तुम्हाला मी विचारलं की, असं एखाद कोणतं शुल्लक कारण असू शकतं? ज्यामुळे एखाद्याचा थेट जीव जाऊ शकतो… तुम्हाला कोणी सांगितलं की, ‘व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढलं आणि त्याची परिणीती म्हणजे राडा होऊन एकाचा जीव गेला.’ तर तुम्ही या घटनेवर विश्वास ठेवाल का? अनेकांचा या घटनेवर विश्वास नसेल. कारण, ही गोष्ट तुमच्या आजूबाजूला किंवा ओळखीत घडलेली नसेल. पण, असं होतं आणि यापुढेही होऊ शकतं. उपरोक्त सांगितलेली ही घटना ‘चौक’ या सिनेमातील आहे. ‘चौक’ (Chowk) चौक म्हणलं की आठवतो तो चौकातल्या मंडळींचा गलका, येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ, चौकातल्या काका, मामा, दादांचे किस्से, वाद आणि होणारे राडे देखील… अशाच एका चौकाची ही गोष्ट आहे.
‘मुळशी पॅटर्न’ सिनेमातील दया आठवतोय? हा तोच भाईगीरी करणारा दया अर्थात अभिनेता देवेंद्र गायकवाड. यापूर्वी विविध एकांकिका स्पर्धा हौशी रंगभूमी गाजवल्यानंतर लेखक अभिनेता असलेला देवेंद्र आता दिग्दर्शनात उतरला आहे. दिग्दर्शक म्हणून ‘चौक’ हा त्याचा पहिला सिनेमा आहे. सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सर्वकाही देवेंद्रनं केलं आहे. आता तुम्ही म्हणाल ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असला प्रकार आहे का? तर तसं मुळीच नाही. देवेंद्रनं सिनेमाचे उपरोक्त सर्व अवकाश शिताफीने हातळले आहेत. काही ठिकाणी तो कमी पडला आहे. पण, पदार्पण दिग्दर्शक म्हणून त्याला ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ द्यायला हरकत नाही. त्यामुळे असं म्हणायलाही म्हणता येईल की, ‘चौक’च काम त्यानं ‘चोख’ केलंय. (Chowk Marathi Movie Review)
ही गोष्ट आहे पुण्यातील.. पुणे तिथे काय उणे.. बरोबर ना? ‘पुणे तिथे काय उणे’ म्हणजे काय? काही नसण्याच्या उणिवेचा अपभ्रंश म्हणजे ‘उणे’. अधिक सोप्या भाषेत सांगायचं तर अशी कुठलीही गोष्ट शोधून सापडणार नाही जी पुण्यात सापडणार नाही. जसं सर्वाकही पुण्यात सापडतं तसंच ‘गुन्हेगारी’चा एक चेहरा देखील या पुण्याला आणि पुण्या नजीक असलेल्या शहरांना आहे. हा गुन्हेगारी चेहरा आजच्या तारखेला काहीसा सौम्य झाला आहे. पण, वीस-तीस वर्षांपूर्वी इकडे गुन्हेगारीचा जाळ निघायचा. या जाळाचं मार्मिक चित्रण यापूर्वी दिग्दर्शक प्रवीण तरडे याने त्याच्या ‘मुळशी पॅटर्न’ सिनेमात केलं आहे. त्याच धर्तीवरचा ‘चौक’ हाही सिनेमा आहे. मुळशीची गोष्ट मातीशी जोडलेली होती आणि यावेळी ‘चौक’ची गोष्ट हि अस्तित्व, अहंकार आणि राजकारणाशी जोडलेली आहे. स्वतःच अस्तित्व अबाधीत राहावं म्हणून मनुष्यजात कोणत्याही थराला जाऊ शकतो; काहीही करु शकतो. हेच काहीही म्हणजे काय? याचं उत्तर ‘चौक’ हा सिनेमा देण्याचा प्रयत्न ठरतो.
सिनेमाची सुरुवात होते ते गणपती विसर्जन मिरवणुकीने… बाल्या नावाचा तरुण बेधुंद होऊन मिरवणुकीत नाचत असतो. दोन वेगवेगळ्या मंडळाच्या गणपतीचे रथ एकामागोमाग असतात. मिरवणुकीत कोणाचा बाप्पा अर्थात गणेशमूर्तीचा रथ पुढे जाणार? यावरुन राडा होतो. मंडळाचा अध्यक्ष (शुभंकर एकबोटे) हा दुसऱ्या गटातील बाल्या (अक्षय टंकसाळे) च्या श्रीमुखात भडकावतो. ज्याच्या कानशिलात पडते; तो स्थानिक पुढारी नगरसेवक टायगर (उपेंद्र लिमये)चा भाऊ बाल्या असतो. अपमानित झालेला किंबहुना अहंकार दुखावलेल्या नगरसेवकाच्या भावाला आता काहीही करुन या अपमानाचा बदला घायचा आहे. तसा तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचाच असतो. सुरुवातीला पोलिसांवर दबाव टाकून बाल्या अध्यक्षाला बेदम तुडवतो. अध्यक्षचा जिगरी मित्र सनी (किरण गायकवाड) हा देखील या राड्यात असतो. बाल्या हा सनी आणि अध्यक्षावर खार खात असतो. त्यातच व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढलं… याचं शुल्लक निमित्त होतं आणि बाल्याचा जीव जातो. एकामागोमाग झटपट घटना घडतात आणि सर्वकाही उद्धवस्त होऊ लागत. या घटनांशी संलग्न असलेल्या दोन महत्वपूर्ण बाबी म्हणजे ‘गुन्हेगारी’ आणि ‘राजकारण’. याचं गावगुंड पुढारांची ही गोष्ट आहे. राजकारणी मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी काय करु शकतात आणि कोणत्या गलिच्छ थराला जाऊ शकतात? याच चित्रण सिनेमात खुबीने आलं आहे.
उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे नगरसेवक टायगर (उपेंद्र लिमये)चा भाऊ बाल्या आणि गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष (शुभंकर एकबोटे) त्याचा मित्र सनी (किरण गायकवाड) यांच्यात छत्तीसचा आकडा पुढे कायम राहतो. शुल्लक कारणांमुळे सुरु झालेलं भांडण जीवघेणं होतं. या भांडणाचा फायदा पुढारी मंडळी घेतात. अर्थात नगरसेवक टायगर आणि यापूर्वी निवडणुकीत हरलेला उमेदवार अण्णा (प्रवीण तरडे) यांच्यात राजकारण सुरु होतं. या खेळात बळी जातो तो सामान्य तरुणांचा. सुरुवातीला भांडणात बाल्याचा जीव जातो. त्यांनतर आणखी दोन-एक जीव जातात. पण, यासगळ्यात हे सर्व कोण घडवतं? का घडवतं? राजकारणी मंडळी स्वार्थासाठी तरुणाईचा कसा फायदा उठवतात? तरुणाई गुन्हेगारी मार्ग का निवडते? स्थानिक पातळीवर देखील सत्तेचं राजकारण कोणत्या थराला जाऊ शकतं? आदी सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला सिनेमात मिळतील. सिनेमा पूर्वार्धात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. मात्र उत्तरार्धात तो काहीसा रटाळ होऊन जातो. काही ठिकाणी पटकथेत लांबट लागलेली आहे. काही प्रसंग ताणण्यात आले आहेत. परिणामी सिनेमाचा अंतिम परिणाम आणि प्रभाव उत्तरार्धात तितकासा पडत नाही.
आजही जे पुढारी राजकारणत्याच्या मागेपुढे ‘सो-कॉल्ड’ समाजसेवा, जनसेवा म्हणून तरुण कार्यकर्ते उभे असतात. त्या प्रत्येकाने हा सिनेमा पाहायला आणि समजून घ्यायला हवा. सगळीकडेच वानवा आहे; अशातला भाग नाही. परंतु, राजकरणात काय काय घडू शकतं? हे आपल्याला उघड डोळ्यांनी सिनेमात पाहायला मिळेल. त्यामुळे असा विषय लेखक दिग्दर्शकाने ताकदीने मांडला; यासाठी त्याचं कौतुक आवश्यक आहे. सिनेमात एक लव्हेबल ट्रक देखील आहे. त्यामुळे सिनेमा काहीसा संतुलित देखील होतो. लेखकाने कथानकात भावनिक कंगोरे शोधण्याचा देखील प्रयत्न केलाय.
सिनेमातील सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. प्रवीण तरडेचा स्वतःचा असलेला ‘पॅटर्न’ इकडेही दिसतो. उपेंद्र लिमयेचं काम लक्षात राहणारं आहे. दुसरीकडे किरण गायकवाड याने देखील त्याची भूमिका उत्तम निभावली आहे. शुभंकर एकबोटे, स्नेहल तरडे, संस्कृती बालगुडे आणि अक्षय टंकसाळे या सर्वानींच पडद्यावर धमाल उडवली आहे. वास्तविकरित्या पडद्यावर गुन्हेगारी आणि स्थानिक राजकारण विश्वातील दाहकता दाखवता तो आपलं पुरेपूर मनोरंजन करतो. सिनेमाच्या कथानकात आता पुढे भाग करण्याचा वाव देखील आहे. त्यामुळे कदाचित ‘चौक २’ देखील आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो. तत्पूर्वी आता ‘चौक’ पाहायला विसरू नका.!
सिनेमा : चौक
निर्मिती : दिलीप पाटील
कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन : देवेंद्र गायकवाड
कलाकार : उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे
छायांकन, संकलन : मयूर हरदास
दर्जा : साडे तीन स्टार