Home » Swatantra Veer Savarkar Review: इतिहासाचा एकपात्रीपट!

Swatantra Veer Savarkar Review: इतिहासाचा एकपात्रीपट!

Swatantra Veer Savarkar Review

आपल्या अतुलनीय आणि नैसर्गिक अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेते रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांचा जीवनपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ करतोय. या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे सुरुवातीला स्वतः रणदीप या सिनेमाचे दिग्दर्शन करणार नव्हता. तो केवळ सावरकरांची व्यक्तिरेखा सिनेमात साकारणार होता. ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर या सिनेमाचे मुळतः दिग्दर्शन करणारे होते. परंतु, काही ‘क्रिएटिव्ह डिस्प्युट’मुळे मांजरेकरांनी हा सिनेमा सोडला’ अशी चर्चा त्यावेळी झाली. परिणामी, अभिनयासोबत रणदीपने सिनेमाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचलण्याचेही ठरवले. परंतु, यात तो पूर्णपणे यशस्वी झालाय! असं म्हणता येणार नाही. कारण, तसं करण्यात तो निम्मा अपयशी ठरला आहे. अभिनेता म्हणून त्याने जी किमया या सिनेमात केली आहे ती कल्पकता आणि तटस्थथपणा दिग्दर्शक म्हणून त्याला पडद्यावर दाखवता आलेली नाही. आता चर्चात्मक व्यक्तिमत्व म्हणल्यावर ‘वाद’ आणि त्यानिमित्ताने विविध मतप्रवाह आलेच. त्यांच्याकडे कानाडोळा करुन चालणार नाही. त्यात सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सिनेमाच्या पडद्यावरील मत प्रवाहाचा परिणाम या वाहत्या वाऱ्यांवर होऊ शकतो? हे विचारात घेणंही तितकच आवश्यक आहे. तर दिग्दर्शक म्हणून जरी रणदीप काहीसा अपयशी ठरला असला तरी अभिनेता म्हणून त्याला आणि त्याच्या सादरीकरणाला ‘पूर्ण मार्क्स’ द्यायला हवेत. कारण, व्यक्तिरेखा म्हणून त्याने विनायक दामोदर सावरकर यांना पडद्यावर अक्षरशः जिवंत केलं आहे. पण, या व्यक्तिरेखेचा गौरव करण्यासाठी अनेक ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यास तो कमी पडला नाही. एखाद्या विशिष्ट ऐतिहासिक किंवा व्यक्तीवर जेव्हा चित्रपट बनतो तेव्हा त्याच्या शौर्याला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवला जातो हे अगदी साहजिक आहे, पण त्याला कथेत श्रेष्ठ बनवायचे असेल तर इतर महत्त्वाची पात्रे लहान केल्यास.. ती प्रेक्षकांना अस्वस्थ करू शकते. चरित्र व्यक्तीच्या मुखातील इतिहास सांगण्या-दाखवण्यापेक्षा चरित्र व्यक्तीचा इतिहास पडद्यावर दिसला असता तर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा म्हणून पूर्णत्वाच्या दिशेने गेले असता.  (Swatantra Veer Savarkar Review)

वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा त्यांच्या बालपणापासून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतचा प्रवास करते. सावरकरांची अखंड भारताची अदम्य इच्छा कशी होती? हे या कथेतून प्रामुख्याने दिसून येते. ‘इंग्रजांपासून स्वातंत्र्य हे अहिंसेने मिळू शकत नाही!’ असा त्यांचा अढळ विश्वास होता. सिनेकथा प्लेगपासून सुरू होते, एक भयंकर रोग जो १८व्या शतकाच्या उत्तरार्धात पसरला होता. देश इंग्रजांचा गुलाम आहे आणि याच गुलामगिरीत वीर सावरकरांचा जन्म झाला. यात तरुण सावरकर आपल्या वडिलांच्या मृत्यूचे साक्षीदार होते आणि नंतर स्वतःचा क्रांतिकारक होण्याचे दिशेने प्रवास करतात. या प्रवासात त्यांच्या भाऊ देखील त्यांच्या सोबत असतो. त्याच्या प्रवासाचा पहिला थांबा फर्ग्युसन कॉलेज आहे, जिथे ते लोकनेते लोकमान्य टिळकांना भेटतात आणि क्रांतीची आग पेटवण्यासाठी ‘अभिनव भारत’ नावाची क्रांतिकारी संघटना तयार करतात. तोपर्यंत वीर सावरकरांचा विवाहही होतो.

ब्रिटिशांना धडा शिकवण्यासाठी ते ब्रिटिश कायदा शिकण्यासाठी लंडनला पोहोचतात. तिथे त्यांची भेट स्वातंत्र्यसैनिक मदनलाल धिंग्रा, मॅडम कामा आणि श्यामजी यांच्याशी होते. लंडनमध्येही ते ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवतात. त्यांना अटक केली जाते. त्यांना अवैधरित्या भारतात पाठवून काळ्या पाण्याची शिक्षा दिली जाते. त्यांनतर सिनेमा सावरकरांच्या जीवनातील प्रमुख जीवनकाळावर प्रकाश टाकतो. सोबतच महात्मा गांधींसोबतचे त्यांचे संभाषण, फ्रान्समध्ये आश्रय मिळविण्यासाठी पळून जाण्याचा त्यांचा अयशस्वी प्रयत्न, अंदमान बेट उर्फ काला पानीमधील त्यांची जन्मठेपे आदी ठिकाणी सिनेमा रमतो. कालापानीमध्ये इंग्रजांनी त्यांच्यावर केलेला भयंकर छळ, इंग्रजांकडे दयेचा अर्ज आणि या याचिकेनंतर त्यांची अंदमान तुरुंगातून रत्नागिरी तुरुंगात झालेली बदली यासारख्या घटनांना घेऊन सिनेमा पुढे जातो. परंतु, पडद्यावर हा मामला अधिक लांबलेला आहे. कारण, सिनेमात मोंटाजच्या स्वरूपता सावकारांच्या नजरेतून संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. परिणामी सिनेमा मूळ विषयापासून काहीसा लांब पडतो. उत्तरार्धाच्या शेवटी सिनेमात हा सावरकरांच्या तुरुंगातून सुटल्यानंतर त्याच्या जीवनावर आणि राजकीय कारकिर्दीवरही प्रकाश टाकतो.

या चित्रपटात रणदीपने अभिनेता, दिग्दर्शक, लेखक अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत, पण लेखक-दिग्दर्शक म्हणून तो यात कमाल दाखवू शकलेला नाही. चित्रपटात रणदीपला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी असलेले मतभेद सन्माननीय रीतीने मांडता आले नाही. तो विशेषतः एकतर्फ़ा दिसतो. एका दृष्ट्यामधील त्यांचा तोंडी असलेला संवाद; ‘हा गांधी एवढा मोठा माणूस झाला का?’ यावर प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या शिवाय राहणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, जिना यांसारख्या बलाढ्य नेत्यांचे चित्रण वेगळ्या शैलीत करण्यात आले आहे. चाफेकर बंधू, कान्होजी आंग्रे ते भगतसिंग, मदनलाल धिंग्रा आणि सुभाषचंद्र बोस या सर्व महान स्वातंत्र्यसैनिकांना आणि नेत्यांना सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्याची आणि लढण्याची प्रेरणा दिली होती, अशी कथा ते मांडण्याचा प्रयत्न करतात; जे पुन्हा एकतर्फी आणि ग्लोरीफाय दिसते.  

चित्रपटाचा पूर्वार्ध थोडा संथ आहे, तर कथेला उत्तरार्धात वेगवान आहे. अशी, अनेक दृश्ये आहेत जी इतिहासात खूप महत्त्वाची आहेत, परंतु रणदीप त्यांना फक्त स्पर्श करतो. अभिनेता म्हणून त्याने सिमेमात एकपात्री प्रयोग घडवून आणला आहे. जुने कृष्णधवल वास्तविक दृश्ये आणि बातम्यांचा भरपूर वापर पटकथेत खुबीने करण्यात आला आहे. तो जुना काळ प्रतिबिंबित करण्यासाठी चित्रपटाचा टोन गडद ठेवण्यात आला आहे, सिनेमॅटोग्राफर अरविंद कृष्णा यांनी त्यांचे काम चोख बजावले आहे, परंतु चित्रपटाची लांबी निराशाजनक आहे, जोपर्यंत तुम्ही प्री-क्लायमॅक्सला पोहोचता तोपर्यंत तुम्ही अधीर होतात. कालापानीमध्ये चित्रण आणि रणदीपचा अभिनय हृदय पिळवटून टाकणारे असले तरी त्याची चिकित्सा डॉक्युड्रामासारखी वाटते. लेखक म्हणून रणदीप सावरकरांची व्यक्तिरेखा अनेक ठिकाणी परस्परविरोधी पद्धतीने मांडतो. चित्रपटात हिंदू आणि हिंदुत्वाबाबतची त्यांची विचारसरणी परस्परविरोधी दिसते.

आतापर्यंत प्रेक्षकांनी ‘हायवे’ आणि ‘सरबजीत’ हे रणदीपच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानले आहेत, परंतु निःसंशयपणे ‘सावरकर’ हा त्याच्या अभिनय काळातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक घटनांबरोबरच त्याचे टप्प्याटप्प्याने होणारे परिवर्तनही थक्क करणारे आहे. त्याने तरुण सावरकर ते मध्यमवयीन सावरकर असे ३० किलो वजनाने गमावलेले परिवर्तन आणि पात्राची कृती भावना त्या पात्राच्या आत्म्यापर्यंत पोहोचते. या व्यक्तिरेखेसाठी त्याची अथक मेहनत पडद्यावर स्पष्टपणे दिसते. अंकिता लोखंडेने सावरकरांची पत्नी यमुनाबाई म्हणून उत्तम काम केले आहे. मोठा भाऊ दामोदर सावरकर म्हणून अमित सियाल यांनी उत्कृष्ट काम केले आहे. मदनलाल धिंग्राच्या भूमिकेत मृणाल दत्तने उत्तम काम केले आहे. महात्मा गांधी बनलेले राजेश खेराही नैसर्गिक दिसतात. एकंदर सिनेमा म्हणून हा सावरकरांचा ‘पट’ अव्वल नसला तरी ‘एकपात्री’ म्हणून तो सकस आहे.  

सिनेमा : स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar)
निर्मिती : आनंद पंडित आणि रणदीप हुडा
दिग्दर्शक : रणदीप हुडा
कलाकार : रणदीप हुडा, अंकिता लोखंडे, अमित सियाल आणि राजेश खेरा
दर्जा : तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy