Home » शाहरुख खानने वाढदिवसाची परंपरा जपली; ६१ व्या वाढदिवशी चाहत्यांसमोर दिली आयकॉनिक पोझ!

शाहरुख खानने वाढदिवसाची परंपरा जपली; ६१ व्या वाढदिवशी चाहत्यांसमोर दिली आयकॉनिक पोझ!

मन्नतच्या बाल्कनीत किंग खानची ग्रँड एन्ट्री! चाहत्यांचा जल्लोष, शाहरुखने दिली खास भेट

Shah Rukh Khan recreates his iconic arms wide open pose from Mannat balcony on his 61st birthday.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने २ नोव्हेंबर रोजी आपला ६१ वा वाढदिवस साजरा केला. दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी मन्नतच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना अभिवादन करण्याची शाहरुखची परंपरा आहे. यंदा मन्नतच्या रिनोव्हेशनचे काम सुरू असल्याने तो चाहत्यांना भेटणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपवत शाहरुख मन्नतच्या बाल्कनीत आला आणि आपल्या खास अंदाजात त्याने चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मन्नतच्या बाल्कनीत शाहरुखची खास एन्ट्री

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील वांद्रे येथील मन्नतबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या सुपरस्टारची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते तासन्तास वाट पाहत होते. यंदा मन्नतच्या रिनोव्हेशनचे काम सुरू असल्याने चाहत्यांमध्ये त्याच्या वाढदिवसाच्या भेटीबाबत विशेष उत्सुकता होती.

मध्यरात्रीच्या नेहमीच्या अभिवादनासाठी शाहरुख बाल्कनीत आला नव्हता. मात्र, त्यानंतर त्याने मन्नतच्या बाल्कनीत येत चाहत्यांना सुखद धक्का दिला. पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, ब्लू डेनिम, काळी बीनी कॅप आणि गॉगल अशा कॅज्युअल लूकमध्ये शाहरुख चाहत्यांसमोर आला.

यावेळी त्याने चाहत्यांकडे हात हलवून अभिवादन केले. एवढेच नाही तर दोन्ही हात पसरून आपली प्रसिद्ध सिग्नेचर पोझही दिली. शाहरुखला समोर पाहताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्याने चाहत्यांना फ्लाइंग किस देत आणि हात जोडून त्यांचे आभारही मानले.

विशेष म्हणजे, मन्नतच्या रिनोव्हेशनचे काम सुरू असतानाही शाहरुखने चाहत्यांशी असलेले हे खास नाते जपले. त्याच्या या भेटीचा व्हिडिओ प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘किंग’च्या पहिल्या गाण्याची वाढदिवसाला भेट

शाहरुखच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटातील पहिले गाणेही प्रदर्शित करण्यात आले. ‘तू मिल जाए’ असे या गाण्याचे नाव असून त्यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची जोडी पाहायला मिळत आहे.

या रोमँटिक गाण्याला अरिजित सिंगचा आवाज लाभला आहे. एड शीरनचाही या गाण्यात सहभाग आहे. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याची चर्चा सुरू झाली. शाहरुखच्या वाढदिवशी निर्मात्यांनी दिलेली ही खास भेट ठरली.

कधी प्रदर्शित होणार ‘किंग’?

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा ‘किंग’ हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून शाहरुखची मुलगी सुहाना खान मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

======

हे देखील वाचा : ‘किंग’मधील ‘तू मिल जाए’ गाणं रिलीज; शाहरुख-दीपिकाची केमिस्ट्री आणि अरिजित-एड शीरनच्या खास Collaborationची चर्चा

======

चित्रपटात शाहरुख आणि सुहानासोबत दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, जयदीप अहलावत, राघव जुयाल, सौरभ शुक्ला आणि अभय वर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

एकीकडे ‘किंग’च्या पहिल्या गाण्याची चर्चा आणि दुसरीकडे मन्नतच्या बाल्कनीतून शाहरुखची चाहत्यांना भेट, अशा दोन खास गोष्टींमुळे यंदाचा त्याचा वाढदिवस चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरला.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy