Home » सिनेमाची वास्तविकता अधिक वाढावी यासाठी ‘सॅम बहादूर’मध्ये वापरली गेली खरीखुरी युद्धाची वाहने

सिनेमाची वास्तविकता अधिक वाढावी यासाठी ‘सॅम बहादूर’मध्ये वापरली गेली खरीखुरी युद्धाची वाहने

बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभासंपन्न अभिनेता म्हणून विकी कौशलला ओळखले जाते. त्याने त्याच्या चित्रपटांमधून त्याच्यात असणाऱ्या एका सकस अभिनेत्याची सर्वांना ओळख करून दिली. ऍक्शन, कॉमेडी, रोमांस आदी जवळपास सर्वच प्रकारच्या चित्रपटांमध्ये त्याने त्याच्या प्रभावी अभिनयाची झलक दाखवली. सध्या विकी त्याच्या आगामी ‘सॅम बहादूर’ सिनेमासाठी खूपच चर्चेत आला आहे. सिनेमाचा पहिला लूक जेव्हा समोर आला तेव्हापासूनच या सिनेमाबद्दल आणि विकीच्या अभिनयाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. आता त्याच्या या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, लवकरच हा सिनेमा रिलीज होत आहे.

सॅम बहादूर हा सिनेमा देशाचे पहिले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांना आणि आपल्या इंडियन आर्मीला समर्पित आहे. सध्या विकी या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर विकीच्या अभिनयाचे जोरदार कौतुक केले जात आहे. विकीने स्वतःला पूर्णतः सॅम बहादूर यांच्या भूमिकेत समरस करून घेतलेले दिसत असल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे. सिनेमाचे जबरदस्त संवाद, आर्मीची शौर्यगाथा, शहारा आणणारे सीन्स, जिवंत अभिनय आदी सर्वच बाजू जमेच्या असल्याने सिनेमा चांगलाच गाजणार यात वाद नाही.

हा सिनेमा म्हणजे आपल्या इंडियन आर्मीची शौर्यगाथा आहे. त्यामुळे साहजिकच यात अनेक ऍक्शन सीन्स आणि आर्मीशी संबंधित विविध शस्त्र पाहायला मिळणार आहे. याच संदर्भात एक अपडेट समोर येत आहे. या सिनेमातील सर्व सीन्स खासकरून ऍक्शन सीन पडद्यावर बघताना कुठेही खोटे वाटू नये यासाठी आणि सिनेमाला अतिशय खरे दाखवण्यासाठी यात सर्व आर्मीशी आणि युद्धाशी संबंधित शस्त्रांची खरेदी करण्यात आली होती. यात बंदुका, मिसाइल लॉन्चर, टॅंक आदी अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. हा सिनेमा फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी भारतीय सैन्याचे नेतृत्व केले आणि बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती केली.

दरम्यान मेघना गुलजार दिग्दर्शित या सिनेमात विकी कौशलसोबत फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि जीशान अय्यूब महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या १ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy