Home » Sam Bahadur Review: अभिनय कौशल्याचा माहितीपट!

Sam Bahadur Review: अभिनय कौशल्याचा माहितीपट!

Sam Bahadur Review In Marathi

बायोपिक कथांनी नेहमीच चित्रपट निर्मात्यांना आणि लेखक-दिग्दर्शकांना आकर्षित केले आहे. भारताचे लष्करप्रमुख आणि पहिले फील्ड मार्शल माणेकशॉ यांचा विचार केला जातो, तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचल्या शिवाय राहत नाही. ‘राझी’ सिनेमाच्या यशानंतर मेघना गुलजार – विकी कौशल ही जोडी पुन्हा एकदा ‘सॅम बहादुर’ साठी एकत्र आलीय. पण, एकीकडे अभिनेता म्हणून विकी कौशलने सिनेमातील चरित्रनायकाची भूमिका उभी करण्यासाठी साकारलेला अभिनिवेश जितका जबरदस्त आहे; त्या विरुद्ध मेघना गुलजार कथानक पडद्यावर मांडण्यात कमी पडली आहे. चित्रपट पाहताना तुम्हाला या बायोपिकच्या संपूर्ण सिनेमॅटिक अनुभवापासून वंचित राहिल्याचे जाणवते. असे असूनही माणेकशॉ यांच्या व्यक्तिरेखेतून विकी कौशलने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. जो चित्रपटातील सर्वात मजबूत दुवा आहे. (Sam Bahadur Review)

आत्मविश्वासाने जन्मभूमी आणि कर्मभूमीच्या राष्ट्रपथावर चालणारे भारताचे पहिले फील्ड मार्शल; सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ यांची प्रेरणादायी जीवनगाथा दिग्दर्शिका मेघना गुलजार हिने ‘सॅम बहादुर‘च्या निमित्ताने पडद्यावर मांडली आहे. अभिनेता विकी कौशल याने सॅम माणेकशाॅ यांचे व्यक्तिमत्व निष्टेने आत्मसात करत ‘सॅम बहादूर’ उभा केला आहे. कथानक माणेकशॉ (विकी कौशल) यांच्या जन्मापासून सुरू होते, जिथे त्याचे पालक त्याला वेगळे नाव देऊ इच्छित होते. त्यानंतर १९३२ मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनच्या पहिल्या तुकडीत सामील होण्यापासून ते देशाच्या पहिल्या फील्ड मार्शल पदापर्यंत पोहोचण्यापर्यंतची कथा अनेक चढउतारांमधून पडद्यावर दिसते. माणेकशॉ यांच्या तरुणपणाच्या कुकर्मांपासून ते रणांगणावरील शौर्य दाखवण्यापर्यंत ही कथा अनेक कालखंडात विभागली गेली आहे. सॅम आणि याह्या खान (झीशान अयुब) फाळणीपूर्वी भारतीय लष्कराचा भाग होते, दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. फाळणीनंतर याह्या पाकिस्तानी लष्कराचा भाग झाला. तथापि, मोहम्मद अली जिना यांनी माणेकशॉ यांना पाकिस्तानी सैन्याचा भाग बनण्याची ऑफर देखील दिली, परंतु माणेकशॉ भारताची निवड करतात. हा सिनेमातील प्रसंग कथानकाचा सार सांगून जातात.

कथेचा पहिला भाग सॅमच्या वैयक्तिक आयुष्याशी विणलेला आहे, जिथे त्याचे लग्न सिल्लू (सान्या मल्होत्रा) सोबत होते. त्यांना लष्करातील राजकारणाचेही बळी व्हावे लागते. त्यांच्यावर राष्ट्रविरोधी कारवाई केल्याचा गुन्हाही दाखल होतो. सिनेमाच्या पूर्वार्धात पंडित जवाहरलाल नेहरू (नीरज काबी) सॅमच्या शौर्याने आणि दूरदृष्टीने प्रभावित झालेले आहेत तर उत्तरार्धात पंतप्रधान इंदिरा गांधी (फातिमा सना शेख) आणि सॅम यांची राष्ट्रनिष्ठ नजरेत पडते. इंदिरा आणि माणेकशॉ यांच्यात वैचारिक मतभेद आहेत, पण शेवटी माणेकशॉ श्रीमती गांधींवर वरही आपला प्रभाव सोडण्यात यशस्वी होतात. पाकिस्तानातील आगामी सत्तापालटाबद्दल घाबरलेल्या इंदिरा गांधींनी त्यांना विचारले की भारतातही तेच करण्याचा त्यांचा विचार आहे का, तेव्हा त्यांनी इंदिराजींना घाबरण्याची गरज नाही असे स्पष्ट उत्तर दिले. त्यांना राजकारणात रस नाही; असे सॅम स्पष्टपणे नमूद करतात. सिनेमाच्या कथानकात बरीच ऐतिहासिक माहिती प्रेक्षकांच्या नजरेत पडते. परंतु, सिनेमातील नाट्य तितकेसे दिसत नाही.  (Sam Bahadur Review In Marathi)

‘तलवार’ आणि ‘राझी’ सारख्या लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपटांच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी बायोपिकसाठी सशक्त विषय आणि विक्की कौशलच्या रूपाने एक सशक्त अभिनेता निवडला, पण समस्या तेव्हा येते जेव्हा कथा अनेक कालखंडात विभागलेली दिसते. पसरलेली पटकथा सिनेमाचा प्रभाव कमी करतो. एकीकडे पूर्वार्ध खूप सपाट आहे. तर उत्तरार्ध चांगला जमून आला आहे. पण, नायकाचा रुपात सिनेमाचा कळस मजबूत आहे. हा चित्रपट डॉक्युड्रामाच्या शैलीत सादर करण्यात आला आहे. गोरखा रेजिमेंटशी सॅमचे संभाषण, त्याच्या स्वयंपाकीसोबतचे त्याचे नाते, इंदिरा गांधींसोबतचे क्षण यासारख्या चित्रपटातील अनेक दृश्ये मनोरंजक बनली आहेत, परंतु चित्रपट तुकड्या-तुकड्यांमध्ये मनोरंजन करण्यास सक्षम आहे. आपल्या अव्वल दिग्दर्शनासाठी कोणत्याही थराला जायला तयार असलेली मेघना आपल्या दिग्दर्शन कौशल्याने माणेकशॉला जिवंत करते, पण त्याच्याशिवाय इतर ऐतिहासिक पात्रांचे व्यक्तिचित्रण करण्यात ती कमकुवत ठरते.

Sam Bahadur Review In Marathi

माणेकशॉ यांना नायक बनवण्याच्या प्रक्रियेत इतर पात्रे फिकी पडली आहेत. युद्धाच्या दृश्यांमध्ये तणाव आणि थराराचा अभाव आहे, होय १९७१ चे युद्ध पाहण्यासारखे आहे. मात्र मेघनाने चित्रपटात अनेक ठिकाणी रिअल फुटेज वापरून कथेला अस्सल कवच देण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. जय आय. पटेल यांचे छायांकन आणि नितीन वैद्य यांचे संयोजन सुरेख आहे. शंकर-एहसान-लॉय यांच्या संगीतात गुलजार यांनी लिहिलेले गीत सुरेख आणि श्रवणीय झाले आहे.

हे स्पष्ट आहे की हा विकी कौशलचा प्रत्येक पातळीवर चित्रपट उचलून ठरतो आणि त्याने माणेकशॉ यांच्या व्यक्तिरेखेमध्ये खरा ठरतो. त्याची देहबोली, संवादफेक आणि पात्राप्रती कमालीचे समर्पण पडद्यावर स्पष्टपणे दिसते. व्यक्तिरेखेच्या प्रत्येक पैलूचा त्याने बारकाईने शोध घेतला आहे. माणेकशॉच्या पत्नी सिल्लूच्या भूमिकेत सान्या मल्होत्राची उपस्थिती कथेत काही विशेष जोडण्यात अपयशी ठरली. इंदिरा गांधींची भूमिका करणारी फातिमा सना शेखही इंदिरा गांधींचे खास वैशिष्ट्य मानल्या जाणाऱ्या भडकपणा आणि जोमापासून दूर असल्याचे दिसते. मोहम्मद झीशान अयुबने जनरल याह्या खानच्या तरुणाईची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे, तर सरदार पटेलांच्या भूमिकेतील गोविंद नामदेव आणि पंडित नेहरूंच्या भूमिकेतील नीरज काबी हे अपेक्षेप्रमाणे आपली किमया दाखवत नाहीत. एकंदरीत सिनेमा माहितीपूर्ण आणि बघण्याजोगा जरूर असला तरी रंजकतेची उच्च सिमा गाठत नाही.  

सिनेमा : सॅम बहादुर (Sam Bahadur)
निर्मिती : रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक : मेघना गुलजार
लेखन : भवानी अय्यर, शंतनू श्रीवास्तव, मेघना गुलजार
कलाकार : विकी कौशल, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, मोहम्मद ज़ीशान अय्यूब
छायांकन : जय आय. पटेल
दर्जा : तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy