Home » … आणि भार्गव जगतापची ‘नाळ भाग २’शी नाळ जोडली गेली

… आणि भार्गव जगतापची ‘नाळ भाग २’शी नाळ जोडली गेली

दिवाळीच्या मुहूर्तावर मराठीमध्ये अतिशय चर्चित असा ‘नाळ २’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि चांगलाच गाजला. नाळ भाग १ नंतर भाग २ ची सर्वाना कमालीची उत्सुकता होती. पहिल्या भागातील कथेने, कलाकारांनी आणि गाण्याने सर्वच प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली होती. त्यामुळे दुसऱ्या भागाकडून सर्वांना खूपच अपेक्षा आहेत. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर सिनेमाने सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण केल्याचे प्रेक्षकांचे मत आहे.

सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या भागात अनेक नवनवीन चेहरे देखील पाहायला मिळत आहे. प्रत्येक कलाकाराची निवड अचूक असल्याचे सगळ्याचे म्हणणे आहे. याच सिनेमातील एक महत्वाची भूमिका म्हणजे ‘मणी’. चैतू, चिमी आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या ‘मणी’च्या अभिनयालाही विशेष दाद मिळत आहे. ‘मणी’ म्हणजेच भार्गव जगताप. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी लाभलेल्या भार्गवची ‘नाळ भाग २’ साठी अगदी योगायोगाने निवड झाली.

भार्गवचे वडील रत्नकांत जगताप याच क्षेत्रात कार्यरत असून ते भार्गवसाठी कधीही शब्द टाकू शकत होते, परंतु त्यांनी आधी शिक्षणाला प्राधान्य दिले. एकदा एका चित्रपटाच्या प्रिमिअरला रत्नकांत जगताप भार्गवला घेऊन गेले होते. त्यावेळी ‘नाळ भाग २’च्या कास्टिंग डिरेक्टरच्या नजरेत भार्गव आला. त्याची निरागसता, ग्रामीण व्यक्तिमत्व त्यांना भावले आणि ‘मणी’ची भूमिका साकारण्याबाबत विचारणा केली. इतक्या मोठ्या प्रोजेक्टसाठी विचारणा झालीये म्हटल्यावर रत्नकांत जगताप यांनी होकार दिला.

या भूमिकेसाठी भार्गवचे ऑडिशन झाले. १४ दिवसांचे वर्कशॉपही झाले आणि ‘नाळ भाग २’ च्या या तीन महत्वाच्या पात्रांमध्ये त्याची निवड झाली. ध्यानीमनी नसताना अशी संधी यावी, ही भार्गव आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. शहरी वातावरणात वावरलेल्या भार्गवने अवघ्या १४ दिवसांमध्ये ग्रामीण जीवन, तिथले भावविश्व, तिथले बालपण हे सगळे आत्मसात केले आणि अनुभवलेही. नागराज मंजुळे हे नेहमीच आपल्या चित्रपटांमध्ये नवोदितांना संधी देतात आणि त्यांची ही निवड नेहमीच योग्य ठरते. भार्गवच्या बाबतीतही तेच घडले. ‘नाळ भाग २’च्या निमित्ताने भार्गवची नाळ चित्रपटसृष्टीशी जोडली गेली.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग २’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy