Home » ‘मुखबीर’ : भारतातीत सर्वोत्कृष्ट स्पाय थ्रिलर सीरिज

‘मुखबीर’ : भारतातीत सर्वोत्कृष्ट स्पाय थ्रिलर सीरिज

Mukhbir - The Story of a Spy

एखाद्या वेबसीरिजबद्दल इतकं आत्मियतेने लिहावं अशा वेबसीरिज आजकाल फारच कमी पाहायला मिळत आहेत. बहुतांश वेबसीरिजमध्ये आपल्याला हिंसा, नग्नता, शिवीगाळ यापैकी काही गोष्ट तर हमखास सापडतात. अशाच या गर्दीत काही दिवसांपूर्वी आलेली एक उत्कृष्ट थ्रिलर वेबसीरिजकडे बऱ्याच लोकांचं दुर्लक्ष झालं. ती वेबसीरिज म्हणजे झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘मुखबीर‘. Espionage Thriller पठडीतील वेबसीरिज किंवा चित्रपट मी सहसा सोडत नाही.

‘मुखबीर’ पहिल्यानंतर त्या कथानकातून बाहेर पडावंसंच वाटत नाही. अगदी स्पिलबर्गचे पिरेड चित्रपट बघतानाही बऱ्याचदा असंच होतं होतं, अगदी Schindler’s list पासून The Bridge of Spies पर्यंत, स्पीलबर्गच्या कोणत्याही चित्रपटात, त्या विश्वात हरवून जायला होतं. तसंच काहीसं एक भारतीय वेबसीरिज बघताना अनुभवता येईल असं कधीच वाटलं नव्हतं.

स्पाय थ्रिलर कथानकं ही आपल्याकडे सारधोपटपणे एकाच साच्यात मांडली जातात. ‘बेबी’सारखा एक वेगळा प्रयोग सोडला तर प्यूअर स्पाय थ्रिलर आपल्याकडे तसे फारच कमी झाले आहेत. ‘मुखबीर’ने ही कमतरता भरून काढली आहे. गुप्तहेरांच्या पलिकडचं विश्व दाखवण्यात या वेबसीरिजच्या मेकर्सना यश मिळालं आहे. (Mukhbir – The Story of a Spy)

कितीही क्रूर, भावनाशून्य असले तरी ते हेरसुद्धा आपल्यासारखेच हाडामांसाची माणसंच असतात. आपल्यासारख्याच त्यांनीही भावना असतात, आपल्यासारखेच तेसुद्धा घाबरतात, प्रचंड नर्वस होतात, आणि बऱ्याच कथानकात हीच गोष्ट मिसिंग असते. गुप्तहेरांचा हाच पैलू अगदी उत्तमरित्या उलगडून सांगितल्याने ‘मुखबीर’ ही भारतात आजवर बनलेली उत्कृष्ट स्पाय थ्रिलर सीरिज आहे.

१९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी, तेंव्हाची राजकीय परिस्थिती, या सगळ्याच अभ्यास करून अत्यंत बारकाईने या वेबसीरिजची गोष्ट रॉच्या उगमापाशी आपल्याला आणून सोडते. १९६५ च्या युद्धाबद्दल अजूनही बरेच गैरसमज आहेत. भारत जरी हे युद्ध जिंकला असला तरी पाकिस्तानसुद्धा युद्ध जिंकल्याचं बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होता. आणि याच दरम्यान दोन्ही देशातील हेरगिरी कारवायांना अधिक वेग प्राप्त झाला.

याच दरम्यान पाकिस्तानात जाऊन त्यांची माहिती पुरवणाऱ्या ‘हरफन बुखारी’ याच्याभोवती हे कथानक रचण्यात आलं आहे. उगाच कोणतेही ट्रेनिंग सिक्वेन्स सीरिजमध्ये न ठेवता ही सीरिज थेट मुद्द्याला हात घालते आणि हरफनच्या पाकिस्तानमधल्या पहिल्या मिशनपासून सुरुवात करते. कार विकण्याच्या धंद्याआड तस्करीत माहिर असलेल्या माणसापासून तो पाकिस्तानी आर्मीच्या जनरलपर्यंत हरफन कसा पोहोचतो आणि या प्रवासात तो कोणा कोणाला भेटतो? नेमकं काय काय हरवून बसतो? हे तुम्हाला सीरिजमध्ये पाहायला मिळतं.

Mukhbir – The Story of a Spy

हाच हरफन बुखारीचा प्रवास ज्यापद्धतीने आपल्यासमोर मांडला आहे तो एका झटक्यात बघितल्याशिवाय जीवाला शांती मिळत नाही. खुर्चीला घट्ट खिळवून ठेवणारी कथा, अनपेक्षित आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटना, सोबत सुसंगत आणि कथा पुढे नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी प्रेमकहाणी आणि भावूक करणारा क्लायमॅक्स या काही या सीरिजच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

शिवाय १९६५ चा काळ ज्या पद्धतीने साकारलाय तो तर खूपच अप्रतिम आहे, मी आधी म्हणालो तसं त्यातून बाहेर पडणं फारच कठीण होतं. त्यासाठी सिनेमॅटोग्राफरचे आभार मानावे तितके कमीच आहेत. शिवाय यातल्या गझल्स तर काळजात रुतणाऱ्या आहेत. “हमसे तो वो बेहतर है” ही गझल मनात रुतून बसणारी आहे. या गाण्यांनी आणि अत्यंत योग्य अशा पार्श्वसंगीताने सीरिजमध्ये एक वेगळीच जान भरली आहे आणि ही गोष्ट ती सीरिज संपल्यावर जास्त जाणवते.

क्लायमॅक्स तर प्रचंड भावूक करणारा आहे. आलिया भट्टच्या ‘राजी’मध्ये ज्यापद्धतीने ‘रॉ’चं सादरीकरण केलं होतं त्याच्या अगदी विपरीत चित्रण यात पाहायला मिळतं. राजीच्या क्लायमॅक्सप्रमाणे यातही शेवटी हरफन ‘रॉ’च्या कार्यप्रणालीवर आणि तिथल्या लोकांच्या निर्ढावलेल्या वृत्तीवर चिडतो, प्रश्न विचारतो, जाब विचारतो पण त्याला त्याचे अधिकारी मूर्ती जे पात्र प्रकाश राज यांनी निभावलं आहे ते जे उत्तर देतात ते अगदी कोणालाही मनोमन पटणारं आहे आणि तिथेच ही सीरिज प्रेक्षकांचं मन जिंकते. ‘राजी’मध्ये पाकिस्तानला निरागस दाखवण्यापेक्षा थोड लिखाणावर लक्ष दिलं असतं तर ‘मुखबीर’सारखंच त्याचंही कौतुक केलं गेलं असतं. (Mukhbir The Story of a Spy review)

Mukhbir The Story of a Spy Review

असो बाकी कथा, पटकथा, संवाद सगळीच भट्टी मस्त जुळून आली आहे. याबरोबरीनेच आदिल हुसेन, प्रकाश राज, हर्ष छाया या सगळ्या मुरलेल्या कलाकारांची कामं चाबूक झाली आहेत यात काहीच वाद नाही. पण हरफनची भूमिका साकारणारा झैन खान दुरानी, बेगम अनारची भूमिका साकारणारी बरखा बिश्त, आणि जमीलाची भूमिका साकारणारी जोया अफरोज या तिघांची कामं स्मरणात राहतात.

=====

हे देखील वाचा : बोल्ड सीन्स, शिवीगाळ, हिंसा; तरी वेंकटेश आणि आशीष विद्यार्थी यांच्यासाठी बघायला हवी अशी ‘राणा नायडू’

=====

खासकरून हरफन आणि बेगम अनारमधलं नातं ज्यापद्धतीने उलगडलं आहे आणि त्यांच्या नात्याचा शेवट आणि त्यानंतर हरफनचं विचित्र वागणं हे पार आतून हादरवून टाकणारं आहे. या तिघांबरोबर इतरही सहकलाकारांची कामं अप्रतिम झाली आहेत. ही सीरिज म्हणजे कितीही भावनाविवश असले तरी सदैव देशाच्या सुरक्षेसाठी जीव मुठीत घेऊन बाहेरील देशात राहणाऱ्या आणि आधी राहिलेल्या, शहीद झालेल्या अशा कित्येक अज्ञात हेरांना मानवंदना आहे. अजिबात चुकवू नका, भारतात अशाप्रकारची वेबसीरिज किंवा चित्रपट फार कमी बनतात, त्यामुळे जरूर या सीरिजचा आस्वाद घ्या!

दिग्दर्शक : शिवम नायर, जयप्रद देसाई
कलाकार : झैन खान दुर्रानी, ​​प्रकाश राज, हर्ष छाया, बरखा बिश्त सेनगुप्ता, दिलीप शंकर, सत्यदीप मिश्रा, झोया अफरोज
दर्जा : तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy