Home » ‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार अभिनेता ऋषी सक्सेनाची एन्ट्री, दिसणार खास भूमिकेत

‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार अभिनेता ऋषी सक्सेनाची एन्ट्री, दिसणार खास भूमिकेत

आई कुठे काय करते? या मालिकेने टेलिव्हिजन जगतात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. टीआरपीच्या नवनवीन रेकॉर्ड करत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर नाव कोरले. मागील पाच वर्षांपासून ही मालिका सतत टॉपवर आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने या मालिकेत काम करताना एक नवीन ओळख मिळवली आहे. ही मालिका नेहमीच आपल्या रसिकांसाठी वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स घेऊन येत त्यांचे मनोरंजन करत असते. (Aai Kuthe Kay Karte, Rishi Saxena)

मालिकेतील अरुंधती आणि तिच्या आयुष्याभोवती फिरणारे कथानक प्रेक्षकांना चांगलेच भावले. आई कुठे काय करते या मालिकेतील कलाकारांनी देखील आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली. आतापर्यंत या मालिकेमध्ये अनेक नामवंत आणि मोठे कलाकार विविध भूमिका साकारताना दिसले. आता पुन्हा या मालिकेत नवीन कलाकाराची एन्ट्री होणार आहे. अभिनेता ऋषी सक्सेना या मालिकेत महत्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे.

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून अभिनेता ऋषी सक्सेना घराघरात पोहचलेला आणि लोकप्रिय झाला. त्याने पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेनंतर तो अनेक हिंदी, मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसला. आता ऋषी तब्बल सहा वर्षांनी मराठी मालिका विश्वामध्ये पुनरागमन करत आहे.

आई कुठे काय करते? या मालिकेत ऋषी हा मिहीर शर्मा ही भूमिका साकारणार आहे. मिहीर शर्मा हा एक उत्तम शेफ असून, त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती असते. मिहीरने आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणे शिकावे ही तिची इच्छा असते. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे शिक्षण घेण्यासाठी येतो. अशी एकंदरीत त्याची भूमिका आहे.

आई कुठे काय करते? या मालिकेत काम करण्याबद्दल ऋषीने त्याच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “‘स्टार प्रवाह’ या वाहिनीसोबत माझी अनेक दिवसांपासून काम करण्याची खूप इच्छा होती. अखेर ती इच्छा या निमित्ताने पूर्ण होत आहे. ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका संपूर्ण महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका आहे. आपल्या आवडत्या वाहिनीसोबत आणि आवडीच्या मालिकेत काम करायला मिळत असल्याने मी स्वतःला खूप नशीबवान समजत आहे.”

पुढे ऋषी म्हणाला, “खरं सांगायचे तर खूप दिवसांपासून मला सतत मराठी मालिकेत कधी दिसणार असे विचारले जात होते. मी देखील चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतल्या मिहीर या भूमिकेबद्दल मला विचारण्यात आले. मला ही भूमिका आणि माझी व्यक्तिरेखा खूपच आवडली. त्यामुळे मी लगेच यासाठी होकार दिला. मी \६ वर्षांनंतर मराठी मालिकेत काम करतोय. प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला आजपर्यंत खूप प्रेम दिले आहे. असेच प्रेम माझ्या या नव्या भूमिकेलाही ते देतील याची खात्री आहे.”

दरम्यान आई कुठे काय करते? ही मालिका मागील काही दिवसांपासून दुपारी टेलिकास्ट होत आहे. मात्र तरीही मालिकेच्या लोकप्रियेत घट झालेली नाही. आता मालिकेत येणार मिहीर शर्मा मालिकेला कोणते आणि कसे वळण देतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा…..

बॉलिवूडची ”पंगा क्वीन ते लोकसभा खासदार” जाणून घ्या कंगना रणौतचा प्रवास….

Spread the love

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy