मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार आणि प्रभावी अभिनेता शशांक शेंडे पुन्हा एकदा एका वेगळ्या आणि रहस्यमय भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतणाऱ्या शशांक शेंडेंनी आजवर अनेक वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. त्यामुळेच त्यांच्या नव्या भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते.
आता आगामी मराठी चित्रपट ‘घबाडकुंड’ मध्ये शशांक शेंडे तंत्र-मंत्रात पारंगत असलेल्या सिद्धयोगी मांत्रिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा अत्यंत गूढ आणि रहस्यमय असून, मंत्र आणि तांत्रिक विद्येचा सखोल अभ्यास केलेल्या ‘बाबा’च्या भूमिकेत ते झळकणार आहेत.
सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लूकची जोरदार चर्चा सुरू आहे. संपूर्ण टक्कल, कपाळावर काळा टिळा, गळ्यातील माळा आणि डोळ्यांतील गूढ भाव यामुळे त्यांचा हा अवतार अधिकच भयावह आणि प्रभावी वाटतो. या लूकमुळे ‘घबाडकुंड’बद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना शशांक शेंडे म्हणाले, “ही भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. एका मांत्रिकाच्या मनोविश्वात शिरून त्याची शक्ती, त्यामागचं तत्त्वज्ञान आणि त्याचा उद्देश समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांना हा अनुभव नक्कीच खिळवून ठेवणारा ठरेल.”
चित्रपटातील हा रहस्यमय मांत्रिक नेमका कोण आहे? त्याच्या शक्तींमागचं गूढ काय आहे? आणि त्याचा खरा हेतू कोणता आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. गूढता, थरार आणि रहस्य यांचा अनोखा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्याच प्रवासावर घेऊन जाणार आहे.
दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी या चित्रपटातून एक भव्य आणि रहस्यमय ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर उभं करण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. या संकल्पनेला ‘आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ लाभली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवा ट्रेंड निर्माण करण्याच्या तयारीत असलेला ‘घबाडकुंड’ येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
======
हे देखील वाचा : Zee Marathi ‘आंबा महोत्सव’ पर्व २ मध्ये कलाकारांची धमाल; ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेची घोषणा
======