बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या शूटिंगच्या वेळांवरून अनेकदा चर्चा होत असते. अभिनेत्री दीपिका पदुकोणने चित्रपटांच्या शूटिंगसाठी आठ तासांच्या शिफ्टची मागणी केल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये यावर मोठी चर्चा रंगली होती. आता दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने दीपिकाच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, अभिनेता अक्षय कुमारनेही या मुद्द्यावर करणच्या मताशी सहमती दर्शवली आहे.
‘कॉफी विथ करण ९’च्या आगामी एपिसोडमध्ये करण जोहर आणि अक्षय कुमार यांच्यात हा विषय चर्चेला येणार आहे. या एपिसोडमध्ये अक्षय कुमारसोबत अभिनेता रवी किशनही सहभागी होणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी हा एपिसोड जिओहॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.
दीपिकाच्या निर्णयाला करण जोहरचा पाठिंबा
दीपिका पदुकोणच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीवर बोलताना करण जोहरने तिच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
करण म्हणाला, “दीपिका पदुकोणच्या निर्णयाचाही मी आदर करतो. तिने अशी मागणी केली की त्याचा एवढा मोठा विषय का केला जातो, हे मला समजत नाही. हा तिचा अधिकार आहे आणि तिने तो मिळवला आहे. ती मेहनती महिला आहे. ती आई आहे, पत्नी आहे, एक प्रोफेशनल आहे आणि तिचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्यही आहे. पुरुष कलाकारांना अशी मागणी करता येते, तर तिला का नाही? अनेकदा इथे स्त्री-पुरुष असा भेदभाव केला जातो आणि ते योग्य नाही.”
महिला कलाकारांनाही पुरुष कलाकारांप्रमाणेच त्यांच्या कामाच्या वेळा आणि वैयक्तिक आयुष्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असायला हवं, अशी भूमिका करणने मांडली.
अक्षय कुमारनेही केली आठ तासांच्या शिफ्टची बाजू
या चर्चेदरम्यान अक्षय कुमारनेही ठरावीक वेळेत शूटिंग पूर्ण करण्याच्या पद्धतीला पाठिंबा दिला. शूटिंगचं योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध वेळापत्रक असल्यास संपूर्ण टीमला त्याचा फायदा होऊ शकतो. यामुळे चित्रपटाच्या क्रिएटिव्ह कामावर परिणाम होण्याची गरज नाही, असं मत त्याने मांडलं.
करणने यावेळी अक्षयच्या कामाच्या शिस्तीचंही कौतुक केलं. अक्षयच्या वेळेचं नियोजन, स्क्रिप्टची तयारी आणि दिग्दर्शक व निर्मात्यांप्रती असलेली त्याची बांधिलकी यांचा त्याने उल्लेख केला.
हे देखील वाचा : नमित मल्होत्रांच्या DNEG वर गंभीर आरोप; ‘रामायण’च्या VFX आर्टिस्टने पगारवाढ आणि Layoff बाबत मांडली व्यथा
दीपिका पदुकोणने आठ तासांच्या शिफ्टची मागणी का केली होती?
२०२५ मध्ये दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटातून दीपिका पदुकोण बाहेर पडल्याची बातमी समोर आली होती. शूटिंगच्या वेळा आणि इतर व्यावसायिक अटींवरून मतभेद झाल्याचे त्यावेळी विविध रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले होते. दीपिकाने आठ तासांच्या शिफ्टची मागणी केल्याचीही चर्चा होती.
यानंतर नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’च्या सीक्वेलमध्येही दीपिका दिसणार नसल्याचं अधिकृतपणे स्पष्ट झालं. मात्र, या दोन्ही प्रोजेक्टमधून बाहेर पडण्यामागची कारणं एकच होती, असं निश्चितपणे म्हणता येणार नाही.
दीपिकाच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीमुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या कामाच्या वेळा, वैयक्तिक आयुष्य आणि महिला कलाकारांना मिळणारी व्यावसायिक समानता यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.