Home » फिटनेसच्या बाबतीत आजच्या पिढीतील अभिनेत्रींना टक्कर देणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा उत्तम आरोग्यासाठीचा खास कानमंत्र

फिटनेसच्या बाबतीत आजच्या पिढीतील अभिनेत्रींना टक्कर देणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा उत्तम आरोग्यासाठीचा खास कानमंत्र

मनोरंजनविश्वात फिटनेसला आणि तुमच्या लुक्सला अनन्यसाधारण महत्व असते. आपण उत्तम कसे दिसू यासाठी सर्वच कलाकार प्रयत्नशील असतात. विविध प्रकारचे व्यायाम, डायट असे करत ते स्वतःला फिट ठेवतात. मराठी कलाकार देखील याला अपवाद नाही. मराठीमधील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखल्या ऐश्वर्या नारकर यांचा देखील त्यांचा फिटनेस आणि त्यांचे सौंदर्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने स्वतःला मेंटेन ठेवले आहे.

हिंदी आणि मराठी अशा दोन्ही ठिकाणी काम करणाऱ्या ऐश्वर्या सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ह्या मालिकेत ‘रुपाली राज्याध्यक्ष’ ही नकारात्मक भूमिका साकारतात आहे. १४ -१४ तास शूटिंग करून शिवाय इतर कामामध्ये व्यस्त असूनही फिटनेस आणि निरोगी जगण्यासाठी त्या काय काय करतात? आणि फिटनेसला कसा वेळ देतात? या बाबतीत त्यांनी काही सोपे उपाय सांगितले आहेत.

ऐश्वर्या नारकर ह्या गेल्या वीस वर्षा पासून जिम आणि वेट ट्रेनिंग करत आहे. नुकतंच त्यांनी योग सराव करायला देखील सुरवात केली आहे. त्यांच्या सुंदर त्वचेचे आणि दाट केसांचे रहस्य व्यायाम आणि शुद्ध सात्विक आहारच असल्याचे त्यांनी सांगितले. या फिटनेस जीवनशैलीबद्दल त्यांनी मत व्यक्त करतांना सांगितले की, “माझा दिवस सकाळी ५:३० वाजता सुरु होतो आणि शूटिंगला जाण्याची तयारी करून मी रोज अंदाजे ३० – ४० मिनिटं योग करते यामुळे मला स्फूर्ती आणि मनाची शांती मिळते. सोबतच दिवसभर टिकेल एवढी ऊर्जा देखील मला या योगातून मिळते. योग मी माझ्या पुतणी कडून शिकते आहे.”

पुढे ऐश्वर्या म्हणाल्या, “माझी पुतणी एक योग प्रशिक्षक आहे. व्यायाम करण्यासोबत मी पौष्टिक आहार घेते. गव्हाचे आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळते. माझा सगळा आहार शुद्ध तुपामध्ये बनतो. भात हा पदार्थ माझ्या आहारात लहानपणापासून आहे. सगळ्यांना माझे हेच सांगणे आहे की, तुमच्या लहानपणीच्या खाण्याच्या सवयी मोडू नका. आपल्या आयुष्यात समतोल आणि सातत्य ठेवले की आपले आरोग्य निरोगी राहते. माझ्यासाठी निरोगी राहण्याचे मंत्र म्हणजे झोप, पौष्टीक आहार आणि व्यायामच आहे.”

दरम्यान ऐश्वर्या यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्या मागील अनेक वर्षांपासून या मनोरंजनाच्या विश्वात सक्रिय आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक आणि शो केले आहेत. शिवाय हिंदीमध्ये देखील त्यांनी अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सर्वच भूमिका कमालीच्या गाजल्या आहेत. सध्या त्या सोशल मीडियावर देखील भन्नाट रिल्स करत सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy