Home » दिया मिर्झाचा दिवाळीविषयक व्हिडिओ BMC कडून डिलीट; भाजप नेते अमीत साटम यांच्या आक्षेपानंतर निर्णय

दिया मिर्झाचा दिवाळीविषयक व्हिडिओ BMC कडून डिलीट; भाजप नेते अमीत साटम यांच्या आक्षेपानंतर निर्णय

दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचं आवाहन करणाऱ्या दिया मिर्झाच्या व्हिडिओवरून वाद; मुंबई महापालिकेची भूमिका चर्चेत

BMC च्या प्रदूषणमुक्त दिवाळी मोहिमेतील अभिनेत्री दिया मिर्झा

मुंबईत दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेला आता राजकीय वळण मिळालं आहे. या मोहिमेअंतर्गत अभिनेत्री दिया मिर्झाने केलेला व्हिडिओ भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांनी आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने सोशल मीडियावरून हटवला आहे. विशेष म्हणजे, याच मोहिमेतील इतर सेलिब्रिटींचे व्हिडिओ मात्र अद्याप उपलब्ध आहेत.

मुंबईतील वाढतं वायू प्रदूषण लक्षात घेता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर BMC ने नागरिकांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. यासाठी महापालिकेने काही प्रसिद्ध कलाकार आणि खेळाडूंची मदत घेतली होती.

या मोहिमेत दिया मिर्झासोबतच माधुरी दीक्षित, मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचाही सहभाग होता. या सर्वांनी व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना फटाके टाळण्याचं आणि प्रदूषण कमी करण्याचं आवाहन केलं होतं.

भाजप नेते अमीत साटम यांचा आक्षेप काय?

दिया मिर्झाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून या मोहिमेतील तिच्या सहभागावर आक्षेप घेतला.

‘दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नाही. आपल्या परंपरा आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आहेत,’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकृत अकाउंटलाही टॅग केलं होतं.

साटम यांच्या पोस्टनंतर काही तासांतच महापालिकेने दिया मिर्झाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हटवला. मात्र, हा व्हिडिओ डिलीट करण्यामागचं अधिकृत कारण महापालिकेने अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

दिया मिर्झानेही मांडली आपली भूमिका

या संपूर्ण प्रकरणावर दिया मिर्झानेही प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ केवळ जनजागृतीच्या उद्देशाने तयार करण्यात आला होता. वायू प्रदूषण हा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय असून, प्रदूषण कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचं महत्त्व असल्याचं तिने स्पष्ट केलं.

======

हे देखील वाचा : निता अंबानींच्या वाढदिवशी कर्जतमध्ये १०० एकरांच्या ‘अनंत आश्रय’ प्रकल्पाची पायाभरणी

======

दरम्यान, दिया मिर्झाचा व्हिडिओ हटवण्यात आला असला तरी माधुरी दीक्षित, निशिगंधा वाड आणि अजिंक्य रहाणे यांचे या मोहिमेतील व्हिडिओ महापालिकेच्या सोशल मीडिया अकाउंटवर कायम आहेत.

त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश देणाऱ्या एका जनजागृती मोहिमेतील केवळ एका कलाकाराचा व्हिडिओ हटवण्याच्या निर्णयावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy