५७व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFI) यंदा मराठी चित्रपट ‘आदि अनंत’चाही समावेश आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक महेश लिमये यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या कथेमागील भावनिक प्रेरणा सांगतानाच स्वतःच्या आयुष्यातील एक अनुभवही शेअर केला. ‘आदि अनंत’ची कथा ऐकल्यानंतर आपण भावूक झालो होतो, कारण या चित्रपटाचा विषय आपल्या वडिलांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांची काळजी घेतानाच्या आठवणींशी जोडलेला होता, असं लिमये यांनी सांगितलं.
संकर्षण कऱ्हाडे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘आदि अनंत’मध्ये दोन पिढ्यांमधील नातं, प्रेम आणि सेवासुश्रुषेतील वास्तव मांडण्यात आलं आहे.
आजोबांची जबाबदारी आणि अभिनयाचं स्वप्न
आदित्य नावाचा तरुण अभिनेता स्वतःला अभिनय क्षेत्रात सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचे आजोबा अनंत राव यांच्यासोबत त्याचं नातं प्रेम, हलकेफुलके विनोद आणि एकमेकांना दिलेल्या साथीने फुलत जातं. मात्र, एका अपघातानंतर अनंत राव अंथरुणाला खिळतात आणि आदित्यवर त्यांच्या देखभालीची जबाबदारी येते. एकीकडे आजोबांची काळजी घेणं आणि दुसरीकडे अभिनय क्षेत्रातील स्वतःची स्वप्नं पूर्ण करणं, अशा दुहेरी जबाबदारीत तो अडकतो.
या परिस्थितीचा परिणाम दोघांच्या नात्यावरही होऊ लागतो. वाढता मानसिक ताण आणि निराशेमुळे त्यांच्या नात्यात गुंतागुंत निर्माण होते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची काळजी घेताना इतर सदस्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं, सेवासुश्रुषेची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आयुष्याचा समतोल कसा बिघडू शकतो, याचं वास्तव चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं आहे.

वडिलांच्या आठवणींमधून चित्रपटाला मिळाली प्रेरणा
चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रेरणा सांगताना महेश लिमये यांनी स्वतःच्या आयुष्यातील अनुभव मांडला. अभिनेता-लेखक संकर्षण कऱ्हाडे यांनी पहिल्यांदा चित्रपटाची कथा ऐकवली, तेव्हा ती ऐकून आपण भावूक झालो होतो, असं त्यांनी सांगितलं. कारण वडिलांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांची काळजी घेतानाच्या आठवणी या कथेमुळे पुन्हा जाग्या झाल्या होत्या.
चित्रपटाची कथा मराठी मातीत रुजलेली असली, तरी त्यातील भावनिक विषय भाषेच्या सीमा ओलांडणारा आहे. भारतातील तसेच परदेशातील अनेक कुटुंबांना या कथेशी जोडून घेता येईल, असंही लिमये यांनी नमूद केलं.
राहुल देशपांडे यांचं भजन, अशोक सराफ यांचा तबला
चित्रपटाच्या संगीताविषयी बोलताना लिमये यांनी एक खास गोष्ट सांगितली. प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी ‘आदि अनंत’मध्ये एक भक्तीपर भजन गायलं आहे. या भजनाच्या प्रसंगात अशोक सराफ पडद्यावर तबला वाजवताना दिसतात.
अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील परस्पर आदरामुळे पडद्यावर आजोबा आणि नातवाच्या नात्याला सहजता मिळाली, असंही लिमये यांनी सांगितलं.
दिग्दर्शक म्हणून महेश लिमये यांचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांच्या ‘यलो’ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, तर ‘जग्गू आणि ज्युलियेट’ या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत.
दोन पिढ्यांमधील प्रेम, काळजी आणि जबाबदारी यांचा वेध घेणारा ‘आदि अनंत’ हा चित्रपट IFFI मधील मराठी सिनेमाच्या उपस्थितीत महत्त्वाची भर घालतो.