Home » मामि फेस्टिवल मध्ये जिओ स्टुडिओजच्या एक नाही दोन नाही तर चक्क तीन मराठी चित्रपटांचा बोलबाला!

मामि फेस्टिवल मध्ये जिओ स्टुडिओजच्या एक नाही दोन नाही तर चक्क तीन मराठी चित्रपटांचा बोलबाला!

दरवर्षी जगभरात चित्रपटांचे विविध देशांमध्ये लहान मोठे अनेक फिल्म फेस्टिवल संपन्न होत असतात. अशा फेस्टिवलमध्ये चित्रपटांचा सन्मान होणे हे त्या विशिष्ट चित्रपटांसाठी खूपच अभिमानाची बाब असते. असाच एक महत्वाचा आणि लोकप्रिय फिल्म फेस्टिवल म्हणजे मामि फेस्टिवल. मुंबई अॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज अर्थात मामि ( MAMI ) हा भारतातील एक महत्वाचा फिल्म फेस्टिवल आहे. यावर्षी नुकतीच या मामि फिल्म फेस्टिवलला सुरुवात झाली.

मामि हा एक सार्वजनिक ट्रस्ट आहे जो मुंबईतील वार्षिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करतो, ज्याला Jio MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हल म्हणून ओळखले जाते. भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मामि मुंबई फेस्टिवलच्या सोहळ्याला दणक्यात सुरुवात झाली. मुंबईतील प्रमुख चित्रपटगृहांमधे शुक्रवार २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवात सहभागी झालेले चित्रपट दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मामि चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या चित्रपटांमध्ये जिओ स्टुडिओजचे चक्क ३ मराठी चित्रपट सामील आहेत.

यामध्ये पहिला चित्रपट म्हणजे, समीक्षकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेला आदित्य सरपोतदार दिग्दर्शित “उनाड” या चित्रपटाचा समावेश झाला आहे. यात तीन मित्रांची म्हणजेच शुभम (आशुतोष गायकवाड), बंड्या (अभिषेक भरते) आणि जमील (चिन्मय जाधव) आणि स्वराली (हेमल इंगळे) यांच्या मैत्रीची गोष्ट आहे .

दुसऱ्या चित्रपटाबद्दल सांगायचे म्हणजे, यावर्षीचे बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॅार्ड मोडणारा, आजपर्यंतचा दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट माधुरी भोसले निर्मीत आणि केदार शिंदे दिग्दर्शित “बाईपण भारी देवा” आहे. मामीच्या निमित्ताने रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा अभिनेत्रींची धमाल पुन्हा एकदा मोठया पडद्यावर बघायला मिळणार आहे.

तिसरा चित्रपट म्हणजे वरुण नार्वेकर दिग्दर्शित “एक दोन तीन चार” हा नवाकोरा चित्रपट आहे. या चित्रपटातून निपुण धर्माधिकारी यांचे अभिनयात पदार्पण होत आहे. या सिनेमात निपुण प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्यांच्या सोबत वैदेही परशुराम ही मुख्य भूमिकेत दिसेल. या सिनेमात वैद्यकीय जगातला एक चमत्कार अतिशय सुंदर पद्धतीने मांडत, विनोदाची अचूक पेरणी करण्यात आली आहे. आजच्या तरुण पिढीसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी जिओ स्टुडिओजतर्फे हा सिनेमा म्हणजे मनोरंजनाची ट्रीट असणार आहे.

दरम्यान येत्या २९ ऑक्टोबर रोजी उनाड, आणि एक दोन तीन चार यांचे screening असून ३ नोव्हेंबरला बाईपण भारी देवाचा विशेष शो असणार आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy