शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘तू मिल जाए’ असं या गाण्याचं नाव असून, यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळते. मात्र या गाण्याचं आणखी एक खास आकर्षण म्हणजे अरिजित सिंह आणि आंतरराष्ट्रीय पॉपस्टार एड शीरन यांचं एकत्र येणं. या दोघांच्या संगीताच्या वेगळ्या शैलींचा संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. अशातच पहिल्या गाण्यातून निर्मात्यांनी चित्रपटाची एक वेगळी झलक दाखवली आहे. रोमान्स, डान्स आणि अॅक्शन यांची सांगड घालणाऱ्या या गाण्यात शाहरुखचा रोमँटिक अंदाज आणि त्याची आक्रमक बाजू दोन्ही पाहायला मिळतात.
शाहरुख-दीपिकाची जोडी पुन्हा चर्चेत
गाण्याच्या सुरुवातीलाच शाहरुख खानचा एक दमदार संवाद ऐकायला मिळतो. ‘मैं कातिल नहीं, आशिक हूं, और निशाना मेरी माशूका, और वो आशिक ही क्या जो दिल चीर ना दे’, या संवादातून त्याच्या व्यक्तिरेखेची रोमँटिक पण तितकीच धोकादायक बाजू समोर येते.
यानंतर शाहरुख आणि दीपिका यांच्यावर चित्रित केलेला रोमँटिक डान्स पाहायला मिळतो. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री गाण्याचा महत्त्वाचा भाग ठरते. काही रोमँटिक क्षणांनंतर गाण्यात अॅक्शनची झलकही पाहायला मिळते. त्यामुळे ‘किंग’मध्ये केवळ प्रेमकथा नसून अॅक्शन आणि संघर्षही महत्त्वाचा असणार असल्याचे संकेत मिळतात.
गाण्याच्या शेवटी शाहरुखचा आणखी एक संवाद लक्ष वेधून घेतो. ‘इस बार दिल में आग लगी है, अब दुनिया जलाये बिना मानेगा नहीं’, या संवादातून त्याच्या व्यक्तिरेखेतील आक्रमकता दिसून येते.
अरिजित सिंह आणि एड शीरन यांचं खास Collaboration
‘तू मिल जाए’ गाण्याची सर्वाधिक चर्चा होत आहे ती अरिजित सिंह आणि एड शीरन यांच्या एकत्र येण्यामुळे. अरिजित सिंहने गाण्याला आपला आवाज दिला असून, एड शीरनने यात इंग्रजी रॅप सादर केला आहे. गायिका मधुबंती बागची यांचाही आवाज या गाण्यात ऐकायला मिळतो.
सचिन-जिगर यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे, तर कुमार यांनी हिंदी गाण्याचे बोल लिहिले आहेत. एड शीरनने इंग्रजी रॅप लिहिला असून, पियुष-शाजिया यांनी गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. भारतीय चित्रपटसंगीत आणि आंतरराष्ट्रीय पॉप संगीताचा हा संगम गाण्याला वेगळेपण देतो.
सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर शाहरुख आणि दीपिकाच्या जोडीसोबतच अरिजित सिंह आणि एड शीरन यांच्या Collaborationचीही चर्चा सुरू झाली आहे. वयाच्या ६१व्या वर्षीही शाहरुखचा उत्साह आणि पडद्यावरील एनर्जी पाहून अनेक चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
एका चाहत्याने शाहरुखच्या एनर्जीचं कौतुक करताना, ‘६०व्या वर्षीही त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या चाहत्याने ‘SRK + Deepika + Arijit + Ed = Absolute Cinema’ असं म्हणत या गाण्याचं कौतुक केलं. दीपिकाच्या अभिनयाचं आणि तिच्या स्क्रीन प्रेझेन्सचंही चाहत्यांनी कौतुक केलं आहे.
‘किंग’ कधी होणार रिलीज?
सिद्धार्थ आनंद यांनी ‘किंग’चं दिग्दर्शन केलं असून, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स या चित्रपटाच्या निर्मिती संस्थ आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत सुहाना खान, अभिषेक बच्चन, जयदीप अहलावत आणि अभय वर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘किंग’ हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्या गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहता आता चित्रपटाच्या पुढील अपडेट्सकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.