Home » Scam 2003 Review: घोटाळ्याचा उत्कृष्ट खेळ मांडला!

Scam 2003 Review: घोटाळ्याचा उत्कृष्ट खेळ मांडला!

Scam 2003 Review In Marathi

‘कौन केहता है देश आबाद है..कौन केहता है देश आबाद है.. लुटेरों का यहां पर राज है.. यहां इमान सबके बर्बाद है.. आप ही बतायें क्या हम आज़ाद है?’ ही शायरी देशाच्या ‘नाशिक सिक्युरिटी प्रेम’च्या डेप्युटी मॅनेजरच्या तोंडी आहे. ही शायरी तो त्याच्या समोर बसलेल्या अब्दुल करीम तेलगीला उद्देशून म्हणतं आहे. अब्दुल करीम तेलगी यादरम्यान प्रामाणिक अशा डेप्युटी मॅनेजरला लाच देण्याचा प्रयत्न करतोय. हा मॅनेजर गेली दहा वर्ष सचोटीने, प्रामाणिकपणे त्याच काम करतोय. पण, खूप अपेक्षा असून देखील त्याला इतक्या वर्षात बढती मिळालेली नाही. पण, तेलगी त्याची काही राजकीय चक्र फिरवतो आणि अवघ्या दोन दिवसात त्या अधिकाऱ्याला जनरल मॅनेजर पदावर नेऊन बसतो. आपल्या प्रामाणिकपणाच्या अहंकाराचा चक्काचूर झालेला मॅनेजर आता तेलगीच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. तर यातून आपण काय समजलो? काय शिकलो? प्रामाणिकपणाचे मोल ते किती? हीच वेगळ्या धाटणीची आणि वेगळ्या नजरेतील प्रामाणिकपणाची गोष्ट आता ओटीटीच्या पडद्यावर ‘स्कॅम २००३’मध्ये बघायला मिळतेय. तेलगीची त्याची त्याची स्वतःची अशी ‘प्रामाणिक’पणाची व्याख्या आहे. तो स्वतःच्या शब्दाचा पक्का आहे. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवलेला. ‘तेलगी’ संपूर्ण राजकीय, पोलीस प्रशासन, कायदा आदींची कशी आणि का? धजिया उडवतो? हे ‘स्कॅम २००३’मध्ये पाहायला मिळतंय. (Scam 2003 – The Telgi Story) 

ज्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांची स्कॅम १९९२ नावाची वेबसीरिज पाहिली असेल त्यांना आताची स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी नावाची मालिका देखील आवडेल यात शंका नाही. मात्र यावेळी हंसल मेहता हे या मालिकेचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत. स्कॅम १९९२ चे त्यांनी दिग्दर्शन केले होते. तुषार हिरानंदानी याने यावेळी या वेब सीरिजचं कुशलतेने दिग्दर्शन केलं आहे. मालिकेतून त्यांनी त्याकाळी गाजलेल्या आणि चर्चेत आलेल्या अब्दूल करीम तेलगी प्रकरणाविषयी वेगळ्या प्रकारे मांडणी केली आहे. या व्यक्तीनं ३० हजार कोटींचा स्टॅम्प घोटाळा केला होता. भारतातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून त्याकडे पाहिले जाते. स्कॅम २००३ ही दहा एपिसोडची मालिका असून आता सध्या त्यातील पाच एपिसोड हे स्ट्रीम झाले आहेत. पुढील पाच एपिसोड हे नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

ज्या घोटाळ्याने संपूर्ण देशाच्या न्यायवस्थेला हादरवून टाकलं होतं, त्याचीच कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. अभिनेता गगन देव रियारने यामध्ये अब्दुल करीम तेलगीची मुख्य भूमिका साकारली आहे. तेलगी स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित या सीरिजमध्ये बऱ्याच मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी ही वेबसीरीज पाहणं अधिक जिव्हाळाच आहे रंजक असणार आहे. भरत जाधव, नंदू माधव, निखिल रत्नपारखी, शशांक केतकर आदी गुणी कलाकारांनी विविधांगी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. (Scam 2003 Review In Marathi)

पत्रकार संजय सिंह यांनी लिहिलेल्या ‘तेलगी स्कॅम: रिपोर्टर्स डायरी’ या पुस्तकातून ही वेब सीरिजची सत्यकथा घेण्यात आली आहे. या मालिकेची कथा तेलगीच्या ३०,००० कोटी रुपयांच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याभोवती विणलेली आहे. यात अब्दुल करीम तेलगीचा ‘उच्चांक’ आणि ‘अटके’पर्यंतचा बऱ्याचअंशी इतंभूत प्रवास मांडण्यात आला आहे.

‘स्कॅम २००३’ या सीरिजची कथा कर्नाटकमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगीची आहे. तेलगीचे वडील भारतीय रेल्वेत कर्मचारी होते. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. हलाखीच्या परिस्थितीत तो कसंबसं पदवीपर्यंतचं आपण शिक्षण पूर्ण करतो. मात्र शिक्षण झाल्यावर त्याला नोकरी मिळत नाही. अखेर ट्रेनमध्ये फळं विकत तो घराचा गाडा चालवतो. अखेर एके दिवशी ट्रेनमध्येच त्याची भेट एका असा व्यक्तीशी होते, जो त्याला मुंबईत येण्याची ऑफर देतो. (Scam 2003 Review)

छोट्याशा घरात राहणारा तेलगी आयुष्याबद्दल खूप मोठमोठी स्वप्नं पाहू लागतो. हीच स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तो मुंबईला येतो. मुंबईत आल्यावर तो त्या सेठच्या हॉटेलमध्ये काम करू लागतो. तेलगीकडे पैसे नव्हते, मात्र तो खूप हुशार होता. हॉटेलमध्ये काम करता करता तो दुबईची वाट धरतो. दुबईमध्ये सात वर्षे राहिल्यानंतर पत्नी आणि मुलांखातर तो भारतात परततो. भारतात आल्यानंतर तेलगी बनावट कागदपत्रांच्या आधारे तरुणांना दुबईत पाठवण्याचं काम करतो. याप्रकरणी त्याला अटकसुद्धा होते. तेव्हा तुरुंगात त्याची भेट एका अशा अपराधीशी होते, जो त्याच्याच सारखा खुरापती आहे. हे दोघं तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बनावट स्टॅम्प पेपर विकण्याचं काम सुरू करतात. या कामात जोखीम असल्याचं तेलगीला पुरेपूर ठाऊक असतं. तरीसुद्धा श्रीमंत होण्यासाठी तो हा जोखमीचा खेळ खेळू लागतो. मात्र कोणताही बिझनेस हा सरकारी कर्मचारी आणि नेत्यांशिवाय मोठा होत नाही. तेलगीसुद्धा त्याच्या या घोटाळ्यात अशा लोकांची मदत घेतो आणि पुढे जातो. यापुढे नेमकं काय काय होतं, हे तुम्हाला सीरिजमध्ये पहायला मिळेल.

Scam 2003 - The Telgi Story

ट्रेनमध्ये फळे विकणारा अब्दुल करीम तेलगी एके दिवशी देशातील सर्वात कुख्यात घोटाळेबाज होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. तेलगीचे (गगन देव रियार) जीवन संघर्षांनी भरलेले होते हे नाकारता येणार नाही. सर्वात मनोरंजक गोष्ट अशी आहे की इतर घोटाळेबाजांप्रमाणे, तो एक व्यक्ती नव्हता ज्याचे व्यक्तिमत्व किंवा जीवनशैली बातम्यांमध्ये होती. तरीही तो कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा सराईत बनला. तेलगीचा साधेपणा पाहून त्याचा एवढा मोठा फसवणूक करण्याचा विचार आहे, याची कल्पनाही कोणी केली नसेल. हि अशी क्लिष्ट व्यक्तिरेखा गगन देव रियार याने उत्कृष्टपणे साकारली आहे. वेब सीरिज मेकर्सची अर्धी शर्यत तर तेव्हाच जिंकून झाली होती; जेव्हा त्यांनी गगनला या भूमिकेसाठी निवडलं. तेलगीचं स्वतःच कास्टिंग आणि वेबसीरीजमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं कास्टिंग चपखल बसलेलं आहे. शोरनर हंसल मेहता हे चांगलेच जाणतात की, पडद्यावर कास्टिंग सर्वात महत्त्वाचे असते. ‘स्कॅम १९९२’मध्ये प्रतीक गांधीने ‘बिग बुल’ हर्षद मेहताची भूमिका साकारली आणि तो रातोरात स्टार झाला. यावेळी गगन देव रियार हा शो मोठा करून या शोपेक्षा मोठा होण्यासाठी सज्ज झाला आहे. याचे कारण म्हणजे तो केवळ खरा ‘तेलगी’ दिसत नाही तर त्याला हैदराबादी भाषेसह पात्रातील बारकावे देखील चांगले समजले आहेत. दिग्दर्शक तुषार हिरानंदानी याने गगन देव रियारमधून त्यांचा उत्कृष्ट अभिनय बाहेर काढला आहे. आणि त्यासाठी ते दोघेही कौतुकास पात्र आहेत. यासाठी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या दूरदृष्टीचेही कौतुक करावे लागेल.

तेलगीची कथा त्याच्या कुप्रसिद्ध नार्को-टेस्टपासून सुरू होते आणि फ्लॅशबॅकमधून पुढे जाते. कर्नाटकातील खानापूर येथील एका छोट्या शहरातील व्यापारी ते स्वप्नांचे शहर, मुंबई या प्रवासाबद्दल तो सांगतो. ही मालिका हळूहळू स्टॅम्प पेपर घोटाळ्यामागील रहस्य उलगडते आणि तेलगीच्या आयुष्यातील प्रमुख घटनाही दाखवते. दिग्दर्शक उत्कर्ष हिरानंदानी आणि त्यांचे लेखक (केदार पाटणकर आणि किरण यज्ञोपवीत) यांनी तेलगीच्या आयुष्यातील चढ-उतार अगदी निवांतपणे उमटू दिले. हे पुनरावलोकन पहिल्या दोन भागांवर आधारित आहे जिथे आपल्याला अब्दुल करीम तेलगीच्या वैयक्तिक जीवनातील काही झलक पाहायला मिळतात.

निर्मात्यांनी हुशारीने १९९० च्या दशकातील मुंबई पुन्हा तयार केली आहे. हा तो काळ होता जेव्हा आपल्या आयुष्यात मोबाईल फोन आणि सोशल मीडिया नव्हते. ही टाइमलाइन शोला एक आकर्षण देते. तथापि, ‘स्कॅम १९९२’ च्या तुलनेत यावेळी कथाकथनात थोडीशी असमानता असल्याचे दिसते, कारण तेलगी ज्या प्रकारे समाधानी व्यक्तीकडून धोकादायक महत्त्वाकांक्षी बनतो ते पडद्यावर थोडेसे संशयास्पद आणि क्रिएटिव्ह लिबर्टी सारखे दिसते. अब्दुल करीम तेलगीच्या भूमिकेतील गगन देव रियार तुम्हाला थक्क करतो. या भूमिकेला त्याने पूर्ण न्याय दिला आहे. तेलगीच्या व्यक्तीरेखेला त्यांनी हुबेहूब कॉपी केलं आहे. असं असूनही ते अभिनय करत आहेत, असा भास कधीच होत नाही. तेलगीच्या भूमिकेतील प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने आपल्या अभिनयातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. भरत जाधव याची वेगळी बाजू यावेळी पडद्यावर दिसते. अभिनेता शशांक केतकर याने आपल्या वाट्याला आलेली जेके ही व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे साकारली आहे. त्याच्यातील अभिनेत्याचा आत्मविश्वास पडद्यावर झळकल्याशिवाय राहत नाही. या कलाकृतीचे आणखी एक बलस्थान म्हणजे; पार्श्वसंगीत आणि कॅमेरावर्क. तांत्रिकदृष्ट्या वेबसीरीज उल्लेखनीय झाली आहे. पण, मनात एक रुख-रुख राहते.. ती म्हणजे जे राजकीय पुढारी तेलगीला या घोडाळ्यात मदत करतात वा त्याच्याकडून लाच घेतात.. त्या सर्व राजकीय मंडळींना वास्तविक चेहऱ्यासह पडद्यावर दाखलं गेलं असतं तर? पण, असो.. समजने वालोंको इशारा काफी है…      

वेब सीरिज : स्कॅम २००३ – द तेलगी स्‍टोरी
दिग्दर्शक : तुषार हीरानंदानी
कलाकार : गगन देव रियार, मुकेश तिवारी, सना अमीन शेख, भरत जाधव, शाद रंधावा, शशांक केतकर
दर्जा : साडेतीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy