मराठी चित्रपटसृष्टीतील दोन दमदार अभिनेते उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र आले आहेत. ‘बंधू’ या आगामी मराठी चित्रपटात ते दोन भावांची भूमिका साकारताना दिसणार असून, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. भावाभावांमधील प्रेम, मतभेद, दुरावा आणि एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी अशा भावनांची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘बंधू’ येत्या २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
दोन भावांच्या नात्याचा भावनिक प्रवास
‘भाऊ काय, बंधू काय… जणू दूध आणि साय!’ या गुरु ठाकूर यांच्या शब्दांतून भावाभावांमधील नात्याची खासियत व्यक्त होते. कधी छोट्या गोष्टींवरून होणारी भांडणं, कधी एकमेकांवरील नाराजी, तर कधी संकटाच्या वेळी खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं, अशा या नात्याच्या वेगवेगळ्या छटा चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत.
ट्रेलरमध्ये उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या व्यक्तिरेखांमधील भावनिक संघर्ष पाहायला मिळतो. दोघांच्याही अभिनयाची ताकद या झलकमधून जाणवते. केवळ दोन भावांची गोष्ट न सांगता, नात्यांमधील प्रेम आणि त्यागाचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
मृण्मयी देशपांडे आणि मिताली जगताप-वराडकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका
‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ या चित्रपटांनंतर दिग्दर्शक नितीन सिंधूविजय सुपेकर पुन्हा एकदा मानवी नात्यांवर आधारित कथा घेऊन येत आहेत. या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या पत्नींच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे आणि मिताली जगताप-वराडकर दिसणार आहेत.

या कलाकारांसोबत रेणुका दफ्तरदार, स्मिता तांबे, श्रीकांत यादव, विठ्ठल काळे, यशपाल सरणात, ज्ञानरत्न अहिवळे, चैतन्य सोलणकर, श्रीपाद पानसे, शौर्य पाटील, देवा गाडेकर, वर्षा अजित, प्रशांत जाधव, अनिल कांबळे आणि प्रणाली भालेराव यांच्याही भूमिका आहेत.
रजत बेदी यांची प्रस्तुती; रामदास आठवले यांची उपस्थिती
रजत बेदी प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे. जेएसडी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने हा चित्रपट साकारण्यात आला आहे. लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी सांभाळली आहे.
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार रामदास आठवले उपस्थित होते. त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
गाण्यांनाही लोकप्रिय गायकांचा आवाज
चित्रपटातील गाण्यांना गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी शब्द दिले असून विजय नारायण गवंडे यांनी संगीतबद्ध केली आहेत. अजय गोगावले, अतुल गोगावले, अमिता घुगरी आणि शमिका भिडे यांनी गाण्यांना आवाज दिला आहे. चित्रपटाचे संगीत हक्क झी म्युझिककडे आहेत.
छायांकन हर्षद आत्माराम गायकवाड यांचे असून अतिरिक्त छायांकन योगेश कोळी यांनी केले आहे. वैभव दाभाडे आणि वासिम मुल्ला यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.
दोन भावांमधील नात्याची ही गोष्ट मोठ्या पडद्यावर कशी उलगडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ‘बंधू’ हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.