Home » Maharashtra Shaheer Movie Review: ‘शाहीर, अंगावर शहारा आला!’

Maharashtra Shaheer Movie Review: ‘शाहीर, अंगावर शहारा आला!’

Maharashtra Shaheer Movie Review: 'शाहीर, अंगावर शहारा आला!'

‘शाहीर, अंगावर शहारा आला!’ शाहीर, तुमचा पहाडी आवाज आणि गाणं ऐकून मन स्वाभिमानाने आणि मस्तक नवं चैतन्याने प्रफुल्लीत झालंय. व्हा शाहीर.. व्हा अशी उमदी उस्फुर्त दाद शाहिराला मिळाल्यावर; शाहीर वा कोणताही लोककलावंत अधिक उर्मीने पोवाडा किंवा आपली कलासादर करण्यासाठी पुन्हा आनंदाने उभा राहतो. कौतुकाच्या शाब्बासकी साठी ‘झटणारा’ आणि आपल्या कलेतून समाजाला वेळोवेळी आरसा दाखवत ‘लढणारा’ शाहीर काय असतो? हे समजावून घ्यायचं असेल; तर ऐका…  ‘सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर.. आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार!’ असं आपल्या पहाडी आवाजाने वदणारे शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे आपल्याला पडद्यावर उष:काळात उभे असलेले दिसतात. ‘महाराष्ट्र भूमी बहुगुणी, शोभते खणी किती नरमणी.. संत जन्मले हिच्या कूसव्यात.. शारदा भक्त शोभती खास.. कलेची नित्य नवी आरास जी..जी!’ या वैभवशाली महान राष्ट्रात अर्थात महाराष्ट्रात जन्मलेल्या अशाच अवलिया, कलंदर ‘किसना’ची गोष्ट सांगायला, दाखवायला आणि ऐकवायला दिग्दर्शक केदार शिंदे ‘महाराष्ट्र शाहीर’ हा घेऊन आलाय.

ही कथा आहे महाराष्ट्रातील अशा एका प्रभावशाली शाहीर, लोकगीत गायक, लेखक आणि रंगकर्मी कृष्णराव गणपतराव अर्थात शाहीर साबळे यांची! ही कथा आहे महाराष्ट्राच्या निर्मितीलढ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आणि आधुनिक मराठी माणसाची ओळख व अस्मिता स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या एका शाहीराची. ही कहाणी आहे ‘जय जय महाराष्ट्र माझा….’ हे राज्यगीत गाणाऱ्या महान कलाकाराची! आणि ही कथा आहे.. तुमची, आमची त्या प्रत्येक लोककलावंतांची वा माणसाची… जो प्रामाणिकपणे काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो. शाहीर साबळे यांचं आयुष्य हे देखील तुमच्या-आमच्या सारखंच सर्वसामान्य होतं. पण, त्यांचं कर्तृत्व अग्रगण्य आणि प्रभावी होतं. शाहीर साबळे यांना त्यांच्या जीवनप्रवासात भेटलेल्या विविधांगी व्यक्तींनी एक सत्कर्माची दिशा दाखवली; आणि त्यासाठी शाहीर त्यासर्व व्यक्तिमत्वांचे आपल्या गुरुंचे ऋणी आहेत; हेही आपल्याला हा सिनेमा सांगून जातो. (Maharashtra Shaheer)

लहानपणी आईपासून लपत गात असलेलं गाणं, पुढे आजीचा धाक, नंतर मुंबईत गिरणी कामगार म्हणून झालेली ओढाताण, अशातच भानुमतीचं आयुष्यात येणं, स्वातंत्र्य चळवळ ते महाराष्ट्राची लोकधारा अशा अनेक गोष्टींना सिनेमाच्या पटकथेत स्पर्श करण्यात आला आहे. त्यामुळे शाहीर साबळे यांच्या जीवनाचा सर्वसमावेशक व्यासंग आपल्याला या सिनेमातून मिळतो.

सिनेमाची भिस्त ही प्रामुख्याने चौरंगी आहे. एक खांब म्हणजे स्वतः शीर्षक भूमिकेत कलाकार अर्थात अभिनेता अंकुश चौधरी, दुसरा खांब म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे, तिसरा खांब म्हणजे सर्व तांत्रिक घटक.. ज्यात विशेषकरुन कलादिग्दर्शकाचे योगदान महत्वपूर्ण आहे. आणि चौथा महत्वाचा खांब म्हणजे संगीतकार गायक अजय-अतुल. अजय-अतुल या जोडीने सिनेमात अक्षरशः धमाल केली आहे. संगीत हा जसा शाहीर साबळे यांचा जीव की प्राण होता; तसंच या सिनेमाचा संगीत हा आत्मा आहे. अजय -अतुल आणि इतर सर्व गायक मंडळींनी सचोटीने प्रयत्नपूर्वक केलेलं उत्कृष्ट काम आपल्या नजरेत आणि कानांवर पडतं. शाहीरांच्या जुन्या गाण्यांची पुनर्निर्मिती असो किंवा नवीन संगीतबद्ध केलेली गाणी असो सिनेमाचे संगीत प्रेक्षकांना बांधून ठेवतं. चित्रपटाच्या शेवटी ‘महाराष्ट्र गीत’ दाखवण्यात आलं आहे. त्यात एक सरप्राईज आहे, ते मात्र तुम्हाला चित्रपट बघूनच कळेल.

अंकुश चौधरीने पडद्यावर शाहीरांची भूमिका वठविण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं सिनेमा बघताना जाणवतं. तरुण शाहीर साबळे म्हणून अंकुश चौधरी म्हणावा तेवढा शोभून दिसला नसला तरी पन्नास-साठीचे शाहीर दाखवण्यासाठी रंगभूषाकाराने घेतलेली मेहनत अंकुशच्या रूपात फळाला आलेली दिसते. या वयातील अंकुशच्या अभिनिवेश अफलातून आहे.  यात दोन दृश्यांचा विशेष उल्लेख करता येईल…एक… जेव्हा शाहीर म्हणतात, ‘आपल्या पार्टीची.. नाटकाची बस विकली.. जमिनीचा तुकडा विकला’ आणि दुसरे दृश्य म्हणजे… जेव्हा शाहीर आपल्या दोन मुलींना महाराष्ट्राची लोकधाराची तालीम घेताना बघतात. यावेळी अंकुशनं साकारलेला अभिनिवेश लाजवाब आहे. ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ आणि शाहीर साबळे, ‘आंधळं दळतंय’ हे नाटक कसं घडतं, बाळासाहेब ठाकरेंची भेट, पत्नी पासून होणारी ताटातूट हे प्रसंग दिग्दर्शकाने शिताफीने पडद्यावर रेखाटले आहेत. सोबतच शाहीर जेव्हा पहिल्यांदा मुंबईत येतात; तेव्हाचे प्रसंग पडद्यावर दाखवताना केलेलं ‘गिमिक’ आपल्याला नॉस्टेल्जिक करुन टाकणारे आणि आजच्या लहान मुलांना तत्कालीन मुंबईच दर्शन घडवणारे आहे. (Maharashtra Shaheer Review)

उपरोक्त म्हणल्याप्रमाणे अंकुशनं कौतुकास्पद आणि दखलपात्र काम केलं आहे. आजवरच्या त्याच्या कामापासून अत्यंत वेगळं आणि रेखीव काम त्याने केलं आहे. दुसरीकडे सना शिंदे हिने देखील आपल्या पदार्पणात समाधानकारक काम केलं आहे. परंतु, अधिक ‘पॉलिश’ काम तिनं यापुढे करावं; अशी अपेक्षा आहे. शाहीर साबळेंच्या आजीच्या भूमिकेतील निर्मिती सावंत कमी वेळासाठी का होईना, पण भाव खाऊन जातात. तीच गत शुभांगी सदावर्ते हिची आहे. उत्कृष्टपणे तिनं शाहिरांच्या आईची भूमिका साकारली आहे. साने गुरुजी आणि राजा मयेकर यांची भूमिका साकारणारा कलाकारही विशेष स्मरणात राहतो.

पडद्यावर दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे याने घेतलेली मेहनत विशेषकरुन दिसते. कलाकारांच्या कास्टिंगपासून ते पटकथेतील बारकावे; पात्रांची ओळख करुन देण्यासाठी दिग्दर्शित केलेलं प्रसंग सिनेमाचा प्रभाव वाढवता. लेखनाच्या पातळीवर पटकथा प्रभावी आहे. संवादातील प्रादेशिक आणि कालानुरूप होणारे शाब्दिक बदल आणि त्यातील बारकावे लेखकाने छान लिहिले आहेत. पटकथा सिनेमाच्या पूर्वार्धात काहीशी रेंगाळली आणि तुटक-तुटक वाटते. पण, उत्तरार्धात ती एकसंध होऊन प्रभावी गोष्ट आपल्या समोर सादर होते. कलाकारांची वेशभूषा, रंगभूषा आणि सिनेमाची कलात्मक तांत्रिकबाजू उमदी आहे. सोबतच रेखीव सिनेमॅटोग्राफी आणि पडद्याची भाषा आपल्याला सिनेमात गुंतवून ठेवण्यास मदत करतात. (Maharashtra Shahir)

‘मुंबई ग नगरी बडी बांका.. जशी रावणाची दुसरी लंका.. वाजतो ग डंका
डंका चहूं मुल्की राहण्याला गुलाबाची फुल्की पाहिली मुंबई
मुंबई ग नगरी सदा तरनी व्यापार चाले मनभरुनी दर्याच्या गो वरुनी
वरुनी जहाजे फिरती आगबोटीत निराळी धरती पाहिली मुंबई’

आणि

‘शाहीर साबळ्यांची कला,
भारतमाते वाहि ली तुला
शक्ती मधुर रसवंतीला,
प्रभु हेचि देगा
कलावंत बंधुजन हो, देशकामी लागा…’

ह्या ओळी मनाला विशेष भिडतात. सोबतच ‘गांधी माझा सखा ग, ओवी त्यांना गाईन… तुरुंगात जाईन मी, स्वराज्य मिळवीन’, ‘पावन झाली चंद्रभागा.. कृतार्थ पांडूरंग..झाला कृतार्थ पांडुरंग..’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या’, ‘आधी गणाला रणी आणला.. नाहीतर रंग पुन्हा सुना सुना’, ‘जीवा शि वाची बैलजोड..’, ‘विंचू चावला..’ आदी सर्व गाणी, भारूड.. आपल्या कानांवर पडतात आणि कान तृप्त झाल्यासारखे वाटतात. त्यामुळे जरूर अनुभवावा अशी पर्वणी असलेला हा ‘महाराष्ट्र शाहीर’ तुम्ही जरूर पाहायला हवा.

सिनेमा : महाराष्ट्र शाहीर
निर्माते : संजय छाब्रिया, बेला शिंदे
कथा : वसुंधरा साबळे
पटकथा, संवाद : प्रतिमा कुलकर्णी
दिग्दर्शक : केदार शिंदे
कलाकार : अंकुश चौधरी, सना शिंदे, अश्विनी महांगडे, शुभांगी सदावर्ते, निर्मिती सावंत
संगीत : अजय – अतुल
गीते : शाहीर साबळे, भानुमती साबळे, राजा बढे, गुरू ठाकूर
छायाचित्रण : वासुदेव अरुण राणे
संकलन : मयूर हरदास
दर्जा : साडेतीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy