Home » The Vaccine War Movie Review: संघर्षाचा खरा-खुरा डोस ?

The Vaccine War Movie Review: संघर्षाचा खरा-खुरा डोस ?

The Vaccine War Movie Review

करोनाच्या कालावधीचा जगभरात कसा परिणाम झाला हे सर्वांनाच माहीत आहे. या साथीच्या आगीत आपल्या आजूबाजूचा प्रत्येक जण होरपळून निघाला होता. कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या आयुष्यावर, जनजीवनावर या साथीचा या ना त्या मार्गाने परिणाम झाला. ज्यांनी आपल्या जवळची माणसं गमावली त्यांच्यासाठी तर हा काळ सर्वाधिक विघातक ठरला. काहींनी आपले प्रियजन गमावले, काहींना त्यांच्या उदरनिर्वाह पासून वंचित राहावे लागले, काही त्यांच्या जमिनीपासून विभक्त झाले. हा सर्व लेखाजोखा आपण वृत्तपत्रात, अग्रलेखात वाचला. तसेच आतापर्यंत अनुभव सिन्हा (क्राउड), मधुर भांडारकर (इंडिया लॉकडाउन), प्रतीक मोइत्रो (मायनस ३१: द नागपूर फाइल्स) यांच्या चित्रपटात पाहिला देखील. जिथे करोना व्हायरस आणि लॉकडाऊनचे भयंकर परिणाम दाखविण्याचा प्रयत्न त्या-त्या दिग्दर्शकाने केला होता. विवेक अग्निहोत्रीचा ‘द व्हॅक्सिन वॉर‘ हा सिनेमा देखील त्याच मालिकेतील चित्रपट आहे, परंतु सिनेमात दाखवलेली ही बाजू जितकी संघर्षमय आहे तितकीच ती प्रेरणादायी आहे. कारण, या सिनेमात तुम्हाला भारताची स्वतःची लस बनवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांचा प्रवासाचे कथन करण्यात आले आहे. (The Vaccine War Review)

‘द वॅक्सिन वॉर’ चित्रपटाची कथा ही सर्व सामान्य कथा नाहीये. हा चित्रपट थ्रिलर नाहीये पण ही कथा खूप महत्त्वाची आहे. आपल्याला पुन्हा ‘जीवन’ मिळण्याची ही रंजक गोष्ट आहे. अगदी एका ‘फेरी टेल’प्रमाणे आणि काहीशी एखाद्या ‘फार्स’ प्रमाणे देखील! लस कशी बनवली गेली? हा या सिनेमाचा मूळ कथाबीज असला तरी या सिनेमात अनेक खुले-छुपे उपकथानक आहेत. ज्यातील काही वास्तविक वाटतात तर काही मुद्दाम अलंकारिक केल्यासारखे साखरेच्या पाकात बुडाल्यासारखे आहेत. अनेक ठिकाणी सिनेनिर्मात्यांच्या हेतूवर देखील तुम्ही प्रश्न.. करु शकता. पण, हा सिनेमा म्हणून हा सिनेमा तुमचा दोन घडीचा विरंगुळा करण्यात यशस्वी होतो. तर मूळ कथानकात.. लस कशी तयार झाली? त्यावेळी कोणती आव्हाने होती? आपण परदेशातून ही लस का घेतली नाही? कोण विरोधात होते? माध्यमांची यामध्ये काय भूमिका  होती? सोशल मीडियाने या दरम्यान काय केले? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सिनेमात मिळतील. परंतु, ही सर्व पटकथात पूर्णपणे खरीखुरी आहे का? यावर प्रत्येक प्रेक्षकाने स्वतःच्या आकलनशक्तीच्या बळावर विश्वास ठेवावा. जे दिसतंय ते पूर्णपणे ‘सत्य’ आणि जे दिसत नाही ते ‘असत्या’ आहे; या चक्रव्ह्यूकात अडकू नये. सिनेमाकडे केवळ सिनेमा सारखे पाहावे.

सिनेमाची कथा २०२० ते २०२२ या दरम्यान घडणारी आहे. कथेची सुरुवात जानेवारी २०२०मध्ये होते. चीनच्या वुहानमधून येत असलेल्या व्हायरसच्या बातमीनंतर आयसीएमआर टीम सतर्क होते. भारतात त्याचा कसा प्रभाव पडेल हे लक्षात घेऊन, त्याच्याशी लढण्याची तयारी सुरू होते. मात्र, शास्त्रज्ञांची टीम मिळून आपल्या देशासाठी लस कशी तयार करते आणि त्या संपूर्ण प्रवासात त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे पाहायला मिळत आहे. या दरम्यान सगळ्या प्रकियेसाठी सध्याच्या सरकारचा पाठिंबा, सर्व वाद, करोनाची वाढती प्रकरणे आणि त्यामुळे होणारे लोकांचे मृत्यू या सर्व बाबींना एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न पटकथेत करण्यात आला आहे. पटकथेच्या प्रारंभी.. संपूर्ण देश नवीन वर्षाच्या उत्सवात मग्न असताना, आयसीएमआर (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे) महासंचालक बलराम भार्गव यांना एका विषाणूची माहिती मिळते; ज्याचा रुग्ण चीनच्या वुहानमध्ये आढळला आहे. करोनाचा भारतावर काय परिणाम होईल? यावर चर्चा केल्यानंतर, बलराम भार्गव (नाना पाटेकर) आणि त्यांच्या संपूर्ण टीमला कोविड १९ विरुद्ध भारतातील पहिली लस बनवण्याची जबाबदारी देण्यात देते. इथून सिनेमा सुरु होतो.

बलराम यांची संपूर्ण टीम युद्धपातळीवर लस तयार करण्याच्या मोहिमेत सहभागी होते. ही कथा लस बनवताना शास्त्रज्ञांसमोरील आव्हाने तसेच त्याच्या घरगुती पैलूंच्या गुंतागुंतीसह पुढे जाते. बलरामच्या या टीममध्ये पल्लवी जोशी, निवेदिता भट्टाचार्य, सप्तमी गौडा यांसारखे आश्वासक शास्त्रज्ञ आहेत, तर दुसरीकडे सरकारविरोधी पत्रकार रायमा सेन ही लस बनवण्याच्या अशक्यप्राय वाटणाऱ्या काहीश्या ‘ग्रे’ शेडमध्ये दिसते. करोनाच्या काळात अपुरी संसाधने आणि चहूबाजूंनी विरोध असताना भारतीय शास्त्रज्ञ जिद्दीने लस कशी बनवतात? याचं चित्रण सिनेमा घडवतो. विवेक अग्निहोत्री याने या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ‘करोना’ परिस्थितीकडे एका नवीन दृष्टीकोनातून बघण्यात आले आहे. डॉक्टर आणि मजुरांच्या दृष्टीकोनातून आपण अनेक कथा पाहिल्या आहेत. पण, एक शास्त्रज्ञ आणि त्यांची जिद्द या सिनेमाच्या कथानकात दिसून येते. लसीच्या निर्मितीच्या कथेसोबत, विवेकचा चित्रपट महिला सक्षमीकरणावर देखील भाष्य करतो. सगळ्या महिला शास्त्रज्ञांचे समर्पण या चित्रपटात सुंदरपणे दाखवण्यात आले आहे. महिला शास्त्रज्ञ त्यांचे कर्तव्य आणि कुटुंब यांच्या जबाबदाऱ्या पार पाडूनही.. ही किमया साधून दाखवतात. परिणामी सिनेमाला तुम्हाला गुंतवून ठेवतो. (The Vaccine War Movie Review)

चित्रपटात असे अनेक क्षण आहेत, जेव्हा आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटेल. तो माहोल दिग्दर्शकाने स्क्रिनवर उत्कृष्टपणे उतरवला आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध खूपच मनोरंजक आहे आणि आपल्याला गुंतवून ठेवतो, परंतु उत्तरार्धात चित्रपटाचा वेग कमी होतो आणि सरकारच्या कामगिरीचा गौरव करताना दिसते. हा सर्व मामला मुद्दाम ताणल्याचे जाणवते. कथेत सरकारविरोधी माध्यमांचा प्रतिनिधी म्हणून रायमा सेनचे पात्र अतिशयोक्तीपूर्ण वाटते. खरं तर, ती कथेची खरी खलनायक आहे, परंतु विवेक या पैलूचा समतोल राखण्यात अपयशी ठरला आहे. माध्यमांच्या नकारात्मक बाजूंबरोबरच त्यांनी सकारात्मक बाजूही दाखवायला हव्यात. (The Vaccine War Movie Review In Marathi)

अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट काही कमी नाही.. नाना पाटेकर यांनी बलराम भार्गवच्या भूमिकेत दमदार पुनरागमन केले आहे. त्याची अभिनयाची विशिष्ट शैली आणि तो पॉजसह संवाद बोलण्याची पद्धत पडद्यावर मजेदार दिसते. अनेक सक्षम अभिनेत्री या चित्रपटात महिला शास्त्रज्ञांच्या भूमिकेत दिसतात, ज्यामध्ये पल्लवी जोशी तिच्या दमदार शैलीत दिसते. तिने तिच्या डायलॉग डिलिव्हरी आणि भावनिक दृश्यांमध्ये मन जिंकले आहे. शास्त्रज्ञांच्या टीममध्ये समाविष्ट सप्तमी गौडा आणि निवेदिता बसू यांनी उत्कृष्ट काम केले आहे. अनुपम खेरसारख्या सक्षम अभिनेत्याला फारशी स्क्रीन स्पेस दिली गेली नाही. सपोर्टिंग कास्ट मजबूत आहे. रायमा  सेननं पत्रकाराची भूमिका चांगल्या पद्धतीने साकारली आहे.

एकंदरच पुन्हा एकदा लिहावेसे वाटते… सिनेमात सर्वकाही उत्तम आहे. परंतु, ‘सिनेमा हा सिनेमा म्हणून पाहावा.’

सिनेमा : द व्हॅक्सिन वॉर
लेखक, दिग्दर्शक : विवेक अग्निहोत्री
कलाकार : नाना पाटेकर, पल्लवी जोशी, सप्तमी गौडा, रायमा सेन, अनुपम खेर, गिरिजा ओक
दर्जा : तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy