चित्रपटाची सुरुवात एका कथेपासून होते आणि ती कथा पडद्यावर आणण्यासाठी सक्षम पटकथेची गरज असते. नव्या लेखकांना आपली कथा चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळावी, या उद्देशाने प्रसार भारतीने ५७व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFI) ‘पेज से पिच तक’ हा पहिलाच पटकथा लेखन उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमातील विजेत्यांची नावं २४ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली. ‘मिर्ची केक’ या कथेसाठी अविनाश झा यांनी प्रथम क्रमांक पटकावत ५ लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं.
पणजीतील कला अकादमी येथे २१ ते २३ नोव्हेंबरदरम्यान हा उपक्रम पार पडला. प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. उदयोन्मुख लेखकांना स्वतःच्या कथा सादर करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
अवघ्या दहा दिवसांत मिळाल्या १,००० कथा
या उपक्रमाला लेखकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. घोषणा झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत सुमारे १,००० कथा प्राप्त झाल्या. चित्रपट, माहितीपट आणि लघुपट अशा तीन श्रेणींमध्ये दहा भारतीय भाषांतील मूळ कथा या उपक्रमासाठी सादर करण्यात आल्या. यामधून अंतिम फेरीसाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली. या लेखकांनी परीक्षक मंडळासमोर आपल्या मूळ पटकथा सादर केल्या.

अविनाश झा प्रथम, सत्य व्यास द्वितीय
‘मिर्ची केक’ या कथेसाठी अविनाश झा यांना प्रथम क्रमांक आणि ५ लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं. ‘संहार’ या कथेसाठी सत्य व्यास यांना ३ लाख रुपयांचं द्वितीय पारितोषिक, तर ‘शरद पूर्णिमा’ या कथेसाठी जितेश ठाकूर यांना २ लाख रुपयांचं तृतीय पारितोषिक देण्यात आलं.
याशिवाय चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक मिळवणाऱ्या लेखकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे विशेष पुरस्कार देण्यात आले. सातवा ते दहावा क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्रं, तर अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्वोत्तम ३० लेखकांना सहभाग प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली.
मनोज जोशींसह मान्यवरांचं परीक्षक मंडळ
या उपक्रमाच्या अंतिम फेरीसाठी परीक्षक मंडळात अभिनेते आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते मनोज जोशी, लेखक आणि संशोधक संदीप बालकृष्ण, ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालू’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक व संकलक नारायण सिंह, तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त पत्रकार आणि लेखक अनंत विजय यांचा समावेश होता.
पुरस्कार वितरण समारंभाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव प्रिथुल कुमार आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (NFDC) व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह उपस्थित होते.
यावेळी प्रिथुल कुमार यांनी नव्या लेखकांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली. चित्रपट निर्मितीमध्ये पटकथेचं महत्त्व सांगताना प्रभावी पटकथा आणि दमदार कथानक हे यशस्वी चित्रपटाचे महत्त्वाचे आधार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
नव्या लेखकांच्या कथा चित्रपटांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
‘पेज से पिच तक’ हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा प्रसार भारतीचा मानस आहे. नवोदित लेखक आणि चित्रपटसृष्टी यांच्यातील अंतर कमी करून त्यांच्या मूळ कल्पनांना चित्रपट, माहितीपट आणि लघुपटांच्या माध्यमातून पडद्यावर आणण्याची संधी उपलब्ध करून देणं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हे देखील वाचा : चिमणीच्या अंड्यांसाठी ३५ दिवस वीजेशिवाय राहिलं संपूर्ण गाव! ‘Koodu’चा IFFI मध्ये World Premiere
अवघ्या दहा दिवसांत सुमारे १,००० कथा मिळणं हे देशातील नव्या लेखकांमध्ये असलेली सर्जनशीलता आणि स्वतःच्या कथा मांडण्याची इच्छा दाखवणारं आहे. त्यामुळे IFFI मधील हा उपक्रम केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता नव्या पटकथाकारांसाठी चित्रपटसृष्टीत प्रवेशाची संधी निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचा ठरतो.