाऊ (दिलीप प्रभावळकर) यांचे वृद्धापकाळाने निधन होते. स्वभावाने आणि विचाराने ते ‘मॉर्डन’ होते. घरातील इतरांप्रमाणे ते जुन्या रुढी-परंपरांमध्ये अडकलेले नव्हते. म्हणूनच त्यांनी निधनापूर्वी मेडिकल कॉलेजला स्वतःचा ‘देह’ दान केलेला असतो. परिणामी, भाऊंच्या निधनानंतर खोतांच्या घरात एकच कल्लोळ उडतो. कारण, अंत्यविधी करण्यासाठी जोशी गुरुजी (विद्याधर जोशी) येतात आणि सांगतात की, ‘घराला ‘पंचक’ लागलं आहे.’ घरातील तरुण आणि  शास्त्रज्ञ असलेला माधव (आदिनाथ कोठारे) ‘पंचक’च्या मान्यतेचा विरोध करतो आणि पडद्यावर ‘पंचक’च्या निमित्ताने खेळखंडोबा सुरु होतो.

खोतांच्या घरातील बरीच मंडळी या ‘पंचक’मुळे घाबरलेली असतात. ‘आता कोणाचो नंबर..?’ असं म्हणणारी घरातील सुन कावेरी (नंदिता पाटकर) बोटूशी आहे. भाऊंची पत्नी उत्तरा आत्या (भारती आचरेकर) आपल्या पतीच्या निधनाचा आणि पंचकचा धक्का घेऊन बेशुद्ध होते. दुसरीकडे घरातील शिकला-सवरलेला मुलगा डॉ. अजय (सागर तळाशीकर) ही या पंचकचा तसा विरोधच करत असतो. घरातील इतर सदस्य आत्मा (आनंद इंगळे), अनुया (संपदा कुलकर्णी), विजय (आशिष कुलकर्णी), वीणा (दीप्ती देवी), भाग्या (गणेश मयेकर), नम्रता (आरती वडगबाळकर) आदी सर्व मंडळी बिथरली असतात. त्यात अनंता भाऊंचे बंधू आणि घरातील ज्येष्ठ बाळ (सतीश आळेकर) यांच्या पायावर माडावरचा नारळ पडतो आणि कावेरी डोक्यावर वंशवृक्षांची फांदी पडते. परिणामी, ‘पंचक’ बाबतचे भूत त्यांच्या मानगुटीवर अधिकच गच्च बसते. अशात हे भूत उतरवण्यासाठी माधव काय-काय शक्कल लढवतो? हे या ‘पंचक’मध्ये दडलेलं आहे.

आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, आशिष कुलकर्णी, गणेश मयेकर, आरती वडगबाळकर यांनी आपापला अभिनयाचा बाज उत्तम रंगवला आहे. छोट्या भूमिकेतील तेजश्री प्रधानही लक्षवेधी ठरते. दीप्ती देवी आणि नंदिता पाटकर या दोघींचा अभिनिवेश विशेष लक्षवेधी आहे. आपली भूमिका या दोघींनी बारकाईने वठवली आहे. सोबतच व्यक्तिरेखेतील ह्युमर त्यांनी अचूक पकडला आहे. तसचं दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर आणि विद्याधर जोशी यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांनी लक्षवेधी काम केलं आहे. सिनेमातील तांत्रिक बाबीही उत्तम जमून आल्या आहेत. संगीत, संकलन आणि छायांकन सिनेमाला रंगतदार बनवतात. हलकाफुलका हा बोधपट काहीसा विस्कळीत असला तरी बघण्याजोगा आहे. त्यामुळे तुम्ही जरुर सिनेमा पहा आणि ठरवा.. ‘पंचक’ हे खरंच असतं का?

सिनेमा : पंचक
निर्मिती : माधुरी दीक्षित नेने, डॉ. श्रीराम नेने
कथा, दिग्दर्शन : राहुल आवटे, जयंत जठार
पटकथा, संवाद : राहुल आवटे
कलाकार : दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर, विद्याधर जोशी, आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, गणेश मयेकर, आरती वडगबाळकर
संकलन : जयंत जठार
छायांकन : पूजा गुप्ते
दर्जा : तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy