Home » OMG 2 Movie Review: कानाडोळा होणाऱ्या विषयाचा बोलपट!

OMG 2 Movie Review: कानाडोळा होणाऱ्या विषयाचा बोलपट!

आपल्या समाजात, हस्तमैथुन (मास्टरबेशन) हे केवळ अश्लील आणि घाणेरडे मानले जात नाही तर बरेच लोक याकडे ‘पाप’ म्हणून देखील पाहतात. सेक्स आणि सेक्सशी संबंधित कोणतीही समस्या आपल्या देशात शतकानुशतके ‘निषिद्ध’ आहे. आणि कोणी याविषयी खुलेपणाने बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला एकत्र मारुन-मुडकुन गप्प केलं जातं किंवा त्याच्याकडे ‘कानाडोळा’ केला जातो एकंदरच ‘सेक्स एज्युकेशन’ सारखा महत्वपूर्ण विषयाकडे आपली शिक्षणव्यवस्था सोयीस्कररित्या कानाडोळा करते; यात दुमत नाही. लेखक-दिग्दर्शक अमित राय यांचा ‘ओएमजी २‘ केवळ या लैंगिक कृत्याला चर्चेत आणत नाही तर शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य करण्याचा जोरदार समर्थन देखील करते. परंतु, भारतीय किशोरवयीन प्रेक्षकांचं दुर्दैव हे की, त्यांना हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहता येणार नाही. ज्यांच्यासाठी का सिनेमा पाहणं महत्वाचं आहे. त्यानंच हा सिनेमा पाहता येणार नाही. कारण, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला २७ कट आणि ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. असे नसते झाले, तर आजच्या युगातील हा महत्त्वाचा विषय देशभरातील किशोरवयीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला असता आणि या विषयावर त्यांना एक नवीन दृष्टीकोन मिळाला असता. म्हणूनच ‘सेन्सॉर बोर्डा’ने त्यांच्या या ‘ए’ प्रमाणपत्राच्या निर्णयावर पुनर्विचार करणे आवश्यक आहे. (OMG 2 Movie Review

महाकालचा परम भक्त कांती शरण मुद्गल (पंकज त्रिपाठी) यांचा किशोरवयीन मुलगा विवेक (आरुष शर्मा) ची ही कथा आहे. अभ्यास, वाचन आणि लेखनात वेगवान असलेला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुढे असलेला विवेक हुशार मुलगा आहे. पण, काहीकारणास्तव तो हस्तमैथुन करण्याच्या आहारी जातो आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. ही, बाब सर्वत्र पसरल्याने त्याला केवळ शाळेतून काढून टाकले जात नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला समाजात आणि शहरात शरमेला सामोरे जावे लागते. आता या कुटुंबाकडे शहर सोडण्याशिवाय पर्याय उरत नाही, तर विवेक लाजेने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्नही करतो. पण, तेव्हाच भगवान शिवाचा दूत (अक्षय कुमार) येऊन कांतीला अचूक मार्ग दाखवतो. कांतीचे डोळे उघडतात आणि आपल्या मुलाचा मानसिक छळ केल्याबद्दल आणि त्याला सामाजिक पेचातून वाचवण्यासाठी शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करतो. तो आपल्या मुलाच्या लैंगिक अज्ञानासाठी शाळेला आणि स्वतःला जबाबदार धरून शैक्षणिक संस्थांमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करण्याच्या भागणीसाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्याच्या तयारीत असतो. आपल्या मुलाच्या अवस्थेसाठी जबाबदार असलेल्या लोकांनी त्याची माफी मागावी आणि शाळेत त्याला सन्मानाने परत घ्यावं; अशी त्याची इच्छा असते. शाळा त्यांचा बचाव करण्यासाठी वकील कामिनी माहेश्वरी (यामी गौतम) हिला पाचारण करतात, जी स्वतः हस्तमैथुनाला एक गलिच्छ आणि अनैतिक कृत्य मानते. सिनेमाच्या या वळणावर अनोखा ‘कोर्ट रूम ड्रामा’ सुरु होतो. न्यायाधीश पुरोषत्तम नगर (पवन मल्होत्रा) यांच्यासमोर कांती आणि कामिनी आपापल्या बाजू मांडतात. कांती असा युक्तिवाद करतो की, लैंगिक शिक्षण कोणत्याही नौटंकीशिवाय त्याच्या खऱ्या स्वरूपात शिकवले गेले पाहिजे तर कामिनीचा असा विश्वास आहे की, सुसंस्कृत समाजात हे शक्य नाही. न्यायालय कोणाच्या बाजूने निर्णय देते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. पण, हा चित्रपट पाहून प्रेक्षकांनी घरी जाऊन.. त्यांच्या पाल्याशी याविषयी चर्चा करणे अधिक समर्पक आहे. जेणेकरून या सिनेमाचा मुख्य उद्देश साध्य होऊ शकतो.

बऱ्याच कालावधीनंतर सक्षम असा विषयी अभिनेता अक्षय कुमार याने पडद्यावर यावेळी मांडला आहे. त्यासाठी अक्षयचं विशेष कौतुक करायला हवे. काही ‘दृश्यम २’ सारखे अपवाद वगळल्यास सहसा सिक्वेल सिनेमे त्याच्या पहिल्या भागाच्या सावलीतून बाहेर येत नाहीत, पण इथे लेखक-दिग्दर्शक नव्या दृष्टिकोनातून यावेळी विषय मांडतोय. दिग्दर्शक लैंगिकतेसारखा ‘निषिद्ध’ विषय कुठेही पडद्यावर ‘असभ्य’ न होता हुशारीने आणि तर्कशुद्धपणे हाताळतो. सोबतच त्यात विनोदाची भरही घालतो. कथा देखील मनोरंजक आणि कन्विन्सिंग वाटते.. कारण, हे सर्व एका मध्यमवर्गीय कुटुंबासह देसी वातावरणाच्या बॅकड्रॉपवर पटकथेत मांडण्यात आले आहे. पूर्वार्धात सिनेमा मूळ विषयात हात घालण्यात उशीर करतो. पण, एकदाका सिनेमाने आपला वेग पडला; ती सिनेमा प्रेक्षकांना शेवटच्या मिनिटापर्यंत गुंतवून ठेवतो.

Akshay Kumar In OMG 2

उत्तरार्धात कोर्टरूम ड्रामा प्रभावीपणे पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हिने उभारला आहे. कोर्टात कामसूत्र आणि पंचतंत्र या पुस्तकांचा कांती यांनी दिलेला संदर्भ आणि आज इंटरनेटवर पॉर्न उपलब्ध असताना शाळांमध्ये सेक्स हे विज्ञान म्हणून का शिकवले जाऊ शकत नाही, हा युक्तिवाद प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. सिनेमाच्या संगीत आणि तांत्रिक बाजूंबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाचा रनटाइम थोडा कमी करता आला असता. संगीत अधिक प्रभावी असते तर मजा आली असती. विक्रम माँटेसरीच्या संगीतातील ‘हर हर महादेव’ हे गाणे चांगले झाले असले.. तरी त्याची कोरिओग्राफीही सुमार आहे. (OMG 2 Movie Review In Marathi)

अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर हा पंकज त्रिपाठीचा चित्रपट आहे. पंकजचा सहज सुंदर अभिनय सिनेमाला अधिकाधिक वास्तवाकडे घेऊन जातो. अभिनय आणि बोलीभाषेमुळे त्याचे चरित्र आणि मुद्दा दृश्यमान होतो. शिवाचा संदेशवाहक म्हणून अक्षय कुमार प्रत्येक प्रकारे परिपूर्ण आहे. त्याची उपस्थिती, डायलॉग डिलिव्हरी आणि लुक्स या पात्राची मजा वाढवतात. यामी गौतमने वकिलाच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. सहकारी कलाकारांनी चांगली साथ दिली. शाळा मालक म्हणून अरुण गोविल, डॉक्टर म्हणून ब्रिजेंद्र काला, पुजारी म्हणून गोविंद नामदेव यांनी चांगले काम केले आहे. जजच्या भूमिकेत पवन मल्होत्रा लक्षात राहतो. बॉलिवूडच्या पडद्यावर ‘ओएमजी २’ सिनेमा वेगळ्या प्रवाहातील आणि दृष्टिकोन असलेला सिनेमा आहे. यापूर्वी मराठी सिनेमाच्या पडद्यावर याविषयीशी निगडित ‘बिपी’ हा सिनेमा दिग्दर्शक रवी जाधव याने केला होता. या सिनेमाही आठवण ‘ओएमजी २’ पाहताना होते.

जरी आज सेन्सॉर बोर्डाने.. ‘ओएमजी २’ पाहण्यास १८ वर्षा खालील तरुण-तरुणीना मज्जाव केला आहे.. तरी सर्व पालकांची ही जबाबदारी आहे की, त्यांनी त्यांच्या लहान मुलांशी ‘सेक्स एज्युकेशन’ सारख्या महत्वपूर्ण विषयावर संवाद साधावा. हा संवाद होणं अत्यंत आवश्यक आहे.

दिग्दर्शक- अमित राय
कलाकार- अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, गोविंद नामदेव,
अरुण गोविल, यामी गौतम, पवन मल्होत्रा, राजेंद्र काला
दर्जा : साडेतीन
स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy