Home » Dream Girl 2 Movie Review: ‘दिल का टेलिफोन’ झाला मिस!

Dream Girl 2 Movie Review: ‘दिल का टेलिफोन’ झाला मिस!

Dream Girl 2 Movie Review In Marathi

आयुष्मान खुराना हा अशा सक्षम अभिनेत्यांपैकी एक आहे, जो भूमिकेत शिरुन अक्षरशः वास्तवदर्शी काम करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांने आजवर विविधांगी भूमिका पडद्यावर जिवंत केल्या आहेत. मग तो ‘आर्टिकल १५’ असो किंवा ‘डॉक्टर जी’, प्रत्येक वेळी त्याने भिन्न आणि टोकाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘ड्रीम गर्ल’मध्ये तो फोनवर मुलीचा आवाज काढून पुरुषांना आकर्षित करत होता. नेहमी चौकटी बाहेरील प्रवाहाविरुद्ध असलेले विषय त्याच्या वाट्याला आले आणि त्याने ते धाडसाने स्विकारले देखील; सोबतच हुकमी एक्क्या प्रमाणे त्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तो चपखल बसला. (Dream Girl 2 Movie Review)

यावेळी देखील ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये त्याने प्रामाणिकपणे अगदी महिलेचे वेषांतर करुन पूजाची व्यक्तिरेखा खुबीने रेखाटली आहे. पण, कथा, पटकथेच्या मर्यादेमुळे सिनेमात तो ‘कनेक्ट’करु पाहत असलेला ‘दिल का टेलिफोन’चा कॉल ‘मिस’ झाला आहे. पण, हा एका पुरुषाने मुलीचे वेषांतर करुन.. सिनेमात जो काही गोंधळ घातला आहे; ती संकल्पना वास्तविक जीवनात तुमच्या पचनी पडणारी नाही, परंतु आयुष्मान ज्या धाडसाने सिनेमाच्या कथानकात पूजा बनून वावरतो; त्यासाठी तो कौतुकास पात्र आहे.


कथेबद्दल बोलायचे झाले तर तिची सुरुवात करम (आयुष्मान खुराना) पासून होते, जो सिनेमाच्या पहिल्या भागात राम लीलामध्ये काम करत होता, पण आता तो ‘देवीच्या जागरणाचे कार्यक्रम’ करत असतो. तो आणि त्याचे वडील जगजीत (अन्नू कपूर) अजूनही कर्जात बोज्याखाली दबलेले आहेत. दुसरीकडे परी (अनन्या पांडे) त्याच्या पाठीशी आहे. सहाजिक आहे परी आणि करम एकमेकांच्या प्रेमात आहे. या प्रेमप्रकरणाच्या मध्यभागी असलेला खलनायक म्हणजे परीचे वडील जयपाल (मनोज जोशी), ज्याची अट असते की, जोपर्यंत करमचा बँक बॅलन्स २५ लाखांचा हवा, स्वतःचे घर आणि नोकरी हवी. हे जोपर्यंत होतं नाही.. तोपर्यंत करम परीशी लग्न करू शकत नाही. (Dream Girl 2 Movie Review In Marathi)

करमचा मित्र स्माइली (मनजोत सिंग) आणि त्याचे वडील जगजीत तिला सोना भाईच्या (विजय राझ) डान्स बारमध्ये मुलगी म्हणून दाखवून पैसे कमवण्याची युक्ती आजमावतात. आता ही शक्कल कितपत यशस्वी ठरते; याचाच सर्व ओहापोह सिनेमात आहे. सिनेमाची पटकथा निम्याहून अधिक अंगाने विनोदी धाटणीची आहे. कारण, पूजाच्या प्रेमात कथानकातील अनेक पुरुषमंडळी आहेत. त्यांच्यासोबत पूजाची होणारी पळापळ सिनेमात रंगत आणते. परिणामी, पूजा आणि करम या पात्रांमध्ये निर्माण झालेला गोंधळ विनोदाचे फवारे सोडतो.

दिग्दर्शक राज शांडिल्य कोणताही वेळ न घालवता मूळ कथेकडे झेप घेतो. पटकथेतील काही रंजक वळणं तर्काच्या पलीकडचे वाटतात, पण विनोदी आणि मनोरंजक परिस्थितीत तर्काकडे फारसे लक्ष न देता.. तुम्ही सिनेमा पाहिल्यास पडद्यावरील प्रसंग आपल्या हसवून सोडतात. हा चित्रपट अन्नू कपूर, असरानी, परेश रावल, विजयराज, सीमा पाहवा, राजपाल यादव यांसारख्या कॉमिक दिग्गजांनी भरलेला आहे.

Dream Girl 2 Movie Review In Marathi

दिग्दर्शक राज शांडिल्य याने या विनोदवीरांना योग्य ठिकाणी पेरले आहे. परंतु, अनेक ठिकाणी त्याने पात्रांचे अनावश्यक ट्रॅक लांबवले आहे. ज्यामुळे कथा ताणली जाते आणि रटाळ होते. क्लायमॅक्सही थोडा ताणला गेला आहे. संगीताबद्दल बोलायचे झाले तर मीट ब्रदर्सचे दिल का टेलिफोन २.० हे गाणे चांगले झाले आहे, पण बाकीची गाणी छाप पाडत नाहीत.

=====

हे देखील वाचा: नुसरत भरुचा च्या कामाचे सर्वत्र कौतुक! जाणून घ्या ‘अकेली’ चित्रपटाचा रिव्ह्यू

=====

आयुष्मान खुरानाने प्रत्येक फ्रेममध्ये मन जिंकेल असा परफॉर्मन्स दिला आहे. करम आणि पूजा यांच्यातील त्याचे स्विच ओव्हर मनोरंजक आहे. पूजाच्या व्यक्तिरेखेतील त्याची मेहनत व्यक्तिरेखेचा प्रभाव वाढवते. सोबतच मुलींसारखं नृत्य करण्याची कसब आयुष्मानने उत्कृष्टपणे आत्मसात केलीय. अनन्या पांडेला चित्रपटात फारशी जागा मिळालेली नाही, पण इतर सहाय्यक कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची भक्कम बाजू आहे. असरानी छोट्या भूमिकेत खूप हसवतो, तर अन्नू कपूर त्याच्या परिचित शैलीत मनोरंजन करतो. विजय राज आणि राजपाल यादव यांनी कॉमेडीला मसाला दिला आहे, तर सीमा पाहवा यांनी तिच्या सिग्नेचर स्टाइलमध्ये विनोदाची भर घातली आहे. मनजोत आणि अभिषेक बॅनर्जी यांनीही त्याला खूप चांगली साथ दिली आहे. एकंदरती दोन घडीचा विरंगुळा करणारा असा हा सिनेमा आहे.

सिनेमा : ड्रीम गर्ल-२
निर्माते : एकता कपूर, शोभा कपूर, बालाजी मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक : राज शांडिल्य
लेखक : राज शांडिल्य, नरेश कठुरिया
कलावंत : आयुष्मान खुराणा, अन्नू कपूर, परेश रावल, विजय राज, असरानी, मनोज जोशी, मनज्योत सिंग, सीमा पाहवा, अनन्या पांडे आदी.
संकलन : हेमल कोठारी
दर्जा : अडीच स्टार
Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy