Home » ठरलं तर! २४ नोव्हेंबरला होणार तुमचे आमचे रियुनियन, ‘झिम्मा २’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

ठरलं तर! २४ नोव्हेंबरला होणार तुमचे आमचे रियुनियन, ‘झिम्मा २’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

२०२१ साली हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा सिनेमा आला आणि बॉक्स ऑफिसवर एकच कळलं झाला. या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. सिनेमा कमालीचा यशस्वी झाला. त्यानंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली, आणि सगळ्याच मराठी लोकांनी एकच जल्लोष केला. सिनेमाची घोषणाच एका हटके पद्धतीने झाली. निर्मिती सावंत यांच्या ‘त्या’ एका व्हिडिओने सिनेमाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता गगनाला भिडली.

सध्या सगळीकडे दिवाळीची फिव्हर आहे. या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतून एक सुखद बातमी आली आहे. बहुप्रतीक्षित अशा झिम्मा २ चा अतिशय भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या सिनेमाच्या ट्रेलर लाँचचा एक भव्य सोहळा संपन्न झाला. दिवाळी असल्याने कार्यक्रमाची सजावट देखील या सणाला अनुरूप अशीच करण्यात आली होती. यावेळी कलाकारांसह सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती.

यापूर्वी ‘झिम्मा’मधून या मैत्रिणी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता ‘झिम्मा २’मधून या मैत्रिणींना पुन्हा भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यात या ताफ्यात आता आणखी दोन मैत्रिणी सामील झाल्या आहेत. त्यामुळे आता धमालही दुपटीने वाढली आहे. इंदू (सुहास जोशी) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजिलेल्या या सहलीत काही सरप्राइसेज आहेत, भरपूर धमाल आहे. मागच्या वेळेप्रमाणे ही ट्रीपही अविस्मरणीय होणार असून ‘झिम्मा’च्या निमित्ताने बहरलेल्या या मैत्रीची वीण ‘झिम्मा २’मध्ये अधिकच घट्ट होणार आहे. त्यामुळे यंदाचे रियुनिअन एकदम बेस्ट असणार, हे नक्की !

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” खरंतर ‘झिम्मा’मध्ये दिसलेल्या या मैत्रिणी फक्त पडद्यावरच नाही तर पडद्यामागेही तशाच एकमेकींना जीव लावणाऱ्या आहेत. त्यामुळे ‘झिम्मा २’मध्ये त्यांची ही मैत्री अधिकच घनिष्ट दिसणार आहे. सात मैत्रिणी, सात तऱ्हा. प्रत्येकीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी आहे. देहबोली वेगळी आहे. परंतु समान गोष्ट एकच आहे ती म्हणजे त्यांचे एकमेकांविषयी असलेले प्रेम. ‘झिम्मा’ पाहून सहलीला गेलेल्या मैत्रिणी ‘झिम्मा २’ पाहून दुसऱ्यांदा सहलीचे आयोजन करतील, हे नक्की! ‘झिम्मा२’ हा प्रत्येक प्रेक्षकवर्गासाठी आहे. बऱ्याचदा दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वत्व गमावतो आणि त्याचाच शोध तुम्हाला ‘झिम्मा २’मध्ये गवसणार आहे.“

या सिनेमाचे खास आकर्षण म्हणजे सिनेमात झालेल्या दोन नवीन चेहऱ्याच्या एन्ट्री. रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोन अभिनेत्री यावेळी सिनेमात दिसणार आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिका कशा असणार आणि त्या सिनेमात कशी गंमत आणणार हे बघायला मजा येणार आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चिलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित ‘झिम्मा २’ येत्या २४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy