Home » Mr. & Mrs. Mahi Movie Review : भावनिक यशाचा षटकार!

Mr. & Mrs. Mahi Movie Review : भावनिक यशाचा षटकार!

लॉकडाऊन पश्चात हिंदी सिनेसृष्टीचे हे एक सुंदर ‘युग’ आहे, जिथे प्रत्येक रंगा-ढंगाचेचे चित्रपट बनवले जात आहेत. यातील एक रंग म्हणजे आपल्या स्वप्नांचा पाठलाग सोडून दिलेले पती-पत्नी एकमेकांचा आधार बनतात आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आता पुढे कोणत्याही थराला जातात. दिग्दर्शक शरण शर्माने राजकुमार राव आणि जान्हवी कपूर या पडद्यावरील नव्या जोडीसोबत अशीच एक सुंदर कथा पडद्यावर रेखाटली आहे. ज्यांनी आपली स्वप्ने सोडली आणि जीवनाच्या धावपळीत स्वतःला सामील करुन घेतलं, परंतु आता क्रिकेटसारखा उत्कट खेळ दोघांनाही एकत्र एका टप्प्यावर कशाप्रकारे आणते? याचं मनोरंजक उत्तर हा सिनेमा देऊ पाहतो. एखादं ध्येय गाठता-गाठता आयुष्यातली वळणं, नाती, आप्तस्वकीयांशी असलेला स्वतःशी संवाद, प्रेम, काळजी आदी भावभावनांमध्ये सुखाने अडकतो. पण, आयुष्यात राहून गेलेलं असं ध्येय जे आता मिळवायचं आहे. त्यात हे ध्येय जर एखाद्या खेळात प्राविण्य मिळवण्याचं असेल, तर मग खिलाडूवृत्तीनं जगणं काय असतं? याचं सहजसुंदर उत्तरही हा सिनेमा देतो. ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट ‘स्पोर्ट्स ड्रामा’ असला, तरी आयुष्याचा भावनिक पदराचे अनेक पैलू यात दडलेले आहेत. जे पटकथेत एकामागोमाग एक अलगदपणे उलगडले जातात. काही ठिकाणी गुंता झाला असला तरी प्रेक्षकांवर सिनेमाच्या पडणाऱ्या अंतिम प्रभावावर सिनेमाचं यश दडलेलं आहे.

जयपूरमध्ये राहणाऱ्या महेंद्र (राजकुमार राव)पासून ही कथा सुरू होते. तो यापूर्वी क्लब स्तरावर खेळला आहे, एमएस धोनीसारखे चौकार आणि षटकार मारले आहेत, परंतु राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यात तो अपयशी ठरतो. आता परिस्थिती अशी आहे की, तो त्याच्या वडिलांच्या (कुमुद मिश्रा) क्रीडावस्तू दुकानात सेल्समन झालेला आहे. क्रिकेटमधले अपयश आणि घरात त्याच्या अभिनेत्या भावाची लोकप्रियता यामुळे तो आयुष्यात काही करू शकत नसल्याच्या न्यूनगंडाने ग्रस्त आहे, पण, नंतर त्याचे लग्न एक डॉक्टर असलेल्या महिमा (जान्हवी कपूर) सोबत निश्चित होते.

महेंद्रप्रमाणेच महिमाचे टोपणनावही माही आहे. जेव्हा वडील आपला मुलगा महेंद्रला एक यशस्वी व्यापारी म्हणून महिमाच्या कुटुंबासमोर सादर करतात, तेव्हा महेंद्र महिमाला त्याचे सत्य खुलेपणाने सांगतो. की, तो आयुष्यात हरलेला आहे. त्याच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन महिमा लग्नाला होकार देते. लग्नानंतर महेंद्रला कळले की त्याच्याप्रमाणे महिमाही केवळ क्रिकेटची वेडी नाही तर ती एक धुरंधर फलंदाजही आहे. वडिलांच्या दबावामुळे तिला डॉक्टरही व्हावे लागले. आता महिमाला क्रिकेटर बनवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. पण, या प्रवासात महेंद्रलाही त्याचा अहंकार, गर्व, असुरक्षितता आणि स्वप्नांच्या आत्मसाक्षात्कारातून जावे लागते.

पती आपल्या पत्नीला पुढे घेऊन जाण्याच्या चांगल्या हेतूच्या ध्यागावर या सिनेमाची पटकथा पुढे सरकते. दिग्दर्शक शरण शर्मा ने ती प्रामाणिकपणे पडद्यावर रेखाटण्याचा प्रयत्न केलाय. परंतु, पात्रे आणि कथा प्रस्थापित करण्यात तो इतका वेळ रमला आहे की, पूर्वार्धातच तो कंटाळवाणा होऊन जातो. जेव्हा क्रिकेट हा कथेचा आधार बनतो तेव्हा चित्रपट उत्तरार्धात वेग घेतो. पण, इथे क्रिकेटसारख्या वेड्या खेळाची आवड दाखवण्यात शरण शर्मा कमकुवत झाला आहे. तथापि, त्याने आशा, निराशा आणि असुरक्षिततेच्या भावनांचे चित्रण केले आहे.

चित्रपटाची पटकथा अधिक घट्ट करता आली असती. संवादही सरासरी आहेत, पण, गाणी आणि संगीताच्या बाबतीत ‘देखा तेनू’, ‘अगर हो तुम’ आणि ‘रोया जब तू’ ही गाणी चांगली झाली आहेत. चित्रपटात काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत, पालकांनी मुलांचे विचार जाणून घेणे का महत्त्वाचे आहे? आणि खरा आनंद बाहेर नसून तुमच्या आत आहे; हेही हा सिनेमा सांगू पाहतो.

नवरा-बायकोचं नातं, लग्न झाल्यावरचं अवघडलेपण, खेळाचं प्रशिक्षण, क्रिकेट सामने या दरम्यान फुलत जाणारं त्याचं नातं हा भाग अतिशय रंजकतेनं समोर येतो. दिग्दर्शक शरण शर्मानं ‘स्पोर्ट्स ड्रामा विथ लव्हस्टोरी’ ही भट्टी छान जमवली आहे. पूर्वार्ध घडामोडींचा असला, तरी उत्तरार्धात महेंद्रचा माणूस म्हणून स्वतःशी होणारा संघर्ष किंवा ‘बायकोच्या प्रगतीनं अवस्थ होणारा पती’ दाखवताना चित्रपट काहीसा संथ आणि कृत्रिम वाटू लागतो.

हा चित्रपट अभिनयाने समृद्ध आहे. महेंद्रच्या भूमिकेत राजकुमार राव पुन्हा एकदा आपल्या प्रतिभेने बहरला आहे. नायक असूनही, त्याने आपली गर्विष्ठ आणि असुरक्षित राखाडी बाजू सशक्त रीतीने चित्रित केली आहे. कुमुद मिश्रा, झरिना वहाब आणि राजकुमार यांच्याही भूमिका नेहमीप्रमाणे सफाईदार. संवाद, संगीत-पार्श्वसंगीत, छायांकन व इतर तांत्रिक बाजूही उत्तम. दिग्दर्शक शरण शर्मासोबत जान्हवी कपूरचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी तिने त्याच्यासोबत ‘गुंजन सक्सेना’मध्ये काम केले होते. या चित्रपटातही त्याच्यासोबत दिग्दर्शकाने उत्तम काम केले आहे. जान्हवी तिच्या भूमिकेशी पूर्णपणे प्रामाणिक आहे. एकंदरच ‘आपलं य़श आणि त्याचं मोजमाप हे कायम इतरांच्या नजरेत नव्हे, तर आधी स्वतःला शोधण्यात दडलेलं असतं’ असा सुंदर षटकार लगावत सिनेमा आपलं मन जिंकतो.

सिनेमा : मिस्टर अँड मिसेस माही
निर्माता : करण जोहर
दिग्दर्शक : शरण शर्मा
लेखक : निखिल मल्होत्रा-शरण शर्मा
कलाकार : राजकुमार राव, जान्हवी कपूर, राजेश शर्मा, कुमुद मिश्रा, झरिना वहाब, यामिनी दास व इतर
दर्जा : साडे तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy