Home » आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला ‘मुसाफिरा’ २ फेब्रुवारीला घडवणार मैत्रीची सफर

आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला ‘मुसाफिरा’ २ फेब्रुवारीला घडवणार मैत्रीची सफर

आजपर्यंत आपण हिंदी, मराठीमध्ये मैत्रीवर आधारित अनेक उत्कृष्ट सिनेमे पाहिले आहेत. मात्र तरीही याच मैत्रीच्या विविध पैलूंना चित्रपटांच्या माध्यमातून उलगडून अधिक उत्तमोत्तम पद्धतीने प्रेक्षकांसमोर अजूनही आणले जाते. त्यामुळेच असे सिनेमे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. आता पुन्हा एकदा मैत्रीचा एक वेगळाच धागा घेऊन येतोय ‘मुसाफिरा’. पुःकर जोग, पूजा सावंत यांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचे नुकतेच भव्य पोस्टर समोर आले आहे.

या चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे सिनेमाचे शूटिंग झालेले स्थळ. ‘मुसाफिरा’ हा स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. मैत्री हा विषय नेहमीच प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. ‘मुसाफिरा’ ही असाच मैत्रीवर बेतलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता पुष्कर जोगनेच केले आहे.

चित्रपटाबद्दल पुष्कर जोगने सांगितले, ”स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेल्या पहिल्या भारतीय चित्रपटाचा मान ‘मुसाफिरा’ला मिळाला. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हा चित्रपट केवळ तरुणाईसाठी मर्यादित नसून हा चित्रपट प्रत्येक वयोगटासाठी आहे. हृदयस्पर्शी कहाणी असेलला हा चित्रपट जुन्या मैत्रीची आठवण करून देणारा आहे. आजच्या धकाधकीच्या काळात मित्रपरिवारापासून दूर गेलेल्या मित्रमैत्रीणींना पुन्हा एकत्र आणणारा ‘मुसाफिरा’ आहे. यात मैत्री आहे, धमाल आहे, भावनिक बंध आहेत आणि भांडणेही आहेत. कलाकारही उत्तम आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा मराठीत पदार्पण करत आहे. ‘मुसाफिरा’ प्रेक्षकांना मैत्रीची सुंदर सफर घडवणार, हे नक्की !”

खरंतर चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘मुसाफिरा’ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात ‘मुसाफिरा’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ढोल ताशाच्या गजरात ‘मुसाफिरा’च्या २० फूट लांब भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. प्रेमाची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या बिग बजेट चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, भोजपुरी स्टार स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy