Home » बोल्ड सीन्स, शिवीगाळ, हिंसा; तरी वेंकटेश आणि आशीष विद्यार्थी यांच्यासाठी बघायला हवी अशी ‘राणा नायडू’

बोल्ड सीन्स, शिवीगाळ, हिंसा; तरी वेंकटेश आणि आशीष विद्यार्थी यांच्यासाठी बघायला हवी अशी ‘राणा नायडू’

Rana Naidu WebSeries Review

सध्या ज्या पद्धतीने अधिकृत रिमेक किंवा ज्याला इंग्रजीमध्ये Official Adaption म्हणतात हे पेव चित्रपटसृष्टीत खासकरून बॉलिवूडमध्ये फुटलं आहे, तसाच काहीसा प्रकार आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हिंदी वेबसीरिजमध्येही पाहायला मिळत आहे. मध्यंतरी हॉटस्टारवर ‘द नाईट मॅनेजर’ या इंग्रजी वेबसीरिजचीच एक भारतीय आवृत्ती प्रदर्शित झाली, लोकांनी त्याला ठीकठाक प्रतिसादही दिला. अशातच आता ‘राणा नायडू‘ (Rana Naidu) ही वेबसीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर येऊ घातली आहे. अमेरिकन क्राइम थ्रिलर ‘रे डॉनवन’ या वेबसीरिजवर ही हिंदी सीरिज आधारित असल्याचं म्हंटलं जात आहे.

बॉलिवूडच्या ग्लॅमरच्या झगमगत्या दुनियेमागचं एक गडद वास्तव आणि या दुनियेतील मोठमोठ्या सेलिब्रिटीजच्या मोठमोठ्या गुन्ह्यावर पडदा टाकायचं काम कॉंट्रॅक्ट घेऊन करणाऱ्या राणा नायडू (राणा दग्गुबती) या पात्राला केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती हे कथानक रचण्यात आलं आहे. मोठ्या संकटात सापडलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटीजना बाहेर काढायचं काम राणा आणि त्याचे दोन सहाय्यक करत असतात, पण एकूणच राणाच्या भोवती रचण्यात आलेलं कथानक कमकुवत असल्याने त्याच्या या गडद आयुष्यात एक प्रेक्षक म्हणून आपल्याला रुची निर्माण होतच नाही. (Rana Naidu WebSeries Review)

Rana Naidu Trailer

यानंतर कथानकात राणाचे वडील नागा नायडू (वेंकटेश दग्गुबती)ची होणारी एंट्री, त्यांच्या येण्यामुळे राणाच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात होणाऱ्या उलथापालथी, राणाचे दोन भाऊ तेज (सुशांत सिंग) आणि जफा (अभिषेक बॅनर्जी) यांच्या आयुष्यातील काही घडामोडी, त्यांचा गडद आणि अंगावर येणारा भूतकाळ. शिवाय या सगळ्याचं हैद्राबाद चित्रपटसृष्टीशी असलेलं कनेक्शन, तिथल्या अन्डरवर्ल्ड डॉन सूर्याचं (आशीष विद्यार्थी) कनेक्शन, याबरोबरच राणाच्या कौटुंबिक आयुष्यातील प्रॉब्लेम हे असे वेगवेगळे प्लॉट आपल्याला सीरिजमध्ये पाहायला मिळतात पण त्यातील कोणत्याही कथेशी आपण जोडले जात नाही.

शिवाय या सीरिजमध्ये वापरलेला लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा तसेच बुवाबाजी आणि भोंदूगिरी हा मुद्दाही अगदीच वरचेवर हाताळला गेला असल्याने त्याचंही गांभीर्य सीरिजमध्ये फारसं जाणवत नाही. क्राइम थ्रिलर या पठडीत जरी ही सीरिज अगदी फिट बसत असली तरी बटबटीत कथानक आणि अंगावर येणारी पात्र, किळसवाणे बीभत्स असे बोल्ड आणि नग्न सीन्स, दर वाक्यात येणाऱ्या किमान २ ते ३ शिव्या, लहान मुलांमध्ये पैसा, प्रसिद्धी, व्यसनं, शारीरिक सबंध याबद्दल वाढणारं आकर्षण याच गोष्टी या सीरिजमध्ये अधोरेखित केल्या असल्याने मूळ कथानकाशी आपण जोडले न जाता उलट त्यापासून आणखी लांब जातो. काही काही ठिकाणचे सेक्स सीन्स तर अक्षरशः नकोसे वाटतात. या सीरिजचे लेखक दिग्दर्शक करण अंशूमन आणि सुपर्ण वर्मा हे अजूनही सेक्रेड गेम्स आणि मिर्जापुरच्या काळातून बाहेर आल्यासारखे वाटत असल्याचं ही सीरिज बघताना प्रकर्षाने जाणवतं. Rana Naidu WebSeries Review

Rana Naidu Review

या गोष्टी सोडल्या तर वेबसीरिजची प्रोडक्शन वॅल्यू उत्तम आहे. सीरिजमध्ये प्रचंड खर्च केल्याचं पदोपदी जाणवतं पण कथानकावर जास्त लक्ष दिलं असतं तर या सीरिजमध्ये एक वेगळं युनिव्हर्स तयार करायची क्षमता आहे असं नक्की वाटतं. याबरोबरच वेबसीरिजमधील पात्रांचा हैद्राबादशी संबंध असल्याने काही काही ठिकाणी येणारा त्यांचा भाषेतला लेहजा आवडतो तर कधी कधी तो प्रचंड त्रासदायकही वाटतो. बाकी सीरिजचं चित्रीकरण, संगीत उत्तम आहे. एडिटिंगच्या बाबतीत काही सीन्स कट करून ही सीरिज ७ भागांमध्येच आटोपती घेता आली असती हे प्रकर्षाने जाणवतं.

=====

हे देखील वाचा: पंचायत – सामान्य माणसांचं सामान्य आयुष्य दाखवणारी असामान्य सिरीज

=====

बाकी राणा दग्गुबती, अभिषेक बॅनर्जी, सुशांत सिंग, सुवरीन चावला, गौरव चोप्रा, मिलिंद पाठक यांची कामं ठीक आहेत. राणा दग्गुबती हा अशा पात्रांच्या बाबतीत मार खातो, जॉन अब्राहमप्रमाणे फ्लॅट चेहेरा असल्याने त्याच्या अभिनयाला बऱ्याच मर्यादा आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. त्याच्या परीने त्याने काम उत्तम केलं आहे. या सगळ्यात बऱ्याच वर्षांनी पडद्यावर दिसणारा वेंकटेश दग्गुबती आणि आशीष विद्यार्थी हे दोघेही भाव खाऊन जातात. या सगळ्यात जे काही बघण्यासारखं असेल तर या दोघांची कामं, बाकी संपूर्ण सीरिज ही यथातथाच आहे. तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर सहज म्हणून या सीरिजचा आनंद तुम्ही नक्की घेऊ शकता.

वेब सिरीज: राणा नायडू (नेटफ्लिक्स)
दिग्दर्शक: सुपर्ण वर्मा, करण अंशुमन
कलाकार: राणा दग्गुबती, आशीष विद्यार्थी, व्यंकटेश, सुरवीन चावला, सुशांत सिंग, अभिषेक बॅनर्जी, गौरव चोप्रा आणि आदित्य मेनन
दर्जा : तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy