‘तुंबाड 2’ या बहुचर्चित चित्रपटाबाबत आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आता या सिक्वेलचा भाग असणार असल्याचे अभिनेता आणि निर्माता सोहम शाहने अधिकृतपणे जाहीर केले आहे. (Alia Bhatt Tumbbad 2)
सोहम शाहने मंगळवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आलिया भट्टसोबतचा एक फोटो शेअर केला. दोघेही काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत असून, या पोस्टसोबत त्याने “A new chapter unfolds. Welcome to #Tumbbad2, @aliaabhatt. #PralayAayega. See you at the movies.” असे कॅप्शन लिहिले आहे.
यापूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘तुंबाड 2’ हा चित्रपट 3 डिसेंबर 2027 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती. रिलीज डेट जाहीर होण्यापूर्वी मोशन पोस्टर आणि सोशल मीडियावरील काही रहस्यमय पोस्टद्वारे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्यात आली होती.
चित्रपटाचा पोस्टर शेअर करताना सोहम शाहने “A sinful past, an ominous future. The hunger rises; the legacy of greed continues.” असे लिहित सिक्वेलच्या गूढ आणि रहस्यमय विश्वाची झलक दिली होती.
चित्रपटाबाबत बोलताना सोहम शाहने प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, “‘तुंबाड’ हा चित्रपट माझ्यासाठी नेहमीच खास राहिला आहे. ‘तुंबाड 2’मधून आम्ही त्या विश्वाला अधिक व्यापक आणि सखोल स्वरूपात पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रेक्षकांना आवडलेली पौराणिक पार्श्वभूमी आणि वातावरण कायम ठेवत कथेत नवे स्तर जोडले आहेत. त्यामुळे हा अनुभव ओळखीचा वाटेल, पण त्याचवेळी पूर्णपणे नवाही असेल.”
आदेश प्रसाद दिग्दर्शित ‘तुंबाड 2’ ची निर्मिती Sohum Shah Films आणि Pen Studios यांच्या सहयोगाने करण्यात येत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, आलिया भट्टच्या सहभागामुळे या बहुप्रतीक्षित सिक्वेलबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
======
हे देखील वाचा : श्रद्धा कपूरचा जबरदस्त अंदाज; विठाबाई नारायणगावकरांच्या प्रेरणादायी जीवनकथेची झलक
======