गुन्हेगारी विश्वात तुम्ही एकदा ओढले गेलात की सारे परतीचे मार्ग कायमचे बंद होतात आणि समोर दिसत राहतो तो फक्त दारुण अंत. या वन लायनरवर बेतलेले खंडीभर चित्रपट आपण पाहिले आहेत. खासकरून ८० आणि ९० च्या दशकात तर एकूणच चित्रपटसृष्टीवर असलेला अंडरवर्ल्डचा दबाव आणि त्यातून निर्माण झालेली एक समांतर गुन्हेगारी व्यवस्था यांचं चित्रण कित्येक सिनेमांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळालं.
काही चित्रपट चालले तर काही अक्षरशः डब्यात गेले. पण तरी या सगळ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटांचा किंग कौन? असं विचारलं तर एकच नाव आपल्या समोर येतं ते म्हणजे राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सत्या’ या सिनेमाचं.
नुकतीच ‘सत्या’ला २६ वर्षे पूर्ण झाली. ३ जुलै १९९८ रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा केवळ प्रेक्षकांवरच नव्हे तर साऱ्या सिनेसृष्टीवर एवढा प्रभाव टाकेल हा विचार तो निर्माण करणाऱ्या लोकांनीही केला नसावा. राम गोपाल वर्मा यांची निर्मिती व दिग्दर्शन, ओघाओघाने रामू यांचा चेला अनुराग कश्यप आणि प्रसिद्ध अभिनेता सौरभ शुक्ल यांच्या खांद्यावर आलेली लेखनाची जबाबदारी, विशाल भारद्वाज आणि संदीप चोटा यांच्यावरील संगीत व बॅकग्राऊंडची जबाबदारी, जेरार्ड हूपर नामक एका परदेशी सिनेमॅटोग्राफरला हाताशी घेऊन रामूने उभं केलेलं ९० चं मुंबई अंडरवर्ल्डचं विश्व, जेडी चक्रवर्तीचा सुन्न करणारा स्क्रीन प्रेझेंस, परेश रावल, आदित्य श्रीवास्तव, शेफाली शाह, सौरभ शुक्ल, संजय मिश्रासारख्या तगड्या कलाकारांची मांदियाळी, जीच्यावर रामूने मनापासून प्रेम केलं अशा मादक उर्मिला मातोंडकरला एक सामान्य मराठी घरातील तरुणी म्हणून दाखवणं आणि या सगळ्यावर कळस म्हणजे मनोज बाजपेयीने साकारलेला भिकु म्हात्रे.
बास जसं ७० च्या दशकात आलेल्या ‘शोले’ने चित्रपटसृष्टीचा चेहेरामोहराच बदलला तसंच ९० च्या दशकाच्या शेवटी आलेल्या ‘सत्या’ने सिनेसृष्टीची आणि बॉक्स ऑफिसची गणितंच बदलून टाकली.
खरंतर चित्रपटाची कथा अगदी साधी. मुंबईत कामधंदा शोधण्यासाठी आलेला सत्या नावाचा तरुण. एका डान्सबारमध्ये वेटर म्हणून काम धरतो, पण मान खाली घालून जगणं, अन्याय सहन करणं हे त्याला माहीतच नसतं, तरीही तो काही गोष्टींकडे कानाडोळा करतो, अखेर एक दिवस त्याचाही तोल ढळतो, बारच्या मालकाचा कोथळा बाहेर काढून तो पोलिसात भरती होतो, पुढे त्याची ओळख भिकु म्हात्रेशी होते आणि त्याच्याही नकळतच तो मुंबई अंडरवर्ल्डचा एक हिस्सा बनतो.
अशी साधी सोपी कहाणी आहे सत्याची. पुढचा सत्याचा प्रवास नेमका कसा असणार अन् त्याचा शेवट काय होणार हेदेखील आपल्याला ठाऊक असतं. असं असूनही मुंबई अंडरवर्ल्डचं विश्व आणि त्यांचा कारभार हा तेव्हा दैनंदिन आयुष्य जगणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याशी अगदी समांतर कसा चालायचा हे रामुने या चित्रपटातून अगदी चपखल मांडलं आणि यामुळेच ‘सत्या’ हा रामूच्या कारकिर्दीतला आणि एकूणच चित्रपटसृष्टीतला एक माइलस्टोन मानला जातो.
—
हेदेखील वाचा : The Goat Life Review: हृदयद्रावक जीवनाचा पट!
—
अर्थात काहींना ‘सत्या’ अजिबात आवडत नाही. काहींच्या मते रामूचा हा आजवरचा अत्यंत उथळ आणि वरवरचा सिनेमा आहे. ही गोष्ट काही अंशी खरीदेखील आहे. सिंपळ लिखाण, सादरीकरण, सिनेमॅटोग्राफी सोडली तर काही बाबतीत ‘सत्या’ हा खरंच उथळ वाटतो. ही गोष्ट फक्त त्यांनाच समजेल ज्यांनी रामूच्या याच Gangster Trilogy मधला दूसरा सिनेमा ‘कंपनी’ पहिला आहे. ‘सत्या’ हा या सीरिजमधला पहिला सिनेमा होता त्यामुळे त्याकडे आपण अपवाद म्हणून पाहू शकतो पण खरंच रामूचा ‘कंपनी’ हा ‘सत्या’पेक्षा कित्येक पटीने वरच्या लेवलचा सिनेमा आहे.
अंडरवर्ल्ड विश्व, त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम, गँगवॉर, डोकं थंड ठेवून काम करणारा गँगचा म्होरक्या, तितकेच थंड डोकं ठेवून पण आपल्या कृतीतून व्यक्त होणारे पोलिस खाते, गँगस्टर्सचे खासगी आयुष्य आणि एकूणच या सगळ्यातून होणारा मनस्ताप हे रामूने ‘कंपनी’मधून फार बारकाईने आणि प्रभावीपद्धतीने मांडलं होतं. त्यापुढे ‘सत्या’ हा बराच ओव्हर द टॉप वाटू शकतो.
‘सत्या’मधले फिल्म प्रोड्यूसरला मारण्याचा सिक्वेन्स, त्यानंतर पोलिस रिमांडमधला चौकशीचा सिक्वेन्स आणि असेच काही एका दुक्का सीन्स सोडले तर खरंच ‘सत्या’ उथळ वाटतो हे अगदी खरं आहे. केवळ रामूचं हटके सादरीकरण, सिनेमॅटोग्राफीमध्ये त्याने केलेला प्रयोग, मार्टिन स्कॉरसेसेच्या ‘गुडफेलाज’ला समोर ठेवून सौरभ शुक्ल आणि अनुराग कश्यपने लिहिलेले संवाद यामुळेच ‘सत्या’ची सर्वात जास्त चर्चा होते.
बाकी भिकु म्हात्रे हे पात्र हे ओव्हर द टॉप आहे हे खुद्द मनोज बाजपेयीही मान्य करतील. मनोज यांच्या करिअरला या सिनेमाने आणि या भूमिकेने कलाटणी दिली खरी पण याहून उत्कृष्ट काम मनोज बाजपेयी यांचं आपण पाहिलेलं आहे.
एकूणच ९० च्या दशकातून बाहेर पडताना तत्कालीन फिल्ममेकिंगच्या प्रोसेसला छेद देणारा ठरल्याने ‘सत्या’ची प्रचंड चर्चा झाली. काही अंशी ते योग्यही होतं पण नंतर २००२ मध्ये ‘कंपनी’सारखा अल्टीमेट क्राइम थ्रिलर देऊन रामूने ‘सत्या’ हा अमॅच्युअर सिनेमा होता हे काही न बोलताच सिद्ध केलं.
टाइमफ्रेमच्या दृष्टीने बघाल तर ‘सत्या’ हा नक्कीच त्या काळातला मास्टरपीस होता आणि राहील, पण या पठडीतला खास रामू टच असलेला कल्ट दर्जाचा कुठला सिनेमा असेल तर तो अजय देवगण, विवेक ओबेरॉय, मोहनलाल, मनीषा कोइराला, सीमा बिसवास यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कंपनी’ हाच होय. बाकी ‘सत्या’चा भिकु म्हात्रे आणि सुरेश वाडकर व आशा भोसले यांच्या आवाजातलं ‘सपने में मिलती है’ हे गाणं कोणताही सिनेप्रेमी त्यांच्या उभ्या आयुष्यात विसरू शकणार नाही हेदेखील तितकंच खरं आहे.