Home » Jawan Movie Review: मसालेदार सामाजिक प्रबोधन!

Jawan Movie Review: मसालेदार सामाजिक प्रबोधन!

Jawan Movie Review in Marathi

सध्या बॉलिवूडमध्ये हिंदी चित्रपटांचे स्टार आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक यांनी मिळून चित्रपट बनवावा अशी समीकरण हिट ठरत आहेत. कारण, व्यावसायिक चित्रपट बनवण्यात दक्षिणेतील चित्रपट निर्माते पुढे असतात. जुनी कथाही ते अशा पद्धतीने मांडतात की प्रेक्षक खुश होऊन जातात. शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटने दक्षिणेतील चित्रपट दिग्दर्शक एटलीशी हातमिळवणी केली आणि त्याचा परिणाम ‘जवान’च्या रूपात समोर आला. नायिका नयनतारा, खलनायक विजय सेतुपती यांच्यासह बहुतेक क्रू मेंबर्स हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील आहेत ज्यांनी या सिनेमात बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबत काम केले आहे. कदाचित असं दृश्य पहिल्यांदाच सिनेमागृहात पाहायला मिळत असेल.

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘जवान‘ हा चित्रपट गुरुवार, ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. पहिला शो सकाळी ६ वाजता होता आणि तोही एकदम हाऊसफुल्ल होता. या चित्रपटाबद्दल शाहरुखच्या चाहत्यांचे वेड शिगेला पोहोचले आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला शाहरुखची एंट्री होताच प्रेक्षक वेडे झाले आणि ओरडायला लागले, शिट्ट्या आणि टाळ्यांचा वर्षाव झाला. चित्रपट संपल्यानंतर लोक नाच-गाणी करून सेलिब्रेशन करत होते. काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात चित्रपटाचे प्रदर्शन साजरे केले जात आहे, तर काही ठिकाणी कटआउट्सवर दुधाने आंघोळ घालण्यात येत आहे. या निमित्तानं शाहरुखनं स्वतःच ‘स्टारडम’ पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. पण, मनात एक विचार आला; जर ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाला नसता किंवा तो बनलाच नसता तर.. ‘जवान’चा प्रेक्षकांवरील प्रभाव अधिक तीव्र आणि वाढीव असता. (Jawan Movie Review)

तर आता ‘जवान’च्या कथेबद्दल बोलायचे झाले तर ‘जवान’च्या कथानकात अनेक पदर आहेत. चित्रपटाची सुरुवात मुंबई मेट्रोच्या अपहरणाने होते, जिथे आझाद (शाहरुख खान) वेश धारण करतो आणि त्याची गर्ल गँग लक्ष्मी (प्रियामणी), इरम (सान्या मल्होत्रा), हेलन (संजिता भट्टाचार्य), आलिया कुरेशी, गिरीजा ओक यांच्यासोबत तो या कुकर्माला अंजाम देतो. या गर्ल गँगमधील सर्व मुलींचा भूतकाळ वेदनादायक आहे, त्यामुळे ते आझादला पाठिंबा देण्यास सहमत आहेत. सुरुवातीला खलनायक भासणारा आझाद खरं तर रॉबिन हूड आहे, जो काली गायकवाड (विजय सेतुपती) या व्हाईट कॉलर व्यावसायिकाकडून मोठी खंडणी घेतो आणि ती कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतो. सरकारी व्यवस्थेतील असहाय आणि पीडित जनतेचा मसिहा आझाद इथेच थांबत नाही. तो त्याच्या धाडसी मुलींच्या टोळीसह आरोग्यमंत्र्याचे अपहरण करतो आणि सरकारी रुग्णालयांतील भ्रष्टाचार आणि दुर्दशा उघड करतो आणि अवघ्या पाच तासांत त्या दुरुस्त करतो. आझादची ओळख शोधून त्याला अटक करण्यासाठी पोलीस प्रमुख नर्मदा (नयनतारा) यांची नियुक्ती केली जाते. नर्मदा आझादला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण, आझादचीही स्वतःची एक भावनिक पार्श्वकथा आहे. सैन्यातील विशेष कार्याची जबाबदारी असलेल्या शूर देशभक्त विक्रम राठोड यांचा तो मुलगा आहे. पण, ही कथा जाणून देण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल. (Jawan Movie Review In Marathi)

दिग्दर्शनाविषयी बोलायचे झाले तर एटलीचा चित्रपट प्रत्येक प्रकारे मसालेदार असतो; ‘जवान’ही त्याला अपवाद नाही. पण दिग्दर्शकाने तीस वर्षांची झेप घेऊन आजच्या काळातील समस्यांशी ते जोडले आहे. शेतकऱ्यांची दुर्दशा असो आणि आत्महत्या असो की सरकारी रुग्णालयांची दुर्दशा असो, या व्यवस्थेच्या दुष्टचक्रात सर्वसामान्य माणूस कसा अडकतो, हे एटलीने कृती-भावनेने मांडले आहे. या चित्रपटात दोन कथा समांतर चालत आहेत, शाहरुख-नयनतारा आणि भूतकाळात एसआरके-दीपिका. मात्र, चित्रपटात अनेक टर्न आणि ट्विस्ट आहेत. इंटरव्हलचा मुद्दाही रंजक आहे, पण अनेक ठिकाणी दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. काही ठिकाणी चित्रपट मेलोड्रामॅटिक आहे. शेतकरी असहायपणे गळफास घेत असल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे.

एटली आणि रमणगिरीनिवासन यांनी लिहिलेली पटकथा आकर्षक आणि मनोरंजक आहे. होय, चित्रपटाचा रनटाइम मोठा आहे ( २तास ४५ मिनिटे). बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’, ‘मच्छर मारने की पांच घंटे चलने वाले कॉइल के बारे में आप इतनी पूछताछ करते हैं, मगर पांच साल तक चलने वाली सरकार से कुछ नहीं पूछते’, असे सुमीत अरोरा याने लिहिले संवाद प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतात. प्रीक्लाइमॅक्स प्रेक्षकांच सामाजिक प्रबोधन करतो. सिनेमात शेवटी सिक्वेल येण्याचा इशाराही आहे. संगीताबद्दल बोलायचे झाले तर ‘जिंदा बंदा’, ‘चलेया’ सारखी गाणी याआधीच ब्लॉकबस्टर झाली आहेत. पांढरे केस, दाढी अशा लूकमध्ये शाहरुख जेव्हा झळकतो तेव्हा हँडसम म्हातारा वाटतो. शाहरुख फक्त रोमान्सचा बादशाह नाही तर बॉलिवूडचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गाणी कंटाळवाणी असली तरी सिनेमा चांगला आहे. शेवटपर्यंत सिनेमा प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करतो.

दाक्षिणात्य चित्रपट निर्माते मसाला चित्रपट बनवण्यात का पुढे आहेत हे एटली यांच्या कामातून दिसून येते. त्यांनी वेळोवेळी इमोशन निर्माण केल्या आहेत, गाणी योग्य ठिकाणी ठेवली आहेत. चित्रपट अ‍ॅक्शनने भरलेला आहे पण एटली ‘मास मोमेंट्स’ तयार करण्यातही यशस्वी ठरला आहे. मध्यंतरानंतर चित्रपट काही वेळासाठी रुळावरुन उतरत असल्याचे वाटत असताना लगेच गाडी पुन्हा रुळावर यायला फारसा वेळ लागत नाही.

पिता-पुत्राच्या दुहेरी भूमिकेतील शाहरुखने संपूर्ण चित्रपटावर वर्चस्व गाजवले आहे. शाहरुख हा केवळ एक सक्षम अभिनेता नाही, तर यावेळी त्याच्या लूकमध्ये, वेशभूषेत आणि देहबोलीतही अनेक शैली आहेत, ज्या तो उत्कृष्टपणे पार पाडतो आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. अॅक्शन सीन्समध्ये त्याची लवचिकता पाहण्यासारखी आहे. हायजॅकसह त्याचा बॉल्ड लूक याआधीच चर्चेचा विषय बनली आहे. ‘जवान’ हा किंग खानचा आतापर्यंतचा सर्वोत्तम अवतार म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण, केवळ अवतार. ‘अभिनेता’ म्हणून त्याच्या अंगी आणखी बरंच काही आहे. नयनतारा स्वतःला अॅक्शन हिरोईन म्हणून उत्तम सादर केलं आहे. मात्र, शाहरुखसोबतच्या केमिस्ट्रीच्या बाबतीत दीपिका पदुकोण जिंकली आहे. खलनायक कालीच्या रूपात विजय सेतुपती जितका निर्दयी आणि भयंकर आहे तितकाच तो विनोदीही आहे. सिनेमातील एजाज खान, सुनील ग्रोव्हर आदी सर्वांची कामं छान झाली आहेत.

सिनेमा : जवान
निर्मिती : गौरी खान
लेखक, दिग्दर्शक : एटली कुमार
कलाकार : शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपति, दीपिका पादुकोण, रिद्धि डोगरा, गिरीजा ओक
संगीतकार : अनिरुद्ध रविचंदर
छायाकार : जी.के. विष्णु
दर्जा : तीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy