Home » Ghar Banduk Biryani Movie Review: आशेची वेध घेणारी बंदूक!

Ghar Banduk Biryani Movie Review: आशेची वेध घेणारी बंदूक!

ghar banduk biryani

भेदाभेदीचा आहा हेरो
तुमच्या गादीचा आहा हेरो
वचपा घेयाचा आहा हेरो
हेरो हेरो हेरो हेरो…

सिनेमातील गाण्याच्या या ओळी केवळ एक उदाहरण; समाजाला खऱ्या परिस्थितीचा आरसा दाखवण्यासाठी. हे असे छोटे छोटे अनेक आरसे निरागसतेने दिग्दर्शक हेमंत अवताडे याने ‘घर, बंदूक, बिरयानी‘मध्ये दाखवले आहे. आता आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून त्या आरशात नेमकं काय ‘व्यंग’ दिसतंय? याचा शोध आपापला आपण घ्यायचा आहे. लेखक-दिग्दर्शक तुम्हाला या सिनेमात ‘स्पून फिडींग’ करायला येणार नाही. ज्याला जो अर्थ काढायचा आहे.. घ्यायचा आहे! तो त्याने स्वतःच्या आकलन शक्तीने काढावा. अशी ही ‘आशेची भांग’ आहे. कारण, वरकरणी हा सिनेमा तुम्हाला तद्दन ‘एंटरटेनमेंट..’वाला पट आहे. ई.. स्टाईलवाला हा सर्व मामला आहे. पण, या स्टाईल मध्ये लपलेले अधोरेखित करण्यासारखे अनेक ‘काल-आज-उद्याचे’ समकालीन प्रश्न तो निर्माण करतो. (Ghar Banduk Biryani)

इट्स जस्ट अ सिनेमा… अडीच तीन तासांचा तो पडद्यावरचा खेळ संपला की आपण म्हणतो. ती स्वप्नं, तो गुलाबी प्रणय, थिरकायला लावणारी गाणी, दे मार फाईट… काहीतरी चमचमीत खाऊन तृप्त झाल्यागत आपण त्या अंधारातून बाहेर येतो. बाहेरचा उकाडा, ट्रॅफिकचा कर्कश्य आवाज, गर्दी, धक्काबुक्की आणि आपलं सामान्यपण लक्षात आलं की स्वत:शीच हसून म्हणतो. इट्स जस्ट अ सिनेमा. मात्र आपलं सामान्यपणच दाखवणारा सिनेमा असेल तर…? आपली कुवत.. किंवा आपल्या सोबत समाजात वावरणाऱ्या इतर काही विशिष्ट घटकांची ती मार्मिक गोष्ट असेल तर? पडद्यावर स्वप्नरंजनच वाटणारा तो काही अंशी जरी खरा असेल आणि तो मनाला भिडत असेल तर.. सिनेमा गोष्ट सांगण्यात यशस्वी ठरतो. काहींन.. प्रेक्षकांना तो बटबटीत वाटेल; प्रसंगी खोटा देखील वाटेल. परंतु, म्हणतात ना.. ‘लव्ह मी ऑर हेट मी.. बट यु कान्ट इग्नॉर मी!’ तसंच काहीस ‘घर बंदूक बिरयानी’ सिनेमाचे झाले आहेत. हा सिनेमा थेट आपल्याला शहाणपण शिकवायला जात नाही. पण, मनोरंजनाच्या छायेत राहून मार्मिक दृष्टी देण्याचा प्रयत्न करतो.

चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक… म्हणतात ‘आशेच्या भांगेची नशा भारी.. घर बंदूक बिरयानी’. होय; खरंच ही ‘आशा’चा मनुष्याला पर्वताच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते आणि आशेच्या कचाट्यात सापडलेल्याला पार खड्यातही ढकलते. नागराज मंजुळे, हेमंत अवताडे लिखित हा चित्रपट आपल्याला याचं आशेच्या भांगेची चव चाखवतो. सिनेमाची कथा मुळात शीर्षकाला अत्यंत सूचक अशी आहे. तो याच तीन पायांवर उभा आहे.. होय ही तिपाई आहे. ‘घर, बंदूक, बिरयानी’ अर्थात ‘आकाश ठोसर, नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे’… कथानकाच्या भाषेत सांगायचं तर अनुक्रमे ‘आचारी राजू, पोलिस अधिकारी राया पाटील आणि नक्षलवादी पल्लम’ या तिघांनी उभारलेला हा डोलारा आहे. (Ghar Banduk Biryani Movie Review)

मराठी सिनेमांच्या पंगतीत हा सिनेमा थेट बसणार नाही. अनेकांची नाकं देखील मुरडली जातील. कारण, मराठी सिनेमांच्या चौकटीबाहेरील हा प्रकार आहे. आकर्षक आहे पण तितकाच बटबटीत देखील आहे. तुम्ही जर ‘दिग्दशर्क नागराज मंजुळे’चे चाहते असला तर तुम्हाला सिनेमातील थिल्लरपणा पचनी पडणार नाही. या नावातील दिग्दर्शक ही बाब बाजूला सारुन तुम्ही या सिनेमाकडे पाहिला; तो तुमचं मनोरंजन देखील करेल. त्यामुळे अभिनेता नागराज म्हणूनच तुम्हाला तो सिनेमाभर दिसतो. सोबतच एक क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून नागराजची ‘कल्पक’ बाजू देखील आपल्याला चित्रपट प्रकर्षाने दिसते.

लेखक आणि दिग्दर्शक म्हणून हेमंतची कसब देखील सिनेमात दिसते. त्यामुळे आजच्या तारखेतील मराठी सिनेमांच्या शृंखलेतील अवलिया असा हा सिनेमा इतरांपेक्षा वेगळा ठरतो. आता या सिनेमात सर्व आलबेल आहे मुळीच नाही. पूर्वार्धात सिनेमाची पटकथा भरकटली आहे. त्यामुळे तो अत्यंत रटाळ आणि कंटाळवाणा ठरतो. सिनेमा वेग पूर्वार्धात संथ आहे. सोबतच सिनेमाशी जुळवून घ्यायला देखील उशीर होतो. नेमकं सिनेमाला काय सांगायचंय? काय दाखवायचं? हे आपल्याला पूर्वार्धात आल्यावर कळते. तोवर पडद्यावर केवळ.. शो शायनिंग सुरु असते. पण, हा या शायनिंगच्या निमित्तानं मराठीच्या पडद्यावर ‘राया पाटील’ हा दमदार हिरो.. जन्माला आलाय. या हिरो म्हणे आता एक ‘सिनेमॅटिक राया युनिव्हर्स’ देखील सुरु होणार आहे. अर्थात सिनेमाचा दुसरा भाग देखील येणार आहे.

Nagraj Manjule

तर सिनेमाची गोष्ट अशी आहे; कोलागडमधील घनदाड जंगल परिसरातील नक्षलवाद्यांचा एक समूह आहे त्यांचा कमांडर पल्लम (सयाजी शिंदे) क्रूरही आहे आणि काहीसा विनोदी देखील; त्याच गावात एका ढाब्यावर काम करणारा आचारी राजू (आकाश ठोसर) आणि पुण्याहून बदली होऊन या परिसरात कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी आलेला एक पोलिस अधिकारी राया पाटील (नागराज मंजुळे); यांच्याभोवती हा सर्व कथापट फिरतो.

नक्षलवादी समूहाचा म्होरक्या पल्लम, आचारी राजू, आणि पोलिस अधिकारी राया पाटील या तिघांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घटना; कमीअधिक प्रमाणात एकसारख्या आणि एका धाग्यात विणलेलया आहेत. सोप्पे सांगायचे झाले तर; सर्व कोणत्याना कोणत्या आशेवर आहेत. म्हणून सिनेमा सुरुवातीचा अधोरेखित करतो की, ‘आशेच्या भांगेची नशा भारी’. एकाचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे, एकाचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आणि एकाचा आपलं कुटुंब असावं यासाठीचा संघर्ष कथानकात आपल्याला पाहायला मिळतो.

सिनेमाची एक खासियत म्हणजे यात ‘ड्रामा’ आणि ‘ऍक्शन’ खच्चून भरलेलं आहे. राया पाटीलच्या एंट्रीपासून ते त्याचे फायटिंग सिक्वेन्स, जंगलातील चकमक सर्वकाही डॅशिंग आहे. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. त्यांचं टायमिंग देखील अचूक आहे. थिएटरमध्ये ती जेव्हा वाजू लागतात तेव्हा तर येणारी गंमत चित्रपट पाहिल्याशिवाय अनुभवता येणार नाही. त्या गाण्यांवर झालेले चित्रिकऱण सुंदर आहे.

संगीत आणि पार्श्वसंगीत यासाठी संगीतकार ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी बाजी मारली आहे. सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे; तो ‘डार्क’ मुळीच नाही. तसं सिनेमांचा विषय ‘डार्क.. सिरीयस’ असा आहे. पण, लेखकाने त्यातील ‘ह्युमर’ अफलातून राखलं आहे. अनेक प्रसंगांमधील प्रासंगिक विनोद आपल्याला हसवतात; टाळ्या शिट्या वाजवायला भाग पाडतात. त्यामुळे सिनेमागृहात हस्या पिकतो.

=====

हे देखील वाचा: Circuitt Movie Review: मला राग येतोय..! मानवी भावभावनेचा पडसाद

=====

सिनेमातील सर्वच कलाकारांची काम आखीव-रेखीव आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखा उठावदारपणे लक्षात राहते. सर्व कलाकारांचा आपापल्या परीनं सिनेमात उत्तम कामगिरी केली आहे. नागराज मंजुळे हा आपल्या ‘डॅशिंग’ आवेशामुळे विशेष लक्षात राहतो. वेळेप्रसंगी अजय देवगणच्या ‘सिंघम’ची आठवण देखील आपल्याला त्याच्याकडे पाहून येते. आता रोहित शेट्टी आणि नागराज ने हातमिळवणी करुन एखादा सिनेमा काढायला हरकत नाही. गंमतीचा भाग सोडलास.. सयाजी शिंदे यांनी अत्यंत सहजतेने त्यांची पल्लम ही व्यक्तिरेखा निभावली आहे. शिंदे यांचं हे पल्लम हे पात्र फार मजेशीर, धमाल आणि क्रूर असं; विविध शेड्सच आहे. जे कथानकाला पूरक आहे. यासगळ्यात आकाश ठोसरही त्याच्या खास अभिनिवेशामुळे भाव खाऊन जातो. एकंदरच हा चकचकीत मामला पडद्यावर अनुभवण्या सारखा आहे. जमल्यास त्यातून सत्य-वास्तव परिस्थिती देखील तुम्हाला जाणून आणि समजून घेता येईल. आणि काहीच समजलं नाही तर… तुमच्या हातून टाळ्या-शिट्या वाजतील; इतका नक्कीच ‘घर बंदूक बिरयानी’ आपलं मनोरंजन करतो.

सिनेमा : घर बंदूक बिरयानी
निर्माते : झी स्टुडिओज, आटपाट प्रॉडक्शन्स
दिग्दर्शक : हेमंत अवताडे
कथा : नागराज मंजुळे, हेमंत अवताडे
कलाकार : सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी, श्वेतांबरी घुटे आदी.
संकलन : कुतुब इनामदार
संगीत : ए. व्ही. प्रफुल्लचंद्र
दर्जा : तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy