Home » Taali Review: ताली – तिचे अमूर्त चित्र!

Taali Review: ताली – तिचे अमूर्त चित्र!

Taali WebSeries Review In Marathi

संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात की,
‘जे का रंजले गांजले
त्यासि म्हणे जो आपुलें,
तो चि साधु ओळखावा
देव तेथें चि जाणावा’

या अभंगाने ‘ताली‘ची सुरुवात होते. या संपूर्ण वोबसीरीजचे सार हा या एका अभंगात आहे. रंजल्या गांजल्यांची सेवा करणाऱ्यालाच ‘देव’ म्हणावे असा याचा अर्थ आणि श्रीगौरी सावंत (Shreegauri Sawant) ही तृतियपंथीयांसाठी (ट्रांसजेडर)साठी एखाद्या देवापेक्षा कमी नाही.  

लहानपणापासून एखाद्या मुलाला मुलीसारखं राहायला आवडतं.. तर एखाद्या मुलीला मुलासारखं! त्यांच्या आई-वडिलांनाही याची कल्पना वेळोवेळी येत असते. मुलगी मुलासारखे वागू लागली तर आई-वडिलांना तेवढे वावगे वाटत नाही. कारण मोठी झाल्यावर मुलगी मुलीसारखीच वागेल याचा त्यांना विश्वास असतो. मात्र मुलगा मुलीसारखी वागत असेल तर तर मात्र आईवडिलांपुढे अक्ष प्रश्न असतो. आज याबाबत जरी समाजात जागरुकता निर्माण झाली असली, होत असली तरी त्याचे प्रमाण जागतिक पातळीच्या तुलनेनं भारतात कमीच आहे. रवी जाधव दिग्दर्शित, क्षितिज पटवर्धन लिखित आणि सुष्मिता सेन मुख्य अभिनित ‘ताली’ची कथा ही श्रीगौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. श्रीगौरी एक ट्रान्सजेंडर आहे; जी तिच्या समाजासाठी लढते. त्रृतीयपंथी समाजाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी ‘गल्ली पासून दिल्ली’पर्यंत लढा देते. देशात त्यांना स्वतःची ओळख मिळावी म्हणून प्रवाहाविरुद्ध चालते. हाच चालायचा, धावण्याचा.. लढ़ण्याचा मार्मिक प्रवास ‘ताली’मध्ये आहे. (web series review in marathi)   

अभिनेत्री सुष्मिता सेन ही माजी मिस युनिव्हर्स राहिली आहे. अशा परिस्थितीत, वेब सीरिजमध्ये एका तृतीयपंथाच्या भूमिकेत स्त्री सौंदर्याची अशी मूर्ती साकारणे हे निश्चितच तिच्यासाठी खूप धाडसी पाऊल होते; आहे. दुसरीकडे राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक रवी जाधव याने यापूर्वी आपापल्या सिनेपदार्पणात ‘नटरंग’ हा विषय कौतुकास्पद हाताळला आहे. आता वेब पदार्पणात देखील तीच पुनरावृत्ती दिसते आहे. प्रारंभीच ‘ताली’मध्ये सुष्मिताच्या कास्टिंगमुळे तिने या वेब सीरिजकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. ‘आर्या’ सारख्या वेब सीरिजने ओटीटी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सुष्मिता सेननेही श्रीगौरी सावंतच्या व्यक्तिरेखेकडे वळणं; हे एका कसलेल्या आणि गुणी कलाकाराचे लक्षण आहे. हे तिनं आज दाखवून दिलं आहे. ही भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी सुस्मिताने मनापासून आपला आत्मा ओतला आहे; याची परिणामी ‘ताली’ पाहताना नक्कीच येते. समाजात आपल्या आजूबाजूला असलेल्या पण नेहमी काणाडोळा होणाऱ्या या समाजाचं सुंदर अमूर्त चित्र लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मंडळी यांनी एकत्रित ‘ताली’मध्ये रेखाटले आहे. पटकथेत अनेक ठिकाणी कथा प्रेक्षकांवरील आपली पकड सैल करते; लांबट लागलेले प्रसंग कंटाळवाटे देखील ठरतात. परंतु, एकसंध अनुभव म्हणून ही ‘वेबसीरिज’ रंजन आणि प्रबोधन दोन्ही करण्यात यशस्वी ठरते.

मालिकेची सर्वात मोठी कमतरता तिच्या पटकथेत आहे, जी तृतीयपंथी समाजाच्या जीवनाला स्पर्श करते, परंतु त्यांचे धक्कादायक सत्य पडद्यावर पूर्णपणे मांडण्यात हात आखडता घेते. मालिकेतील तृतीयपंथांची कथा नीटनेटके आणि वरवरच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने ती थेट हृदयाला भिडते नाही. उपरोक्त म्हंटल्याप्रमाणे मालिकेचा वेगही संथ आहे. अशा वेळी अनेक वेळा मनात प्रश्न पडतो की, ही कथा दोन तासांच्या चित्रपटात दाखवली असती तर?  अधिक प्रभाव पडला असता! (Taali WebSeries Review In Marathi)

Series based on the life of Shreegauri Sawant

गौरीचे बालपण आणि वर्तमान कथानकात समांतर चालते. लहानपणापासूनच त्याला आतून आणि बाहेरच्या जगामध्ये होत असलेल्या बदलांशी संघर्ष करावा लागला. तिच्या शरीरात झालेले परिवर्तन, आई बनण्याची तिची इच्छा आणि ट्रान्सजेंडर समाजातील एक शक्तिशाली आवाज म्हणून तिचा उदय; हा सर्व प्रभाव कथानकात आहे. तथापि, एक-दोन दृश्य वगळता, गौरीच्या सामर्थ्याचा आणि तिने घडवून आणलेल्या बदलाचा कोणताही ठोस परिणाम आपल्याला पडद्यावर दिसत नाही. संपूर्ण मालिकेत सुष्मिता तिच्या रुंद डोळ्यांद्वारे आणि व्यक्तिरेखेचा आवाज बदलून तिचा मुद्दा पडद्यावर मांडण्यात खर्ची होतो. वयाच्या सतराव्या वर्षी गणेश घर सोडून समाजामध्ये हक्क मिळवण्यासाठी लढायला सुरुवात करतो. राहतं घर सोडून मुंबई गाठतो. पुढे तृतीयपंथ वर्गासाठी लढतो. तृतीयपंथ वर्गालाही स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करुन देतो. त्यांनाही सोयी सुविधा मिळाव्या यासाठी लढतो. पुढे आपल्याला त्यांच्यासाठी लढायचं असेल तर त्यांच्यातलचं एक व्हावं लागेल, याची त्याला जाणीव होते आणि तो व्हेजिनोप्लास्टी सर्जरी करुन गणेशचा ‘गौरी’ होतो. गौरी सावंत झाल्यानंतरही तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. पण या सगळ्या संकटांचा सामना गौरी सावंत हसतमुखाने करते. हा सर्व प्रवास पडद्यावर पाहणे रंजक आहे.

वेब सीरिजमधील क्षितिज पटवर्धनचे याने लिहिलेलं संवाद प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. हे डायलॉग्ज ऐकताना-पाहताना अंगावर येतात आणि विचार करण्यासही बाध्य करतात. ‘ताली बजाऊंगी नहीं बजवाऊंगी’, ‘इस देश को यशोदा की बहुत जरूरत है’, ‘भारत एक पुल्लिंग शब्द है, लेकिन फिर भी हम उसे मां बुलाते हैं’,  ‘मुझे  स्वाभिमान, सम्मान और स्वतंत्रता तिनों चाहिए’; हे संवाद योग्य वेळी येतात आणि सुष्मिता ज्या पद्धतीने त्याचे उच्चारण करते ते खूप प्रभावी आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक फ्रेम दिग्दर्शकाने विचारपूर्वक निश्चित केली आहे. सुष्मिता सेनचा डायलॉग डिलेव्हरीत हिंदीसह बोलक्या मराठी आणि नेमके इंग्रजी कुशलतेने उलगडते. ती गौरीच्या पात्रात आवश्यक स्वभाव आणि भावना आणते आणि पात्रात सुरू असलेला गोंधळ चपळपणे चित्रित करते. सुष्मिताचा अभिनय संपूर्ण मालिकेचा ‘केंद्रबिंदू’ आहे, ज्यामुळे तुम्हाला या असमाधानकारक कथेशी जोडून घेता येईल. सुष्मिता सेन असो वा बालपणीच्या गणेश/ गौरी ही भूमिका साकारलेली कृतिका देव असो. दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तसेच सीरिजमधील नितेश राठोश, अंकुर भाटिया, नंदू माधव, ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवी, अनंत महादेवन, सुव्रत जोशी या सर्वच कलाकारांनी आपली भूमिका चोख निभावली आहे.

Taali Review In Marathi

दिग्दर्शक रवी जाधवने श्रीगौरी सावंतची ही कथा वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणलेली आहे खरी; पण, ती सिनेमारूपी असल्यास अधिक तीव्र आणि प्रभावी बनली असती.. असा संभाव्यता मनात आल्याशिवाय राहत नाही. रवी जाधव एक चांगला दिग्दर्शक आहे आणि त्याने ते वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट देऊन सिद्धही केले आहे. ‘ताली’ ही त्याची आणखी एक उत्कृष्ट कलाकृती आहे हे त्याच्या दिग्दर्शकीय कौशल्याचे ताजे उदाहरण. अर्थात तालीमध्ये अनेक गोष्टींना स्पर्श करण्यात आलेला नाही. गरीब गौरीकडे लिंगबदलाचे ऑपरेशन करण्यासाठी पैसे कुठून येतात? एखादी एनजीओ तिलाच का मदत करते? असे काही प्रश्न वेबसीरीज पाहाताना उभे रहातात?

एका स्त्री कलाकाराला पुरुष दाखवणं आणि त्या पुरुषाचा स्त्री होण्यापर्यंतचा प्रवास खूपच चांगल्याप्रकारे दाखवण्यात आला आहे. यासाठी कलाकारांसह मेकअप आर्टिस्ट, कलाकार आणि दिग्दर्शकाचं कौतुक. ‘ताली’च्या साउंडट्रॅकने कथेला एक महत्त्वाचा पदर जोडला आहे. पूर्वीच्या मुंबईची ड्रेसिंग सेन्स आणि वातावरण तयार करण्याकडे तपशीलवार लक्ष दिले गेले आहे. वेब सीरिजमध्ये काही त्रुटी असूनही, निर्माते-लेखक-दिग्दर्शक-कलाकार आणि सुष्मिता सेन यांनी श्रीगौरी सावंत यांची अपारंपरिक कथा ‘ताली’ म्हणून धाडसाने आणि अतूट विश्वासाने समोर आणली आहे आणि त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत.

वेब सिरीज: ताली
दिग्दर्शक: रवी जाधव
कलाकार: सुष्मिता सेन, नितेश राठोड, अंकुर भाटिया, कृतिका देव, ऐश्वर्या नारकर, विक्रम भाम
दर्जा : तीन स्टार
कुठे पहाल: जिओ सिनेमा

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy