Home » Bholaa Movie Review: भोला ॲक्शनसोबतच कॉमेडी आणि रोमान्सचाही तडका

Bholaa Movie Review: भोला ॲक्शनसोबतच कॉमेडी आणि रोमान्सचाही तडका

Bholaa Movie

शिव तांडवाचे अनन्य साधारण महत्व आपण जाणतो. तांडव; भगवान शिवाच्या क्रोधाशी संलग्न आहे. परंतु, शास्त्रानुसार भगवान शिव ‘क्रोध’ आणि ‘लीला’ या दोन्ही स्थितीत तांडव करतात. तांडव करताना भगवान शिव जेव्हा तिसरा डोळा उघडतात तेव्हा क्रोधाने आपत्ती येते.. संहार होतो, तर दुसरीकडे डमरू वाजवत शिव तांडव करतात तेव्हा ते परम आनंदात असतात. पौराणिक मान्यतेनुसार, रावणाने आपल्या आराध्य शिवाची स्तुती करण्यासाठी ‘शिव तांडव स्तोत्र’ रचले. यात एका ओळीत असं लिहिलं आहे की,

‘जयत्वदभ्रविभ्रमभ्रमद्भुजङ्गमश्वस द्विनिर्गमत्क्रमस्फुरत्करालभालहव्यवाट्।
धिमिद्धिमिद्धिमिध्वनन्मृदङ्गतुङ्गमङ्गल ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्डताण्डवः शिवः ||’

अर्थात..  गळ्यात असलेल्या प्रचंड तीव्रतेने फिरणा-या सर्पाच्या बाहेर पडणा-या निश्वासातून.. कपाळी धगधगणारा वन्ही पसरताना, धिमिद धिमिद असा मृदंगाचा मंगलमय उच्च आवाज चढत जाताना क्रमाक्रमाने उग्र तांडव करणारा शंकर अजय, अजिंक्य आणि विजयी होवो.’ भगवान शंकराचे हे गुणविशेष; अर्थात संहारक, प्रेमळ, रुद्रत्व, अजिंक्य, अपराजेय, अजय आदी सर्वांचे दर्शन आपल्याला अजय देवगण दिग्दर्शित आणि अभिनित ‘भोला‘ या सिनेमात प्रतीकात्मक दृष्ट्या दिसते.

Bholaa Trailer

म्हणूनच सिनेमाचे नाव भगवान शंकरावरुन ‘भोला’ (Bholaa Film) ठेवलं गेलं असावं. ते समर्पक आहे. मुळात या सिनेमांची कथा ही लोकेश कानाकराज लिखित ‘कैथी’ या तमिळ सिनेमावर आधारित. आता हिंदीत सिनेमाचा रिमेक बनवताना दस्तुरखुद्द अजयनं स्वतःच्या हातात दिग्दर्शनाची धुरा घेतली आणि ‘भोला’चा डोलारा उभा केला आहे. (Bholaa)

सिनेमा कथा पोलीस अधिकारी डायना जोसेफ (तब्बू) आणि तुरुंगातील कैदी.. जो आता त्याची शिक्षा भोगून बाहेर पडला आहे…  भोला (अजय देवगण) यांच्या अवतीभोवती फिरते. या सिनेमाची सुरुवात तब्बूच्या दमदार फाइट सीनने होते. डायना ही प्रामाणिक आणि साहसी पोलीस अधिकारी असते. आपल्या कामाप्रती ती सतत जागरूक असते. एका ड्रग डीलर गँगचा सामना करताना ड्रग्जचा मोठा साठा तिच्या हाती लागतो. त्यावेळी काही गुंडांना पकडून ती तुरुंगात डांबते. डायना तिच्या या कारवाईमुळे अश्वत्थामाच्या (दीपक डोब्रियाल) निशाण्यावर येते. (Bholaa Movie Review)

अश्वत्थामा ऊर्फ आशू हा गावचा असा बाहुबली आहे, जो राजकारणातील मोठ्या नेत्यांसाठी काम करतो. आशुला देवराज सुब्रमण्यम (गजराज राव) आदेश देतो की काहीही करून त्याने डायनाच्या पोलीस ठाण्यातून तो ड्रग्जचा साठा परत मिळवावा. जेव्हा डायना ड्रग्ज पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवून तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिटायरमेंट पार्टीत सहभागी होते, तेव्हा आशु तिच्या पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचा प्लॅन बनवतो. आता पार्टीत सहभागी झालेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या दारूमध्ये नशेचं औषध मिसळवलं जातं. मात्र हाताला दुखापत झाल्याने डायना ती दारू पिण्यास नकार देते. याच कारणामुळे डायनाशिवाय सर्व पोलीस कर्मचारी बेशुद्ध होतात.

Bholaa Movie Review

आता एका बाजूला डायनाच्या समोर पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्याचं आव्हान आहे. तर दुसरीकडे तिला ड्रग्ज पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊ नये याचीही काळजी घ्यायची आहे. सर्व बाजूंनी समस्यांनी घेरलेल्या डायनाला भोलाची आठवण येते. दहा वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर भोलाची सुटका झाली आहे आणि तो त्याच्या मुलीला भेटण्यासाठी निघालेला असतो. अशावेळी डायना भोलाची मदत घेते. मात्र भोलाला पोलीस कर्मचाऱ्यांविषयी प्रचंड राग आहे. त्यामुळे तो तिची मदत करणार की नाही? याचं उत्तर तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर मिळेल.

कयामत’, ‘इन्सान’, ‘गोलमाल’, ‘संडे’, ‘सिंघम’, ‘बोल बच्चन’, ‘सन ऑफ सरदार’, ‘हिम्मतवाला’, ‘टोटल धमाल’ आणि ‘दृश्यम’; हे सर्व अजयने केलेले दाक्षिणात्य रिमेक सिनेमे आहेत. यातील काही सिनेमे बॉक्सऑफिसवर यशस्वी ठरले तर काहींनी प्रेक्षकांची निराशा केली. पण, नजीकच्या वर्षात प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम २’ या रिमेक सिनेमानं प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळवली. आता पुन्हा ‘भोला’च्या निमित्तानं अजय रिमेक प्रेक्षकांसमोर आलाय. पण, अजयने ‘भोला’चे चित्र नव्याने रेखाटले आहे. जेणेकरुन ज्या प्रेक्षकांनी तामिळ ‘कैथी’ पाहिला असेल त्यांचे देखील ‘भोला’ मनोरंजन करेल.

सिनेमातील अ‍ॅक्शन सीन्स दमदार आहेत. हे सीन्स रंजक अंदाजात चित्रित करण्यात आले आहेत. दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि स्टंट टीमची अ‍ॅक्शनवर चांगली पकड दिसून येतेय. यावेळी रोहित शेट्टी प्रमाणे अक्षयनं देखील त्याच्या सिनेमात गाड्या उडवल्या आहेत. अ‍ॅक्शन सीनचे पार्श्वसंगीत देखील उत्तम जुळून आले आहे. पण, ते अनेक ठिकाणी तीव्र आणि अवाजवी भासते. संगीताची जबाबदारी ‘केजीएफ’ फेम रवी बसरूर यांनी पार पाडली आहे.

त्यामुळे सिनेमात ‘केजीएफ’चा फील देखील डोकावतो. सिनेमात आणखी एक बाब आहे जी आपलं लक्ष वेधून घेते. ती म्हणजे ‘आज फिर जिने की तमन्ना है’… हे मूळ जुने गाणे; सिनेमात रिमेक करुन वापरण्यात आलं आहे. कथा वेगवान राखण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. कथेतील काही उणिवा सोडल्या तर फक्त लोकेशनच नाही तर सेट डिझाईन वगैरेही अतिशय अचूकपणे निवडले गेले आहे. परंतु अ‍ॅक्शन सीन्स व्हीएफएक्स उत्तम जमले आहेत.

=====

हे देखील वाचा : देशाच्या सुरक्षेसाठी शहिद झालेल्या अज्ञात हेरांना मानवंदना देणारी, भारतातीत सर्वोत्कृष्ट स्पाय थ्रिलर सीरिज

=====

दस्तुरखुद्द अजय देवगण आणि तब्बू यांनी अफलातून काम केलं आहे. परंतु, संजय मिश्राची भूमिका अधिक प्रभावित करणारी आहे. याशिवाय दीपक डोब्रियाल यांच्यासह इतर कलाकारांचंही अभिनय दमदार आहे. भोलामध्ये ॲक्शनसोबतच कॉमेडी आणि रोमान्सचाही तडका आहे. सिनेमाची तांत्रिक बाजू प्रामुख्याने सिनेमॅटोग्राफीही उत्तम आहे.

सिनेमा एका सस्पेन्सफुल नोटवर संपतो, शेवटी अभिषेक बच्चनची व्यक्तिरेखा दिसते. आता सिनेमाच्या पुढच्या भागात अभिषेक पुन्हा एकदा खलनायक भोलाचे आयुष्य उद्ध्वस्त करताना दिसेल असे वरवर दिसून येतय. विनीत कुमारची व्यक्तिरेखा देखील पुढील भागात विस्ताराने पाहायला मिळेल असे म्हणायला हरकत नाही.

सिनेमा : भोला
निर्मिती : अजय देवगण, भूषण कुमार
दिग्दर्शक : अजय देवगण
कथा : लोकेश कनकराज
कलाकार : अजय देवगन, तब्बू, दीपक डोब्रियाल, संजय मिश्रा, गजराज राव
छायांकन : असीम बजाज
संकलन : धर्मेंद्र शर्मा
दर्जा : साडेतीन स्टार

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy