स्त्रीच्या आयुष्यातील भावनिक संघर्ष, नात्यांची गुंतागुंत आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध या विषयांवर आधारित ‘बंधिनी’ हा मराठी चित्रपट ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी नुकतेच त्याचे पोस्टर अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला चित्रपटाशी संबंधित संपूर्ण टीम उपस्थित होती.
सत्या फिल्म्स कंपनीच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे लेखन निर्माता सतीश वाघेला यांनी केले असून दिग्दर्शन संतोष मांजरीकर यांनी केले आहे. कथा देविका या मध्यवर्ती पात्राभोवती फिरते. प्रेम, कर्तव्य, त्याग, कुटुंब आणि आत्मसन्मान यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका स्त्रीचा भावनिक प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे.
चित्रपटात अश्विनी बागल, भूषण शिवतरे आणि योगेश तनपुरे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत प्रसाद सुर्वे, अविनाश किर्ती, मिलिंद संगावार, धीरज बिडवे, मनोज चौधरी, गोरक्ष लोखंडे, आदित्य साळुंखे, रोहित भिंगारे, प्रताप कोलते, शीतल पाटील, शीतल ओसवाल, रश्मी व्यहारे आणि आरती पवार हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
दिग्दर्शक संतोष मांजरीकर यांनी सांगितले की, आज अनेक महिला स्वतःची स्वप्नं आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘बंधिनी’ ही अशाच एका स्त्रीची कथा असून अनेक महिलांना ती स्वतःच्या आयुष्याशी जोडलेली वाटेल. प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा आणि विचार करायला भाग पाडणारा चित्रपट देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
निर्माते आणि लेखक सतीश वाघेला यांच्या मते, ‘बंधिनी’ हा केवळ मनोरंजनासाठी तयार केलेला चित्रपट नाही. प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला लावणारा अनुभव या चित्रपटातून मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.
चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी रोहन पगारे यांनी सांभाळली असून संगीत संयोजन प्रशांत शांताराम नांदगावकर यांचे आहे. कविता कृष्णमूर्ती, राहुल देशपांडे, वैशाली सामंत आणि देविका पणशीकर यांच्या आवाजातील गाणीही या चित्रपटाचे आणखी एक आकर्षण ठरणार आहेत.
स्त्रीच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवणारा ‘बंधिनी’ हा चित्रपट ९ ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
=======
हे देखील वाचा : ‘सायको रंगा’ टीझर प्रदर्शित; अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या रंगाच्या दमदार अॅक्शनची झलक
=======