Home » धम्माल मनोरंजनाची झणझणीत मेजवानी !!’लंडन मिसळ’ चित्रपटाचा झक्कास टिजर प्रदर्शित !

धम्माल मनोरंजनाची झणझणीत मेजवानी !!’लंडन मिसळ’ चित्रपटाचा झक्कास टिजर प्रदर्शित !

‘लंडन मिसळ’ आता हे नाव ऐकून तुम्ही म्हणाल मिसळ कोणती चांगली? नाशिकची…?, कोल्हापूरची…? की पुण्याची…? हा वाद चालूच आहे. यावर ठोस असे उत्तर अजून मिळालेले नाही आणि त्यात अजून एका मिसळची भर. हो मग… जुना वाद मिटला नाही आणि त्यात आता अजून एका शहराची भर या मिसळ वादात पडली, आणि ते ही थेट परदेशातील लंडन.

अहो थांबा थांबा… खूप विचार करू नका. लंडन मिसळ हे कोणत्या मिसळीचे नाही तर एका नवीन सिनेमाचे नाव आहे. जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून भरत जाधव एका अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांनी भरत जाधव चित्रपटात दिसणार आहे.

नुकताच ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचा धमाकेदार टिजर नुकताच लाँच करण्यात आला आहे. जगन्नाथरावांच्या भूमिकेत भरत जाधव, अदितीच्या भूमिकेत ऋतुजा बागवे,रावीच्या भूमिकेत रितिका श्रोत्री तसंच गौरव मोरे आणि माधुरी पवारच्या मजेदार सीनची झलक दाखवणारा लंडन मिसळ चित्रपटाचा टिजर प्रेक्षकांमध्ये रिलीजची उत्सुकता निर्माण करतोय.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन बहिणींचं आयुष्य जग्गनाथरावांच्या एका नियमामुळे बदलून जातं.. आणि मग सुरु होतो मजेदार प्रसंगांचा धमाल खेळ…’लंडन मिसळ’ या चित्रपटातून मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि रितिका श्रोत्री दोघीही टिजरमध्ये हटके अंदाजात दिसत आहेत. तर हरहुन्नरी नट भरत जाधव यांच्या विनोदी अभिनयाची फोडणी चित्रपटाला अधिक मनोरंजक बनवणार हे टिजर पाहूनच कळतंय. गौरव मोरे नेहमीप्रमाणे त्याच्या छोट्याशा झलक मधून भाव खाऊन गेलाय तर माधुरी पवारचा टिजरमध्ये दिसलेला एकच संवाद लक्ष वेधून घेतोय.

आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे. श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य. अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला ‘लंडन मिसळ’ चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. आता ८ डिसेंबरला विनोदाचा धमाका अनुभवण्यास सज्ज रहा.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy