Home » थरारक अशा ‘शहर लखोट’ सिरीजचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित, अभिनेता प्रियांशु पेन्युली दिसणार मुख्य भूमिकेत

थरारक अशा ‘शहर लखोट’ सिरीजचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित, अभिनेता प्रियांशु पेन्युली दिसणार मुख्य भूमिकेत

मिर्जापूर आणि पाताललोकनंतर अमेझॉन प्राईमवर नवीन क्राइमवर आधारित सिरीज येत आहे. ‘शहर लखोट’ असे या आगामी सिरीजचे नाव आहे. नुकताच या सिरीजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा नॉयर क्राइम ड्रामा असून, यात अभिनेता प्रियांशु पेन्युली मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रियांशुसोबत या सिरीजमध्ये चंदन रॉय सान्याल आणि कुब्रा सैत मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

‘शहर लखोट’ ही सिरीज एका काल्पनिक शहराची गोष्ट आहे. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी आहे. याच कारणासाठी देव तोमर त्याच्या या मूळगावी परत येऊ इच्छित नाही. मात्र एका कारणामुळे त्याला त्याच्या या गावी नाइलाजामुळे यावे लागते. तिथे गेल्यावर तो एका अशा संकटात अडकतो ज्यातून बाहेर पडणे वाटते तितके सोपे नसते. या ट्रेलरमध्ये अनेक अनेक धक्कादायक आणि मोठे खुलासे होतात आणि देव समोर अनेक वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण होतात. अतिशय उत्कंठावर्धक असा हा ट्रेलर दिसून येत असून या सिरिजबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढली आहे.

पेन्युलीला या सिरीजच्या आधी आपण प्राइमच्याच ‘पिप्पा’मध्ये देखील पाहिले आहे. या सिनेमात त्याने अभिनेता ईशान खट्टरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. पिप्पा हि ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांची बायोपिक होती. ओटीटीच्या जगात प्रियांशूने त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या भागात तो एका महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्याने विशाल भारद्वाजच्या हेरगिरीवर आधारित सिरीज असलेल्या ‘चार्ली चोपड़ा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’ मध्ये पत्रकाराची भूमिका साकारली होती.

‘शहर लखोट’ या सिरीजचे दिग्दर्शन नवदीप सिंग यांनी केले असून, त्यांना ‘मनोरमा सिक्स फीट अंडर’ आणि ‘एनएच १०’ साठी ओळखले जाते. या सिरीजमध्ये प्रियांशु पेन्युली, चंदन रॉय सान्याल, कुब्रा सैत यांच्यासोबतच मनु ऋषि चड्ढा, श्रुति मेनन, कश्यप शंगारी, मंजिरी पुपाला, श्रुति जॉली, ज्ञान प्रकाश आणि अभिलाष थपलियाल हे कलाकार देखील महतवाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या ३० नोव्हेंबरला ही सिरीज प्राइमवर स्ट्रीम होणार आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy