Home » लोकशाहिर विठ्ठल उमप यांच्या आठवणीत रंगला ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ सोहळा, दिलीप प्रभावळकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

लोकशाहिर विठ्ठल उमप यांच्या आठवणीत रंगला ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ सोहळा, दिलीप प्रभावळकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

शाहीर आणि लोककलाकार विठ्ठल उमप हे असामान्य व्यक्तिमत्व होते. त्यांनी त्यांच्या लोकगीतांमार्फत आणि पथनाट्यांमार्फत समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणण्याचे काम केले. विठ्ठल उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली आणि गायली देखील. त्यांचे कार्य अतिशय उत्तम आणि वाखाणण्याजोगे होते. विठ्ठल उमप यांचे कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांच्या मुलांनी त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरु केला आहे.

जीवनभर लोककलांचा जागर करीत आपल्या कार्यक्रमांद्वारे रसिकांना जणू आनंदाची अद्वितीय पर्वणी देणारे तसेच लोककलेला जीवन अर्पण केलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध मान्यवरांना मृद‌्‌गंध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. नुकताच हा पुरस्कार सोहळा ठाणे येथे संपन्न झाला. ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात रंगलेल्या स्मृतीसंगीत समारोहात मृद‌्‌गंध पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ज्येष्ठ आणि प्रतिभावान अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, गायक नंदेश उमप, माजी महापौर नरेश म्हस्के, गीतकार संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, सरिता उमप यांच्यासह मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी स्मृतिसंगीत समारोह आणि मृद‌्‌गंध पुरस्काराचे भव्य आयोजन करण्यात येते. फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप हे असून, या पुरस्कारांचे यंदाचे हे १३ वर्ष आहे.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिलीप प्रभावळकर म्हणाले की, “मी अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नाही. मी चुकून या क्षेत्रात आलो आहे. ज्यांच्या कार्याला मी मानतो त्या लोकशाहीर विठ्ठल उमप या लोककलावंतांच्या नावाचा पुरस्कार आजच्या दिवशी मिळाला हे माझे भाग्य मानतो. नट म्हणून काही भूमिका आपण विसरतो पण काही भूमिकांचा माणूस म्हणून माझ्यावर परिणाम झाला आहे. त्या भूमिकांमुळे माझा काही सामाजिक संस्थांशी संपर्क आला, मी त्यांच्याशी जोडलो गेलो. नट म्हणून ही माझी मिळकत आहे. नट म्हणून तुमच्यात माणूसकीचा ओलावा जागृत राहीला पाहिजे अन्यथा तुम्ही फक्त कोरडे नट राहता असेही प्रभावळकर म्हणाले.”

इतर मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी गायक सुदेश भोसले, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनुराधा भोसले, लोककलेतील कलावंत आतांबर शिरढोणकर, अभिनय क्षेत्रात उत्तम ठसा उमटवणारे अभिनेता सुमित राघवन, अभिनेत्री चिन्मयी सुमित, नवोन्मेष म्हणून गायिका केतकी माटेगावकर यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ‘आयुष्यावर बोलू काही’ या संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांच्या सदाबहार कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy