ओटीटी प्लॅटफॉर्मने मनोरंजनाचे एक भव्यदिव्य द्वार सर्वांसमोर उघडलं आहे. सुरुवातीला तरुणाईचा म्हणून समजला जाणारा हा प्लॅटफॉर्म आता मध्यमवयीन लोकांच्या पसंतीस उतरू लागला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कंटेंट. टिपिकल सासू – सून मालिकांपेक्षा विविधरंगी, विविधढंगी कथानक असणाऱ्या वेबसिरीज प्रेक्षकांना भावल्या आणि त्याच्या पुढच्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहू लागले. सध्या अशाच एका बहुचर्चित आणि IMDB वेबसाईटवर भारतामधील टॉप 10 वेबसिरीजपैकी एक असणारी सिरीज म्हणजे, ‘पंचायत‘!
वेबसिरीज म्हणजे बोल्ड सीन्स, वेबसिरीज फॅमिली फ्रेंडली अजिबातच नसतात, अशा अनेक गैरसमजांना मोडीत काढणाऱ्या ‘पंचायत’ या वेबसिरीजचे दोन सिझन्स प्रसिद्ध झाले असून, प्रेक्षक तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या एप्रिलमध्ये तिसरा सिझन प्रसिद्ध होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
इंजिनीअर असणाऱ्या अभिषेकला कॅम्पसमधून कोणत्याही चांगल्या कंपनीमध्ये नाही, तर एका गावात ग्रामपंचायत सचिव म्हणून नोकरी मिळते. अगदीच काही नाही, तर किमान आहे ती नोकरी करावी असा विचार करून तो नोकरीवर रुजू होतो.

या नोकरिदरम्यान त्याची ओळख होते गावातले सरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्यांशी. अभिषेक नोकरीसोबत MBA एन्टरन्सची तयारीही करत असतो. नाईलाजाने गावात राहणारा अभिषेक कधी या गावातला आणि गावाचा होऊन जातो, ते त्याचं त्यालाही कळत नाही. (Panchayat)
अभिषेकचा हा सारा प्रवास सोपा नसतोच, पण तो अतिशय साध्या आणि गंमतीशीर पद्धतीने मांडण्यात आला आहे. शहरात राहणारा, आधुनिक विचार असणारा सुसंस्कृत साधा सरळ अभिषेक गावातल्या लोकांमध्ये कसा वावरतो, तिथे त्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यायला लागतं, गावातली लोकं त्याला आणि तो गावातल्या लोकांना कसं स्वीकारतो, हे सगळं खूप सुंदर पद्धतीने मांडण्यात आलं आहे. आणि या सर्वांवर कळस होता तो सिझनचा शेवट. पहिला सिझन रिंकी नावाची प्रेमाची हलकीशी झुळूक अभिषेकच्या आयुष्यात येणार का? या प्रश्नावर संपवण्यात आली होती.
सामान्यतः अशा उत्कंठावर्धक वळणावर संपणाऱ्या बहुतांश वेबसिरीजचे दुसरे सिझन काहीसे रटाळ असतात. पण पंचायत मात्र याला अपवाद आहे. दुसरा सिझनही तितकाच सहज आणि सुंदर आहे.

दुसऱ्या सीझनमध्ये सरपंचांचा प्रतिस्पर्धी निर्माण झाला. हा प्रतिस्पर्धी अभिषेकला कसा त्रास देतो, गावातल्या लोकांची मानसिकता, छोट्या मोठ्या गोष्टींवरून होणारे वाद, अशा अनेक प्रसंगांचा सामना अभिषेक कसा करतो, अशा अनेक प्रसंगांच्या गंमती – जमतींसह अधूनमधून होणारा रिंकीचा वावर सुखावणारा आहे. काही प्रसंग पोट धरून हसायला लावतात, तर कधी हसता हसता नकळतपणे डोळ्याच्या कडा पाणावतात. आता पुढे अभिषेकच्या आयुष्यात काय होणार, त्याची आणि रिंकीचा कहाणी नेमकं कुठलं वळण घेणार, त्याची MBA एन्टरन्स क्लिअर होणार का? ग्रामपंचायतीमध्ये नवीन सरपंच कोण असेल? अशा अनेक प्रश्नांसह दुसऱ्या सिझनचा शेवट करण्यात आला आहे. (Amazon Prime Video)
सिरीजचे पहिले दोन्हीही सिझन्स नितांतसुंदर झाले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना तिसऱ्या सिझनची प्रचंड उत्सुकता आहे. एक साधं सरळ कथानक, कलाकारांचे सहजसुंदर अभिनय, कोणतीही आक्षेपार्ह दृश्य नाहीत की, अर्वाच्च भाषेतले संवाद नाहीत. सामान्य माणसाचं सामान्य आयुष्य आणि त्या आयुष्यात येणाऱ्या सामान्य समस्या याभोवती फिरणारी ही सिरीज प्रेक्षकांना भावली, कारण यामध्ये प्रत्येक माणसाला ‘कॉमन मॅन’ दाखवण्यात आलं आहे. कथानकात कोणतेही धक्के नाहीत, काही अपेक्षितही नाही आणि अनपेक्षितही नाही; आहे ते सामान्य माणसांचे सामान्य आयुष्य, जे क्वचितच कुठल्या मालिका, सिनेमा अथवा सिरीजमध्ये बघायला मिळतं.
ही सिरीज अमेझॉन प्राईमवर उपलब्ध असून IMDB वर याला 8.9 रेटिंग देण्यात आलं आहे.