Home » अथांग: रहस्यमय कथानक आणि अधुरी एक कहाणी…

अथांग: रहस्यमय कथानक आणि अधुरी एक कहाणी…

Athang Review

गेल्या वर्षी मराठी सिनेमांनी कात टाकली. वर्षभरात कित्येक मराठी चित्रपटांना चांगला प्रेक्षकवर्ग लाभला आहे व त्यांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली तयारी केली आहे. तर दुसरीकडे मराठीसाठी स्वतंत्रपणे अस्तित्वात आलेला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’ एकापेक्षा एक सरस अशा मराठी वेबसिरीज प्रेक्षकांसमोर आणत आहे. (Athang)

अनुराधा, रानबाजार, मी पुन्हा येईन अशा एकापेक्षा एक लोकप्रिय सिरीज दिल्यावर प्लॅनेट मराठीने ‘अथांग‘च्या रूपाने गेल्या वर्ष अखेरीस एक उत्कृष्ट वेबसिरीज प्रेक्षसकांसमोर आणली.

अथांगचं कथानक कधी ब्रिटिशपूर्व काळात घेऊन जातं, तर कधी साधारणतः साठ ते सत्तरच्या दशकांमध्ये. भयकथा असूनही कुठलेही विकृत चेहरे, रक्ताच्या उलट्या असले किळसवाणे प्रकार या सिरीजमध्ये दाखवण्यात आले नाहीत, ही या सिरीजची जमेची बाजू. त्या त्या काळासाठी आणि भयकथेसाठी आवश्यक सिनेमॅटोग्राफीही उत्तम जमून आली आहे.

Image Credit: Google

गावातला सरदेशमुखांचा वाडा, या वाड्यामध्ये दडलेली अनेक रहस्य, काहीसा विक्षिप्त स्वभावाचा, शांत शांत राहणारा राऊ, गावात राहायला आलेलं जोडपं – मास्तर आणि त्यांची पत्नी, या साऱ्यांभोवती ही सिरीज फिरते. काही कारणांनी मास्तर आणि त्यांची पत्नी वाड्यात राहायला जातात आणि नकळतपणे तिथल्या रहस्यमय वातावरणाचा आणि राऊच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनतात. बास! यापेक्षा जास्त काही लिहिलं तर तो ‘स्पॉईलर’ ठरेल आणि सिरीज बघायची उत्सुकता संपूर्णपणे संपून जाईल.

अथांग! सामान्यतः समुद्रासाठी वापरण्यात येणारं हे विशेषण. विस्तीर्ण पसरलेल्या त्या अथांग सागरात कित्येक अनाकलनीय गोष्टी आणि अनेक रहस्य दडलेली असतात. माणसाच्या मनाचंही किंबहुना आयुष्याचंही अगदी तसंच आहे. इथे प्रत्येकाच्या मनाच्या अथांग सागरात भावभावनांच्या अनेक लाटा उचंबळत असतात. मनाच्या खोल डोहात अनेक रहस्य दडलेली असतात. आयुष्याच्या प्रवासात कधी आपली नाव भरकटते, तर कधी किनारा गाठते. हे सारं चक्र अविरत सुरू असतं. काहीशी अशीच संकल्पना रहस्यमय पद्धतीने ‘अथांग’च्या कथानकात दाखवण्यात आली आहे.

Image Credit: Google

मैत्री, प्रेम, वासना, क्रौर्य, त्याग, विश्वास, दुरावा, स्वाभिमान अशा अनेक भावभावनांचे पैलू यामध्ये अलगदपणे उलगडून दाखवण्यात आले आहेत. सिरीजचा प्रत्येक भाग उत्कंठा वाढवणारा आहे. रहस्यासोबतच कथेला हलक्या – फुलक्या प्रेमकहाणीचीही जोड देण्यात आली आहे आणि हा कथानकाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

सिरीजमध्ये सर्वच कलाकारांच्या भूमिका उत्तम आहे. ‘अथांग’च्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने निर्मितीक्षेत्रात पदार्पण केलं आणि तिचा हा प्रयत्न यशस्वीही ठरला. कारण ही वेबसिरीज मराठी वेबसिरीजच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वात जास्त बघितलेली वेबसिरीज ठरली.

ही सिरीज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघता येईल. IMDB वर या सिरीजला 9.2 रेटिंग देण्यात आलं आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy