माणूस जगतो का? नि जगण्यासाठी एवढा धडपडतो का? याचा विचार तुम्ही, आम्ही, आपण करणे जरुरीचे आहे. मृत्यू अगदी उद्या येणार असेल तर काहीही न करिता स्वस्थ राहिलेले उत्तम. पण, तसे असणार नाही… त्यामुळे जर मृत्यू दूर असेल तर ‘जगणे’ प्राप्त आहे. आणि ‘येरे हरी दे खाटल्यावरी’ कुठपर्यंत करणार? म्हणून जगण्यासाठी धडपड करणे भाग आहे. मृत्यू कधी ना कधी येणार हे माहीत आहे. पण, माणूस मुळी स्वतःसाठी जगतच नाही, कायम आपल्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या माणसांसाठी धडपडत असतो. आणि सर्व पार करण्याचे सामर्थ्य त्याला आपल्या माणसांसाठी मिळते, अर्थात कधीतरी जायचे आहे हे माहीत असूनही आपल्या माणसांची पुढील जीवन गाथा सुखाची होवो म्हणून माणूस धडपड करतो.. अगदी अखेर च्या क्षणा पर्यंत. हीच अखेरच्या क्षणापर्यंतची धडपड दाखवणारा सिनेमा म्हणजे ‘अकेली‘. (Akelli Movie Review)
नितीन वैद्य हे नाव टीव्ही मालिका विश्वासाठी आणि टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी नवं नाही. अनेक लोकप्रिय आणि प्रयोगशील टीव्ही मालिकांची निर्मिती आजवर वैद्य यांच्या टीमने केली आहे. मध्यंतरीच्या वर्षात त्यांनी मराठी सिनेमांची निर्मिती देखील केली. आता त्यांनी मोर्चा हिंदी सिनेमाकडे वळवला आहे. कुशलतेने विषयाची निवड करुन त्यांनी ‘अकेली’ची निवड केली आहे. सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की, सिनेमात उभारलेला डोलारा काहीसा वेगळा, प्रयोगशील, चौकट मोडणारा आणि बॉलिवूडच्या पडद्यावर कौतुकास्पद आहे.
‘प्यार का पंचनामा’ ही सिनेमांची मालिका, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा भाग राहिलेली अभिनेत्री नुसरत भरुचा हिने यावेळी आपल्या कम्फर्ट झोन बाहेर जाऊन भूमिकेची निवड केली आहे. हा तिचा प्रयत्न नक्कीच कौतुकास पात्र आहे. नुसरतच्या ‘अकेली’ या नव्या चित्रपटाच्या कथेतील ‘ज्योती’ ही एका तरूणीची कहाणी आहे, जी एका भयंकर परिस्थितीत एकटीने संघर्ष करते. नुसरतच्या स्वतःच्या व्यावसायिक संघर्षासारखं काहीसं. ‘क्वीन’ आणि ‘कमांडो ३’ सारख्या चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शन केलेला प्रणय मेश्रामसाठीची, दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीतील ही पहिली मोठी झेप आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सध्याच्या वातावरणात किंवा जे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत; त्यात काहीस वेगळं आणि चौकट मोडून निर्मिती करत चित्रपटकर्त्यांनी ‘अकेली’ प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे; हे एक मोठं धाडस मानता येईल.
‘अकेली’ चित्रपटाच्या मूळ कथेचा जो काळ आहे जेव्हा भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री असताना आखाती देशात संकटात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी उघडपणे मदत केली होती. अशीच एक कथा ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटात आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी लढणाऱ्या एका भारतीय महिलेची होती. यावेळी कॅमेरा इराकमधील परिस्थितीकडे वळला आहे. केदारनाथ दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची व्यथा जाणणारी; ज्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई नाकारली आहे. कारण, ज्यांना मृत घोषित करण्यात आले त्यांचे मृतदेह बचाव संस्थांना सापडलेले नाहीत. ही कथेची आणि कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. (Akelli Movie Review In Marathi)
हा मार्मिक धागा किंवा ही कथानकाची किनार अगदी अलगत प्रेक्षकांच्या समोर येते. पण, मूळ कथा ही ‘ज्योती’ या एकट्या तरुणीची आहे. तिच्या लढवय्येपणाची.. तिच्या संघर्षाची आहे. आपलं घर चालवण्यासाठी नोकरीनिमित्त ज्योती परदेशात जाण्याचा निर्णय घेते. परंतु, घरातील एकट्या आईला काळजी नको म्हणून; घरी ती मोसुल (इराक) येथे नोकरीसाठी जात असूनही ती मस्कतला जातेय असं खोटं सांगते. ती मोसुलला पोहोचते पण काही दिवसांनी ‘आयएसआयएस’चा हल्ला होतो आणि इतर अनेक मुलींसोबत तिलाही ओलिस बनवून दहशतवाद्यांच्या ‘हरम’मध्ये नेले जाते.
आखाती देशांमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांकडून मुलींच्या अपहरणाची कथा यापूर्वी ‘द केरळ स्टोरी’मध्येही आली आहे. शेकडो निरपराध लोकांची निर्घृण हत्या करणं.. हा या दहशतवादी संघटनेचा नित्यक्रम आहे. चित्रपटात एक दृश्य देखील आहे ज्यामध्ये दहशतवादी इस्लामला मानणाऱ्या लोकांना शिया आणि सुन्नींमध्ये विभाजित करून मारताना दिसतात. केवळ उपभोगासाठी येथे एकाकी मुलींचे अपहरण केले जात आहे. कठीण परिस्थितीत घडणाऱ्या अपघातांच्या मदतीने ज्योती प्रारंभी सुटकेचा प्रयत्न करते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती प्रयत्नांची पराकाष्ठा करते. अनावधानाने तिच्या हातून एक उच्चपदस्थ आयसीस कमांडरला मारला जातो. परिणामी ती संघटनेच्या तावडीतून सुटण्यासाठी तिकडून पळ काढते. या परिस्थिती ती स्वतःचा जीव कसा वाचते? सुखरूप आपापल्या मायदेशी परतते का? ही सर्व प्रश्नांही उत्तर सिनेमात आहेत. अलीकडे ‘गदर २’ च्या तारा सिंग सारखी आभास देऊ शकेल असे काहीसे ‘अकेली’मध्ये घडते.
‘अकेली’ हा चित्रपट त्याच्या कथनाच्या दृष्टीने धाडसी प्रयोग आहे. प्रयोग यशस्वी होतात किंवा अयशस्वी होतात पण प्रयोग करत राहण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि या दृष्टीने नुसरत भरुचा आणि चित्रपटाचा दिग्दर्शक प्रणय मेश्राम दोघेही कौतुकास पात्र आहेत. दुबई विमानतळावर प्रणयला भेटलेल्या अनामिक मुलीची ही सत्यकथा आहे. प्रणय आणि गुंजन सक्सेना यांनी मिळून चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. एका दहशतवाद्याला त्याच्या झोपेत हातकडी घालणे आणि एकाच स्विचने संपूर्ण विमानतळाची वीज बंद करणे यासारखी काही कमकुवत दृश्ये वगळता, चित्रपटाची उर्वरित पटकथा आपला वेग कायम ठेवते आणि लॉजिकल रंजन करण्यात यशस्वी ठरते. पुष्कर सिंगने उझबेकिस्तानच्या लोकेशनवर टिपलेले ‘मोसुल’चे चित्रीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने पडद्यावर प्रतिबिंबित होते. ड्रोन फोटोग्राफीनेही त्याला खूप मदत केली आहे.
चित्रपटातील मुख्य पात्र नुसरत भरुचाबद्दल बोलूया… झालं तर; यावेळी ती नायिका नाहीय. कारण, ती नायकाच्या साइडकिकच्या भूमिकेत नाही. ती स्वतः कथेचा ‘नायक’ आहे. ती खरी हिरोही आहे. ‘छोरी’ आणि ‘जनहित में जरी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपली क्षमता दाखविणाऱ्या नुसरतच्या करिअरमधील ‘अकेली’ हा चित्रपटही मैलाचा दगड आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचे काय होईल हे सांगणे कठीण आहे, पण ‘गदर २’च्या झंझावातामध्ये चित्रपटाचे तिकीट खिडकीवर पोहोचणे हा नुसरतच्या आणि चित्रपटाचा टीमचा विजय आहे.
हे देखील वाचा: सुष्मिताला सेन च्या कामाचे सर्वत्र कौतुक! जाणून घ्या ‘ताली’ सीरिजचा रिव्ह्यू
अभिनेत्री नुसरत भरुचा हिने तिच्या आजवरच्या अभिनय प्रवासातील सर्वाधिक उजवं काम यावेळी ‘अकेली’मध्ये केलं आहे. अत्यंत सक्षम आणि एक हाती अशी भूमिका तिच्या वाट्याला आली आणि तिनं ती तितक्याच तन्मयतेनं साकारली आहे. ‘अकेली’च्या निमीत्तानं यावेळी हिंदीच्या पडद्यावर एक वेगळा सिनेमा निर्मिला आहे. कलाकारांची निवड, वातावरण निर्मिती, प्रॉडक्शन डिझाइन, छायांकन आणि पार्श्वसंगीत आदींचा उत्तम मेळ या निर्मितीत आपल्याला दिसतो. नवोदित दिग्दर्शक प्रणय मेश्रामची ही चौकटीबाहेरील कथामांडणी काही त्रुटी असूनही काहीतरी वेगळं पहिल्याच आपल्याला समाधान देते.
सिनेमा : अकेली
निर्मिती : नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगांवकर
लेखक/दिग्दर्शक : प्रणय मेश्राम
लेखन : गुंजन सक्सेना, आयुष तिवारी
कलाकार : नुसरत भरुचा, त्साही हलेवी, निशांत दहिया
छायांकन : पुष्कर सिंग
दर्जा : तीन स्टार