Home » ‘यावेळी तिसराच आहे!’… ‘झिम्मा ३’च्या पहिल्या पोस्टरने वाढवला सस्पेन्स

‘यावेळी तिसराच आहे!’… ‘झिम्मा ३’च्या पहिल्या पोस्टरने वाढवला सस्पेन्स

नवं पोस्टर, नवा सस्पेन्स; 'झिम्मा ३'च्या शूटिंगला अधिकृत सुरुवात

'झिम्मा ३'च्या नव्या पोस्टरमधून चित्रीकरणाच्या सुरुवातीची घोषणा

‘झिम्मा ३’च्या चित्रीकरणाला अधिकृत सुरुवात झाली असून त्याची घोषणा एका हटके पोस्टरद्वारे करण्यात आली आहे. ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर तिसऱ्या भागाची उत्सुकता आधीपासूनच होती. आता नव्या पोस्टरमुळे त्या चर्चेला आणखी उधाण आले आहे.(Jhimma 3)

समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे दिसत नाहीत. मात्र, एका वर्तुळात उभ्या असलेल्या व्यक्तींच्या हातात वेगवेगळ्या प्रकारची पेये दिसतात. कोणाच्या हातात कॉफी, कोणाकडे प्रोटीन शेक, कोणाकडे रंगीबेरंगी मॉकटेल, तर कोणाकडे नारळपाणी आणि आईस कँडी आहे. प्रत्येकाची वेगळी ओळख आणि स्वभाव सूचित करणारी ही संकल्पना पोस्टरला वेगळेपण देते.

पोस्टरवरील ‘यावेळी तिसराच आहे!’ ही टॅगलाईन विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्यासोबतच पार्श्वभूमीवर ऐकू येणारे ‘सहलीला जायचं हे…’ हे परिचित संगीत जुन्या आठवणी ताज्या करत नव्या प्रवासाची चाहूल देते. पोस्टरमध्ये दिसणारे हात नेमके कोणत्या कलाकारांचे आहेत, यावेळी कोणत्या नव्या चेहऱ्यांची एंट्री होणार आणि या टॅगलाईनमागे नेमकं रहस्य काय आहे, याची चर्चा आता रंगू लागली आहे. याशिवाय या वेळची सहल कोणत्या ठिकाणी घडणार, याबाबतही निर्मात्यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी या नव्या पर्वाबद्दल बोलताना सांगितले की, ‘झिम्मा ३’ हा केवळ पुढचा भाग नसून आधीपेक्षा तीनपट मोठा, तीनपट भन्नाट आणि तीनपट मजेदार अनुभव असेल. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून संपूर्ण टीम एका नव्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे. पोस्टरमधून काही संकेत दिले असले तरी अजून अनेक मोठी सरप्राईजेस प्रेक्षकांसाठी राखून ठेवली आहेत. प्रेक्षकांनी जे काही अपेक्षित केले असेल, त्यापेक्षाही अधिक वेगळं आणि भन्नाट काहीतरी या चित्रपटात पाहायला मिळेल. ‘झिम्मा ३’सारखी ट्रिप प्रेक्षकांनी याआधी अनुभवलेली नसेल. नवीन वर्षाची सुरुवात एका धमाल आणि संस्मरणीय प्रवासाने होईल.’ (Jhimma 3)

इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चित्रवल्लरी/चित्रमंडळी निर्मित ‘झिम्मा ३’चे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून क्षिती जोग आणि फाल्गुनी पटेल या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

‘झिम्मा’ मालिकेने महिलांच्या मैत्री, नातेसंबंध, आयुष्यातील नव्या टप्प्यांचा प्रवास आणि सहलीच्या माध्यमातून घडणाऱ्या भावनिक क्षणांना हलक्याफुलक्या शैलीत मांडत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर आलेल्या ‘झिम्मा २’लाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता तिसऱ्या भागाकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. (Jhimma 3)

नव्या पोस्टरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली असून १ जानेवारी २०२७ रोजी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘झिम्मा ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या आधी आगामी दिवसांत कलाकार, कथानक आणि या रहस्यमय पोस्टरमागील संकेत उलगडत जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

=======

हे देखील वाचा : ‘सायको रंगा’ टीझर प्रदर्शित; अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या रंगाच्या दमदार अ‍ॅक्शनची झलक

=======

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy